काळ.. स्वातंत्र्यानंतरचा!डॉ. जयंत नारळीकर
साधारण पन्नास वर्षांपूर्वी मी दोन प्रसिद्ध विचारवंत शास्त्रज्ञांनी केलेली चर्चा ऐकण्यास उपस्थित होतो. ते दोघे होते- रे ब्रॅडबरी आणि फ्रेड हॉइल. चर्चेचा विषय होता- ‘विज्ञान साहित्य : भविष्यवेधी की बाष्कळ?’ वक्ते आणि विषय दोन्ही आकर्षक असल्यामुळे कॅलटेकचे बेकमन सभागृह पूर्ण भरून गेले होते. अनेक मुद्दे मांडत ब्रॅडबरीने एक विधान केले. तो म्हणाला, ‘मी माझ्या गतायुष्यात विज्ञानाने लावलेले अनेक शोध पाहिले; जे विज्ञान साहित्य लिहिणाऱ्या लोकांच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे होते.’

Advertisement

हा लेख लिहीत असताना मला ब्रॅडबरीचे विधान आजही सत्य असल्याचे जाणवते आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी एवढी प्रगती केली आहे, की समाज त्या वेगाने बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या वेगाचा झटका बसतो. इथे मी काही उदाहरणे देतो.

मी पाच-सहा वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी रेडिओ सेट विकत आणला. ती एक मोठीशी पेटी होती आणि तिच्यातून बरीच खरखर येई. विविध लहर लांबींमधून वेगवेगळे आवाज येत. एकूण रेडिओ हे सतत आवाज करणारं यंत्र होतं. दुसरे महायुद्ध संपताना त्यावरून येणाऱ्या बातम्या बहुधा युद्धाबद्दलच असत. स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर असताना विविध भागांतून दंग्यांच्या बातम्या येत होत्या. मला आणि माझ्या धाकटय़ा भावाला हवाईयुद्धाची कल्पना ही नवीनच होती. बॉम्ब नेणाऱ्या विमानांना ‘बॉम्बर्स’ म्हणत. आम्हाला वाटे, आकाशात दिसणारी सगळी विमाने बॉम्बर्स आहेत. अशीही काही विमाने असतात, ज्यांत बॉम्ब नसून प्रवासी असतात, हे नंतर हळूहळू समजले.

Advertisement

नंतर १९५० च्या सुमाराला माझे मोरूमामा आमच्या घरी राहायला आले. ते बनारस युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचा एम. एस्सी.साठी अभ्यास करणार होते. त्यांना हा खरखर करणारा रेडिओ फार आवडला, कारण त्यावर त्यांना क्रिकेटची कॉमेंटरी ऐकता येई. जरी क्रिकेट मॅच कंटाळवाणी असली, तरी रेडिओची खरखर उत्साहवर्धक पाश्र्वसंगीताचे काम करत असे.

वाराणसीमधली वाहने म्हणजे एक्का, टांगा, आणि सायकल रिक्षा यांची रहदारी बराच गोंधळ आणि आवाज करत असे. आज त्याऐवजी ऑटोरिक्षा आहेत; ज्या आवाजाबरोबरच प्रदूषणदेखील करत असतात. एकूण आज रहदारी खूपच वाढली आहे. आजच्या मुंबईमध्ये पुढे दिलेली घटना असंभव किंवा अतक्र्यच आहे..

Advertisement

आम्ही मरीन ड्राइव्हवर चालत होतो. तेवढय़ात वरून उघडय़ा असलेल्या एका गाडीतून जाणारा मित्र आमच्या जवळ गाडी उभी करून बोलण्यासाठी थांबला. १०-१५ मिनिटे आम्ही गप्पा मारत होतो. मग तो गाडी सुरू करून पुढे गेला. अशी घटना आज घडू शकेल का?

आणखी एक उदाहरण पाहा..

Advertisement

मी दादरमध्ये स्केटिंग करायला शिकलो. आम्ही तिथे हिंदू कॉलनीमध्ये राहत होतो. दुपारच्या वेळी तिथून सरळ टिळक ब्रिजपर्यंतच काय, थोडेफार ब्रिजवरही आम्ही स्केटिंग करत होतो.

असे अनुभव फक्त भारतापुरतेच नाहीयेत. केम्ब्रिजला अनेक वर्षांनी गेल्यावर त्या शहरातदेखील मध्यवर्ती भागात वाढलेल्या रहदारीमुळे अनेक बदल केलेले आढळले. बऱ्याच ठिकाणी गाडय़ा नेता येत नाहीत. एकूण सगळ्याच शहरांत वाहनांची गर्दी वाढली आहे.

Advertisement

रात्रीचा मानवनिर्मित उजेड हा खगोलशास्त्रज्ञांना नेहमी सतावत असतो. ते दुर्बिणीचा जास्तीत जास्त उपयोग करायचा प्रयत्न करतात; पण शहरातील दिव्यांच्या उजेडामुळे त्यांचे फोटो धुरकट होतात. लांबच्या पुसट वस्तूंचे फोटो नीट येत नाहीत. त्यांना रात्रीचे आकाश अगदी काळेभोर पाहिजे असते. म्हणून ते जवळचे प्रकाशाचे स्रोत कमी करण्याचा प्रयत्न करतात. बहुधा अशा दुर्बिणी डोंगरावर उभारल्या जातात. आता अधिकाधिक मोठय़ा व खर्चीक दुर्बिणी बांधल्या जातात. त्यांच्या बांधणी व व्यवस्थापनाचा भार एका राष्ट्राला परवडत नाही, म्हणून अनेक राष्ट्रे तिच्या निर्मितीत सहभाग घेतात. भारताचा अनेक दुर्बिणींत लक्षणीय वाटा असतो. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील सदरलंडजवळील SALT ही आद्याक्षरे असणारी अति भव्य दुर्बीण किंवा हवाईमधील मोनाकिया दुर्बीण. प्रत्येक राष्ट्राच्या खर्चाच्या वाटय़ानुसार त्या- त्या राष्ट्रातील शास्त्रज्ञांना दुर्बिणीतून वेध घेण्यासाठी वेळ मिळतो. आम्ही चिले येथील पॅरानाल पर्वतावरील दक्षिण युरोपियन देशांनी बनवलेली दुर्बीण पाहायला गेलो होतो. गाडीने डोंगरावर राहण्याच्या जागी पोहोचलो तेव्हा तिथे इमारत काही दिसेना. मग लक्षात आले की समोर असलेल्या पालथ्या ठेवलेल्या बशीसारख्या दिसणाऱ्या आकाराखाली डोंगर खोदून मोठी चार मजली इमारत बनवलेली आहे. तिथे स्विमिंग पूलसहित सर्व सुखसोयी आहेत. रात्री या पारदर्शक बशीच्या लगत खाली मोठीथोरली काळी छत्री उघडली जाते व त्यातून या निवासस्थानाचा प्रकाश बाहेर येत नाही. दुर्बीण असलेल्या ठिकाणी रात्री जाताना गाडीचे कोणतेही दिवे लावण्यास बंदी असते. या दुर्बिणीला भेट देताना रे ब्रॅडबरी यांचे उद्गार खरे आहेत हे जाणवले.

याशिवाय रेडिओ दुर्बिणी बनवल्या जातात. त्या खूप मोठय़ा असून, त्यांना भरपूर जागा लागते. पुण्याजवळील प्रा. गोविंद स्वरूप यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली G.M.R.T. ही अशीच एक दुर्बीण आहे. याहून मोठी रेडिओ दुर्बीण बनवण्यास आंतरराष्ट्रीय सहकार्य लागेल. LIGO (लायगो) हा असाच आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. विविध देशांतील शास्त्रज्ञ विज्ञानातील प्रगतीसाठी असे सहकार्य करतात आणि हे उत्साहवर्धक आहे.

Advertisement

[email protected]

The post काळ.. स्वातंत्र्यानंतरचा! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement