अहमदनगर41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्काची आकारणी केली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजातील कांदा मार्केट येथे सोमवारी नेवासे तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा निर्यात शुल्काच्या केंद्र सरकारच्या आदेशाची होळी केली.
जानेवारी ते मे 2023 या कालावधीत बहुतेक ठिकाणी कांदा उत्पादकांच्या शेतावर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये जतन करून ठेवलेला निम्म्याहून अधिक कांदा सडला. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च सुद्धा निघलेले नाही. त्यात भर म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्के करून कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले. त्यावर कांदा उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष आहे. जोपर्यंत केंद्र सरकार हानिकारक निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत घोडेगाव कांदा मार्केट हे बंद ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिअप्पा तुवर, तालुकाध्यक्ष त्र्यंबक पाटील भदगले, युवा आघाडी अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खराडे पाटील, शेतकरी संघटना प्रसिद्धी प्रमुख सागर लांडे, राजेंद्र दरंदले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, शरद जोशी विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष अंबादास पाटील कोरडे, पंढरीनाथ कोतकर, दौलतराव गणगे, दादासाहेब नाबदे, गोरक्षनाथ महाराज साळुंखे, अनिल दरंदले, संदीप बेल्हेकर, भाऊसाहेब बेल्हेकर, अशोकराव बेल्हेकर, सोमनाथ बेल्हेकर, रामभाऊ दरंदले, रामकृष्ण आगळे, माऊली चौधरी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक येळवंडे, सुदाम तागड, शरद पाटील सोनवणे, राजेंद्र बऱ्हाटे, संतोष वाघ, दिगंबर सोनवणे व शेतकरी या आंदोलनात सहभागी होते. सोनई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक माणिक चौधरी व त्यांच्या सर्व पोलिस कर्मचारी यांचा यावेळी मोठा बंदोबस्त तैनात होता.