नागपूर10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्य सरकारच्या मराठ्यांना कुणबी समाजाद्वारे आरक्षण देण्याच्या निर्णयावर कुणबी समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन OBC आरक्षण देऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करून प्रसंगी आक्रमक आंदोलन उभारण्याचाही इशारा दिला आहे.
जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने या आंदोलनापुढे नमते घेत मराठी समाजाला कुणबीचा दाखला देऊन ओबीसीचे आरक्षण देऊ केले. यासंबंधीचा एक जीआरही सरकारने काढला आहे. आता कुणबी समाजाने त्यावर आक्षेप घेतल्यामुळे सरकारची चौफेर कोंडी होण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये गुरुवारी माजी मंत्री सुनील केदार व अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीला कुणबी समाजातील सर्वच उपजातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यास ठाम विरोध करण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. महाराष्ट्र बंद पुकारला जाईल. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे निवेदन दिले आहे, असे शहाणे यावेळी म्हणाले.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका
यावेळी लेकुरवाळे म्हणाल्या, मराठा समजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये. अगोदरच ओबीसी कोट्यात अनेक जाती आहेत. त्यामुळे त्यात मराठा जातीचा समावेश करणे तर्कसंगत नाही. सरकारने त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल.
शुक्रवारी कुणबी समाजाची बैठक
कुणबी समाजाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी जाहीर बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारपासून संघटनेच्या जुनी शुक्रवारी परिसरातील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले जाईल, असे शहाणे यांनी यावेळी सांगितले.