हिंगोली11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर वडद पाटीजवळ कावड यात्रेकरू व गावकऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्यापुर्वीच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र यावेळी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी ता. ९ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
कावड यात्रा व ढाबाा चालकात किरकोळ वाद
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्हयातील एक कावड यात्रा आज औंढा नागनाथ येथून वाशीमकडे निघाली होती. या कावड यात्रेमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कावड यात्रा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडद पाटी येथे आल्यानंतर त्या ठिकाणी कावड यात्रेतील काही भाविक व तेथील ढाबा मालक सचिन पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वादाला तोंड फुटले. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेल्यानंतर काही भाविकांनी सचिन पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
सुमारे दीडशे लोकांचा जमाव
दरम्यान, सदर प्रकार गावकऱ्यांना कळाल्यानंतर गावातील सुमारे 100 ते 150 जणांचा जमाव वडदपाटी येथे दाखल झाला. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक अशोक कांबळे, जमादार आकास पंडीतकर, शंकर जाधव यांना घटनास्थळी रवाना केले. त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन वाढीव पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरून जाणाऱ्या कावड पुढे मार्गस्थ केल्या तसेच वडद येथील गावकऱ्यांना समजावून सांगून त्यांनाही गावाकडे परत पाठविले. तर जखमी सचिन पाटील यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअरमध्ये दाखल केले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.