केपटाऊनमध्ये विराट कोहली रचणार इतिहास, विक्रमापासून फक्त 14 धावा दूर


Advertisement

Ind vs SA: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. दुखापतीमुळं विराटला दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावं लागलं होतं. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलकडं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. मात्र, या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याच्या हेतूनं दोन्ही संघ मैदानात उतरतील. या सामन्यात विराट कोहलीकडं इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. नव्या विक्रमापासून विराट फक्त 14 धावा दूर आहे. 

भारताकडून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल द्रविड दुसऱ्या स्थानावर आहे. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकराच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेत 50 च्या सरासरीनं 611 धावा केल्या आहेत. तर, राहुल द्रविडनं दक्षिण आफ्रिकेत 29 च्या सरासरीनं 624 धावा केल्या आहेत. केपटाऊन कसोटी सामन्यात विराटनं 14 धावा केल्यास तो राहुल द्रविडला मागे टाकेल. 

Advertisement

सचिन तेंडुलकरनं दक्षिण आफ्रिकेत 15 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 46.44 च्या सरासरीनं 1161 धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथे खेळला गेला. भारतानं पहिला कसोटी सामना 113 धावांनी जिंकला. मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला आणि दक्षिण आफ्रिकेने सात विकेट राखून भारताचा पराभव केला. या मालिकेतील शेवटचा सामना 11 जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
1) सचिन तेंडुलकर- 28 डावात 1161 धावा
2) राहुल द्रविड- 22 डावात 624 धावा
3) विराट कोहली- 6 कसोटी सामन्यात 611 धावा 
4) व्हीव्हीएस लक्ष्मण- 18 डावात 566 धावा
5) सौरव गांगुली- 17 डावात 506 धावा

Advertisement

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Advertisement