अहमदनगर16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुभाष बर्डे, तर उपसभापतीपदी कुंडलिक आव्हाड यांची शनिवारी निवड बिनविरोध झाली. आमदार मोनिका राजळे यांना सर्व संचालकांनी पदाधिकारी निवडीचे अधिकार दिले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आमदारांनी नीती आखल्याचे पदाधिकारी निवडीवरून स्पष्ट झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशेष लेखा परीक्षक सुनील खर्डे यांनी काम पाहिले.
पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव, कर्मचारी परिचय कार्यक्रमानंतर झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, वृद्धेश्वरचे संचालक राहुल राजळे व कुशिनाथ बरडे, ज्येष्ठ नेते संजय बडे, मढी देवस्थानचे अध्यक्ष राधाकिसन मरकड, ज्येष्ठ नेते अशोक मंत्री, पालिका व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उपस्थित होते.
यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, पूर्वीच्या संचालकांनी काय केले अशा इतर विषयांकडे लक्ष न देता आपल्याला कशा पद्धतीने कारभार करायचा आहे, यावर भर द्यावा लागेल. राज्यातील इतर ठिकाणच्या प्रगतीपथावरील बाजार समित्यांचा कारभार पाहण्यासाठी संचालकांनी संयुक्त दौरे करावेत. मुख्य बाजार समितीसह उपबाजार समित्यांमध्ये सुद्धा मूलभूत सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. मुख्य इमारतीसह आवाराच्या विकास आराखडा अंमलात आणला जाईल. तिसगाव उपबाजार परिसरात शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. केंद्र व राज्य शासनातील सत्तेचा वापर करून विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवू. बाजार समितीमध्ये एकहाती सत्ता मिळाल्याने कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आगामी सर्वच निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. तालुक्यातील सर्वच संस्था एका छत्राखाली येण्यासाठी सर्वांना जागरूक राहावे लागेल. कमी बोलणे, जास्त काम करून आपल्याला कामातील बदल दाखवून द्यावा लागेल, असे राजळे म्हणाल्या. स्वागत समारंभ नंतर आमदार व सर्व संचालकांनी बाजार समितीच्या आवाराची पाहणी करत कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या. प्रास्ताविक तालुका संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले. आभार संचालक अजय रक्ताटे यांनी मानले.