खलील अहमदचा भेदक मारा आणि अखेरच्या टप्प्यात कुलदीप यादवने कोलकाताच्या तळाच्या फलंदाजांची घेतलेली गिरकी या सुरेख संगमाने दिल्लीकरांच्या सलामीवीरांची अर्धशतके सार्थ ठरली. डोंगराऐवढ्या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ ढेपाळला. कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक वगळता कोणालाही मैदानात तग धरता आला नाही. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने अव्वलस्थानावर असलेल्या कोलकाता संघाला नमवत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. अखेर दिल्लीने ४४ धावांनी हा सामना जिंकत हंगामात शानदार पुनरागमन केले आहे. हा त्यांचा दुसराच विजय आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी अर्धशतकी खेळी केली होती. पृथ्वी शॉनं २९ चेंडूत ५१ धावा कुटल्या. त्याच्याशिवाय डेव्हिड वॉर्नरने ४५ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. पंत १४ चेंडूत २७ धावा करुन परतल्यानंतर ललित यादव १(४) आणि रामवन पॉवेल ८(६) स्वस्तात माघारी फिरले. अखेरच्या षटकात अक्षर पटेलनं १४ चेंडूत २२ तर शार्दुल ठाकूरने ११ चेंडूत धावा करत संघाची धावसंख्या ५ बाद २१५ धावापर्यंत पोहचवली होती.
मुंबईतील ब्रेबॉर्नच्या स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला आहे. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉच्या अर्धशतकी खेळीनंत अखेरच्या टप्प्यात शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ब्रेबॉर्नची लढाई २०० पारची केलीये. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकात ५ बाद २१५ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एकेमकांच्या नेतृत्वाखाली खेळलेले दोन भारतीय युवा स्टार एकमेकांच्या विरुद्ध पहिल्यांदाच भिडत आहेत.
श्रेयस अय्यरची झुंज व्यर्थ
दिल्लीच्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून एकट्या कर्णधार श्रेयस अय्यरने चिवट झुंज दिली. त्याने ३३ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ५ चौकारही मारले. तसेच नितीश राणानेही ३० धावांचे योगदान दिले होते. परंतु कोलकाताचे इतर फलंदाज सपशेल फेल ठरल्यामुळे संघ १७१ धावांवरच सर्वबाद झाला.
या डावात दिल्लीकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी शानदार गोलंदाजी केली. कुलदीपने ४ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहदमनेही ३ विकेट्स घेतल्या व शार्दुल ठाकूरनेही २ फलंदाजांना बाद केले.