कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईचा ५२ धावांनी पराभव करत आपला पाचवा सामना जिंकला. केकेआरचे १६५ धावांचे आव्हान पार करताना मुंबईचा संघ ११३ धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. केकेआरकडून पॅट कमिन्सने ३ तर आंद्रे रसेलने २ विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीवीर इशान किशनने झुंजार खेळी करत ५१ धावा केल्या. मात्र मुंबईच्या इतर फलंदाजांना विकेटवर तग धरता आला नाही.
केकेआरचे १६५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला पॉवर प्लेमध्ये दोन धक्के बसले. टीम साऊदीने रोहित शर्माला २ धावांवर तर आंद्रे रसेलने तिलक वर्माला ६ धावांवर बाद केले. आंद्रे रसेलने सूर्यकुमार यादवच्या जागी संधी मिळालेल्या रमनदीप सिंहला १२ धावांवर बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. टीम डेव्हिड देखील १३ धावांची भर घालून परतला. त्याअगोदर मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह याने चकित करणारी कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १ निर्धाव षटक टाकत १० धावा दिल्या आणि सर्वाधिक ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
मुंबईचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना सलामीवीर इशान किशनने झुंजार अर्धशतकी खेळी केली. पॅट कमिन्सने मुंबईला मोठा धक्का दिला. त्याने झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला ५१ धावांवर बाद केले. १५ वे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सने मुंबईला एकाच षटकात तीन धक्के दिले. त्याने पहिल्या चेंडूवर इशान किशन, चौथ्या चेंडूवर डॅनियल सॅम्स आणि सहाव्या चेंडूवर मुर्गन अश्विनला बाद करत मुंबईची अवस्था ७ बाद १०२ धावा अशी केली.
चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत असताना मुंबईची सर्व भिस्त कायरॉन पोलार्डवर होती. मात्र तो देखील १६ चेंडूत १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो आणि कार्तिकेय (३) पाठोपाठ धावबाद झाले. आयपीएलच्या ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोलकाता नाईट रायडर्सचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी ६० धावांची सलामी दिली. व्यंकटेश अय्यर आक्रमक फलंदाजी करत होता.
मात्र अर्धशतकाजवळ पोहचलेल्या व्यंकटेशला कुमार कार्तिकेयने ४३ धावांवर बाद केले. त्यानंतर केकेआरच्या फलंदाजीला गळती लागण्यास सुरूवात झाली. अजिंक्य २५ तर श्रेयस अय्यर ६ धावांची भर घालून माघारी गेले. दरम्यान, नितीश राणाने एक बाजू लावून धरत ४३ धावा केल्या. मात्र जसप्रीत बुमराहने केकेआरला १५ व्या षटकात दोन तर १७ व्या षटकात ३ धक्के दिले. जसप्रीत बुमराहने ४ षटकात १० धावा देत पाच बळी टिपले. अखेर रिंकू सिंहने १९ चेंडूत २३ धावांची खेळी करत केकेआरला १६५ धावांपर्यंत पोहचवले. या विजयासह कोलकाताला गुणतालिकेत फायदा झाला. ते सातव्या स्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे, नवव्या पराभवासह मुंबई पुन्हा तळाशी कायम राहिली.