पुणे31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर लोकसभा खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना नाटकाचे फुकट पास न दिल्यास ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील पोलिस कर्मचाऱ्यावर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी निलंबनाची कडक कारवाई केली आहे.
फुकट पास मागत कार्यक्रम होऊ न दिल्याची धमकी दिल्याचा आरोप स्वतः खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भर नाटकात व्यासपीठावर केल्याने हा खेदजनक प्रकार उघडकीस आला.त्यामुळे याबाबतची गंभीर दखल घेत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
पिंपरी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले
पोलिस नाईक महेश नाळे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पिंपरी येथील एचए मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, कराड या ठिकाणी झालेल्या महानाट्याच्या प्रयोगाला पोलिसांनी चांगले सहकार्य केले. परंतु, पिंपरी चिंचवडच्या पोलिस दलातील एका पोलिसाने फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी नाटका दरम्यान जाहीररित्या सांगितले. तसेच, धमकी देणाऱ्या पोलिसांना कडक समज द्यावी, अशी मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली.
याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यामुळे नेटकऱ्यांनी पोलिसांचा टीका करत खरपूस समाचार घेतला. पोलिस दलाची बदनामी होत असल्याचे लक्षात घेत पोलिस आयुक्त चौबे यांनी तातडीने नाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच, पोलिस उपायुक्त डॉ. विवेक पाटील यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.