प्रतिनिधी | सोलापूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
सात रस्ता येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तेथे पाहिले असता, कार्यालयाला कुलूप लागल्याचे दिसले. तेथे अनेक गैरसोयी आहेत. पाणी नाही, सुरळीत वीजपुरवठाही नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नव्याने बांधलेल्या महसूल भवन येथे शुक्रवारी एकही विभाग सुरू झाला नाही.
काम कसे करू नये याचे उदाहरण म्हणजे सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली होती. त्याचा प्रत्यय सोलापूरकरांना शुक्रवारी ठळकपणे आला. तब्बल चौदा वर्षांच्या वनवासानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले आणि दुसऱ्या दिवशी हे कार्यालय लोकांसाठी कार्यान्वित झालीच नाही. त्यासाठी काही हालचालही दिसली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद अवस्थेत दिसले.
ना पाणी ना वीज, इंटरनेट आदी सुविधाही नाहीत
जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केल्यानंतर तेथे पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी सोयी तेथे नाहीत. त्यामुळे तेथे कार्यालय सुरू करण्यात अडचणी आहेत. तेथे वीजपुरवठाही सुरळीत नसल्याचे सांगण्यात आले. अंतर्गत इंटरनेटची व्यवस्था नाही. काही पंखे बंद आहेत. यामुळे कार्यालये हलवण्यात अडचण येत आहेत.