काही वर्षांपूर्वी लागोपाठ दोनदा अपघात झाल्यावर आम्ही जबरदस्तीनं त्याचं पुण्यात सायकलनं फिरणं बंद केलं.
प्रियदर्शिनी कर्वे
जुलै २०२०. करोनाच्या जागतिक साथीमधली भारतातील पहिली लाट टिपेला पोहोचली होती. अशातच नंदूला- म्हणजे माझे वडील वैज्ञानिक आनंद कर्वे यांना ‘करोना’ची लागण झाली. वय ऐंशीच्या पुढे असल्यामुळे दवाखान्यात भरती व्हावं, असा सल्ला हितचिंतकांनी दिला. पण चाचणी करून निकाल हाती येईपर्यंतच्या दोन दिवसांत ताप उतरला होता. ऑक्सिजनची पातळी पंचाण्णवच्या खाली होती, पण हालचाल केल्यावरही स्थिर राहात होती. इतर कोणत्याही व्याधी नाहीत. सर्व सारासार विचार केल्यानंतर घरीच विलगीकरणात राहावं, आपल्याला फार त्रास होत नसताना दवाखान्यातील जागा अडवून ठेवू नये, असा निर्णय नंदूनं घेतला, आईला आणि मलाही हे पटलं.
विलगीकरण काटेकोरपणे पाळून दोन आठवडय़ांनंतर तो पूर्ण बरा झाला. जे जे करणं आवश्यक होतं ते सारं त्यानं आणि आईनं शांतपणे, तणाव न घेता केलं. यापूर्वीही जेव्हा जेव्हा काही व्यक्तिगत, कौटुंबिक, व्यावसायिक संकटं उभी राहिली, तेव्हाही याच पद्धतीनं शांतपणे, सर्व बाबींचा पूर्ण तार्किक विचार करूनच नंदू निर्णय घेत आला आहे. माझ्या पिढीतल्या बऱ्याच लोकांना करोनाच्या लसीकरणासाठी आपल्या वृद्ध आई-वडिलांची मानसिक तयारी करण्यासाठी बरेच कष्ट पडले. पण आमच्या घरात या विषयावर चर्चाही झाली नाही. ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सुरू झाल्यानंतर एक आठवडय़ातच मी नोंदणी केली आणि नंदू – आईनं लस घेतली. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे आई-वडील असल्यामुळे माझं जगणं सुकर झालं आहे, हा साक्षात्कार मला वेळोवेळी होत असतो, त्याचंच हेही एक उदाहरण!
लहानपणीच्या माझ्या आठवणीनुसार नंदू एक तर कामानिमित्त परगावी गेलेला असे, नाही तर संशोधन- लेखन- वाचनात बुडालेला असे. कौटुंबिक गप्पांमध्ये त्याचा सहभाग म्हणजे त्याच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल, नव्या विचारांबद्दल बोलणं. त्याच्याइतका कार्यमग्न आणि विचारमग्न माणूस मी दुसरा पाहिला नाही. पण लहर आली तर कधी अत्यंत फालतू आणि कधी अत्यंत कल्पक अशी गाण्यांची विडंबनं, विनोद हेही मी त्याच्याइतके दुसऱ्या कोणाकडून ऐकलेलं नाही!
मी विज्ञानाच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले, ते विज्ञान संशोधनातून त्याला मिळणारा आनंद पाहूनच. १९८० च्या उत्तरार्धात बारावीत चांगले गुण मिळाले तर वैद्यकीय नाही तर अभियांत्रिकी शिक्षणाकडेच गेलं पाहिजे असा प्रघात होता. पण माझ्यावर असं कोणतंही दडपण आणलं गेलं नाही. पुढे आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्यावर मी एकटीचा स्वतंत्र संसार मांडला, तोही नंदू आणि आईच्या पाठिंब्यानं आणि मदतीनंच. त्या वेळी या दोघांनाही त्यांच्या समवयस्क नातेवाईक आणि मित्रमंडळींनी भयंकर पिडलं. पण त्यांनी याचा त्रास करून घेतला नाही, माझ्यापर्यंतही यातलं काही येऊ दिलं नाही.
नंदूनं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेव्हा ग्रामीण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संस्था सुरू केली तेव्हा मीही काही काळ त्याच्याबरोबर काम केलं. त्या वेळी त्याचा एकंदर विचारांचा आणि कामाचा झपाटा मी स्वत: अनुभवला. आर्थिक अडचणी, अतिशय तुटपुंजी साधनं आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असूनही जागतिक दर्जाचं संशोधन या लहान संस्थेत अल्पावधीतच होऊ शकलं ते केवळ नंदूच्या कामाच्या पद्धतीमुळे. पण याच कार्यपद्धतीमुळे संस्थेचं व्यवस्थापन, संघबांधणी, यांचा पाया मजबूत करण्याकडे सर्वाचंच दुर्लक्ष झालं आणि ज्येष्ठ सदस्यांच्या निवृत्तीनंतर संस्थेची पीछेहाट झाली, हेही तितकंच खरं.
आता वयपरत्वे त्याला शारीरिक मर्यादा आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी लागोपाठ दोनदा अपघात झाल्यावर आम्ही जबरदस्तीनं त्याचं पुण्यात सायकलनं फिरणं बंद केलं. पण तो नियमित व्यायामशाळेत जातो आणि वयाच्या मानानं त्याची प्रकृती चांगली आहे. कंपवातानं आता त्याचे हात थरथरतात, पण संगणकाच्या मदतीनं त्याचं लेखन, जगभरातील लोकांशी संवाद चालू असतो. त्याचा मेंदू अजूनही संशोधनात गढलेला आहे. वनस्पती आणि मातीतील जिवाणूंच्या परस्परसंबंधांबाबत एक वेगळा विचार त्यानं मांडला आहे. काही तरुण संशोधकांच्या मदतीनं प्रत्यक्ष प्रयोगही सुरू आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही हिरिरीनं चर्चा आणि वादविवाद करत आहोत.
माझ्या जगात सगळं व्यवस्थित चाललं आहे..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.