नागपूर32 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भाजपच्या पराभवामुळे काही लोकांना देश जिंकल्यासारखे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. आम्ही वार्डाच्या निवडणुकीत हरलो तरी विरोधकांना त्यात मोदीशहांचा पराभव दिसतो, अशी उपरोधीक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
कर्नाटकमध्ये भाजपाला अपेक्षित यश आले नाही. एखादा अपवाद वगळला तर 1985 पासून कुठलेही सत्तेतील सरकार पुन्हा जनतेने निवडून दिले नाही. सरकार सतत बदलत असते. यावेळी ही मालिका खंडित करण्याची आम्हाला शाश्वती होती. पण, तसे झाले नाही. थोडे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, 2018 मध्ये आमच्या 106 जागा आल्या होत्या, तेव्हा 36 टक्के मते आम्हाला मिळाली होती. आता 2023 मध्ये ती 35.8 टक्के इतकी आहेत. भाजपाची मते केवळ 0.2 टक्के कमी झाली. पण, जागा 40 ने कमी झाल्या.
जेडीएसची मते गेल्या निवडणुकीपेक्षा 5 टक्क्यांनी कमी झाली आणि ती संपूर्ण 5 टक्के मते काँग्रेसला मिळाली. त्यांना जागांचा मोठा फायदा झाला. भाजपाच्या मतांवर परिणाम झालेला नाही. आज आनंद साजरा करणाऱ्यांनी विधानसभेचे निकाल आणि त्यानंतर लगेच लागलेले लोकसभेचे निकाल हेही एकदा तपासून पहावे. त्यात अंतर आहे. शनिवारीच उत्तरप्रदेशात महापालिकांमध्ये भाजपाने एकहाती आणि सर्व ठिकाणी सत्ता प्राप्त केली आहे.
निपाणीच्या लोकांनी माझे ऐकले आणि राष्ट्रवादीचा उमेदवार “पॅक’ करुन परत पाठविला. त्यांच्या पक्षाला 0.27 टक्के मते मिळाली आहेत. निपाणीच्या जनतेने माझे ऐकले. शनिवारी उत्तर प्रदेशमधल्या लोकल बाॅडीच्या निकालात भाजपा वन साईड निवडून आली. उत्तर प्रदेश जिंकतो तो देश जिंकतो अस म्हणतात.
काही लोक “बेगाने शादी मे अब्दुल दिवाना’ अशी काही लोकांची स्थिती आहे. या लोकांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरी झालेल्या मुलांचा आनंद साजरा केला, अशी टीका शिवसेनेवर केली. या निकालाचा महाराष्ट्र आणि देशाच्या निकालावर काही परिणाम होणार नाही आणि मुंगेरीलाल के हसीन सपने कधी पूर्ण होणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले.