हिंगोली17 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी स्मशानभुमीत उपोषण सुरु झाले आहे. या ठिकाणीच आंदोनकर्त्यांच्या दोन मुलींच्या वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या तपासणीमध्ये एका आंदोलनकर्त्याची शुगर कमी झाल्याने अशक्तपणा जाणवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुरुंदा येथील काही गावकऱ्यांनी गुरुवारपासून गावाच्या स्मशानभुमीत उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच आंतरवाली सराटी येथील लाठीचार्जची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही या आंदोलनकर्त्यांनी लाऊन धरली आहे.
स्मशानभुमीत साधेपणाने साजरा केला वाढदिवस
दरम्यान, या उपोषणाला बसलेल्या गजानन इंगोले यांची मुलगी किर्ती इंगोले व सतीष दळवी यांची मुलगी स्वरा दळवी यांचा गुरुवारीच वाढदिवस होता. मात्र मुलींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठीही घरी न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर किर्ती व स्वरा यांना स्मशानभुमीत बोलावून त्या ठिकाणी साधेपणाने त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.
आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सुुरुच राहणार
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी रात्री स्मशानभुमीमध्येच मुक्काम ठोकला. त्यानंतर आज या उपोषणाच्या ठिकाणी आज आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देऊन आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये गजानन इंगोले यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे आरोग्य तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. जो पर्यंत आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सुुरुच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.