औरंगाबाद31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सासू-सुनेचे नाते म्हणजे विळ्या-भोपळ्याचे असे बोलले जाते. सासवा खाष्ट. सुनेला छळणाऱ्या असतात, अशी एक प्रतिमा समाजात असते. मात्र, याला भेद देण्याचे काम औरंगाबादच्या जैस्वाल कुटुंबाने केले आहे. चक्क 64 वर्षांच्या सासूने आपली किडनी सुनेला देत तिचे प्राण वाचवले.
योगिता संजय जैस्वाल असे सुनेचे नाव असून, त्यांच्यावर अगदी पोटच्या मुलीप्रमाणे जीव लावणाऱ्या सासूचे नाव रत्नाबाई रमेश जैस्वाल आहे. तामिळनाडूतल्या कोईमतूर येथील कोवाई रुग्णालयात मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही शस्त्रक्रिया पार पडली.
नेमके घडले काय?
जैस्वाल कुटुंब औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथे राहतात. त्यांच्या कुटुंबातील सून योगिता जैस्वाल या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीस सुरू होते. त्यांच्या किडनीचे प्रत्यारोपण करणे, हाच एकमेव इलाज होता. मात्र, त्यांच्या रक्त गटाची किडनी मिळत नव्हती.
वयामुळे होती चिंता
सुनेसाठी सुरू असलेली किडनीची शोधशोध पाहता सासू रत्नाबाई समोर आल्या. त्यांनी आपली एक किडनी मुलीसाठी देण्याचा निर्धार कुटुंबासमोर बोलून दाखवला. मात्र, त्यांचे वय 64. त्यांना हे सारे झेपणार का, त्यांची किडनी योगिता यांच्याशी जुळणार का, या साऱ्या शक्यता होत्या. मात्र, अखेर सारे सुरळीत पार पडले.
9 तास शस्त्रक्रिया
जैस्वाल कुटुंबाने साऱ्या चाचण्या केल्या. तेव्हा सासू रत्नाबाई यांची किडनी सून योगिता यांना जुळेल हे स्पष्ट झाले. इतरही काही अडणी येणार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी तामिळनाडूतल्या कोईमतूर येथील कोवाई रुग्णालयाची संपर्क साधला तिथेच 14 जानेवारी रोजी संक्रांतीच्या पूर्वसंध्येला तब्बल 9 तास शस्त्रक्रिया पार पडली. आता दोघांचीही तब्येत उत्तम आहे. या अनोख्या नात्याची पंचक्रोशी जोरदार चर्चा सुरू आहे.