दक्षिण3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सोलापूर मंद्रूपचे ग्रामदैवत श्री मळसिध्द यात्रेनिमित्त भरविलेल्या कुस्ती आखाड्यातील अंतिम लढतीत प्रकाश बनकर याने पोकळ घिस्सा डावावर शैलेश शेळके याला अस्मान दाखवित मळसिध्द केसरीचा बहुमान पटकाविला. त्यास एक लाख ५१ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली. उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या या दोन्ही पैलवानाची कुस्ती पाहण्यास हजारो कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. येथील मळसिद्धप्पा- शेखासाहेव कुस्ती आखाड्यात कुस्तीचे मैदान रंगले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख व अरकेरीचे औदुसिध्द महाराज यांनी फडाची उद्घाटन केले. संयोजक माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांनी चांगले नियोजन केले होते.
यावेळी सिध्देश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार शिवशरण पाटील, बाळासाहेब शेळके, अप्पाराव कोरे, अमर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, रमेश नवले, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील व प्राचार्य श्रीधर टेळे यांची उपस्थिती होती. अंतिम कुस्ती उप महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर (कोल्हापूर) व शैलेश शेळके (पुणे) यांच्यात झाली. दोन्ही पैलवानांनी एकेरीपट, मोळी, धोबीपछाड डाव टाकले. अखेर बनकर याने पोकळ घिस्सा डावावर शेळके याला चितपट करून मळसिध्द केसरीचा बहुमान मिळविला. तर एक लाख रुपयाची दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बंटीकुमार (हरियाणा) विरुद्ध संतोष जगताप (सरकोली, पंढरपूर) यांच्यात झाली, पण बरोबरीत सुटली. मैदान यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच पिराप्पा म्हेत्रे, नागेश म्हेत्रे अनंत म्हेत्रे, रवी म्हेत्रे, विठ्ठल बंडगर, विजय शेंडगे, प्रसाद शेंडगे आदींनी परिश्रम घेतले. महाराष्ट व कर्नाटकातील भाविकांनी हजेरी लावली.
मंद्रूप यात्रेतील अंतिम कुस्तीत प्रकाश बनकर याने शैलेश शेळके याला चितपट केले नयनरम्य शोभेचे दारूकाम यात्रेत नयनरम्य शोभेचे दारूकाम झाले. यंदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश यातून देण्यात आला. नंदीध्वजाच्या मिरवणुकीनेही लक्ष वेधले होते. नामवंत मल्लांच्या कुस्ती फडाने यात्रेची सांगता झाली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख व हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते शोभेचे दारूकाम सुरू झाले. दारूकाम पाहण्यास हजारो भक्तांनी गर्दी केली होती. शोभेचे दारूकाम कलाकृतीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त लावला होता. तत्पूर्वी गावातून मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक निघाली. नंदीध्वजाच्या मानकऱ्यांनी नंदीध्वज हनुवटीवर व खांद्यावर पेलत आपल्या कलेचे प्रदर्शन करून भाविकांची वाहवा मिळविली. फोटोग्राफर शिवानंद माळी यांनी दोन स्क्रीन बसवल्यामुळे मिरवणुकीचा सोहळा थेट पाहता आला.मंद्रूप यात्रेतील अंतिम कुस्तीत प्रकाश बनकर याने शैलेश शेळके याला चितपट केले.