2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गाव विक्रीचा ठराव करण्यासाठी जमलेले ग्रामस्थ.
कांद्याला भाव मिळत नाही म्हणून नाशिकमधील माळवाडी हे गावच गावकऱ्यांनी विक्रीला काढले आहे. सर्व गावकऱ्यांनी मिळून तसा ठरावही केला आहे. लवकरच हा ठराव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे.
4 वर्षांपासून भाव नाही
सोमवारी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. माळवाडी गावातील 95 टक्के शेतकरी हे कांदा उत्पादक आहेत. याशिवाय नगदी पिक म्हणून काही जण भाजीपालाही लावतात. मात्र, गावकरी घेत असलेल्या कोणत्याही पिकाला गेल्या 3 ते 4 वर्षांत योग्य भाव मिळाला नाही, असा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला. गावातील सर्व कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती आहे. मात्र, शेतीमालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहासाठीही पैसे राहत नाही. आरोग्य, शिक्षण, लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाच शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून मिळत नाही. त्यामुळे हे गावच विकावे व त्यातून पैसे मिळावेत, असा ठराव ग्रामस्थांनी केला आहे.
बँकांचे कर्ज कसे फेडायचे?
मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठीच पैसे राहत नाही, तर बँकांचे कर्ज कसे फेडायचे?, असा सवालही बैठकीत काही ग्रामस्थांनी केला. खासगी तसेच सरकारी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी गावातील शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय नसल्याने संपूर्ण फुले माळवाडी गाव विकण्याचा ठराव सभे पास केला आहे. विशेष म्हणजे सर्व ग्रामस्थांनी या ठरावाला मंजुरी दिली.
सरकारनेच गाव विकत घ्यावे
ग्रामस्थांच्या सभेत राज्य सरकारकडे काही मागण्याही करण्यात आल्या. पुर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करता येईल, इतपत त्याच्या मालाला भाव मिळावा, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी. शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे, ते सरकारनेच विकत घ्यावे, अशी मागणी देवळा तालुक्यातील या ग्रामस्थांनी केली आहे.
यापूर्वीही परभणीतील गाव विक्रीला
दरम्यान, शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून ग्रामस्थांनी गावच विक्रीला काढल्याची ही पहिली घटना नाही. राज्यात यापूर्वी परभणी जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांनीही असा ठराव घेतला होता. गाव विक्रीला काढले आहे हे इतरांच्या लक्षात यावे म्हणून येथील ग्रामस्थांनी तसे फलकच प्रमुख मार्गांवर लावले होते. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊनही गावाला रस्ते, पाणी अशा मुलभूत सुविधा मिळत नाही, पीक विम्याचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली होती.
संबंधित वृत्त
अजित पवारांची ग्वाही:अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान, अधिवेशनात आवाज उठवणार, शेतकऱ्यांनी चिंता करू नये
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर आवाज उठवू. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. वाचा सविस्तर