सनरायझर्स हैदराबादचा २२ वर्षीयं युवा गोलंदाज उमरान मलिक इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात आपल्या वेगवान चेंडूनं सर्वांना प्रभावित करत आहे. आयपीएल २०२२ आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात त्याने सातत्याने १४० kaph पेक्षा अधिक वेगाने चेंडू फेकल्याचे पाहायला मिळाले. लखनौ विरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या पदरी निराशा आली असली तरी उमरान मलिकनं खास चेंडू फेकून आपल्यातील क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिलीये.
लखनौ विरुद्धच्या सामन्यातील आपल्या दुसऱ्याच षटकात उमरान मलिक याने १५२.४kph वेगाने चेंडू फेकला. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा हा सर्वात वेगवान चेंडू आहे. लखनौच्या डावातील १४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर दीपक हुड्डाला त्याने यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात जलद गतीचा चेंडू फेकला.
या चेंडूवर हुड्डाने चौकार मारला असला तरी गतीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. त्याचे षटक चांगलेच महागडे ठरले. या षटकातील १६ धावांसह ३ षटकात त्याने ३९ धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण त्याने सातत्याने टाकलेल्या वेगवान चेंडूमुळे तो चर्चेत आहे. लवकरच तो भारतीय संघात खेळताना दिसेल, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसताहेत.
पुण्याच्या मैदानातील पहिल्या सामन्यातही त्याने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली होती. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत त्याने बटलर आणि देवदत्त पडिक्कलची विकेटही घेतली होती. अनेक क्रिकेट समीक्षकांनी ट्विटच्या माध्यमातून त्याच्या गती आणि नियंत्रणावर भाष्य केले आहे. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेही ट्विटच्या माध्यमातून त्याचे कौतुक केल्याचे पाहायला मिळते.