अमरावती34 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतही जायला आवडेल. परंतु त्यासाठी मी त्यांच्याशी बोलणार नाही, गरज वाटत असेल तर त्यांनी माझ्याशी बोलावे, अशी अट घातली आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अंमलकार यांच्या प्रचारार्थ अॅड. आंबेडकर यांनी आज, रविवारी येथे मेळावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेसोबत युतीची चर्चा झाली आहे. परंतु घोषणा नेमकी केव्हा करायची, हे अद्याप ठरले नाही. सध्या निवडणूक प्रचारार्थ मी विदर्भात आहे. तर आमचे प्रदेशाध्यक्ष माणवत येथील मेळाव्याच्या तयारीत व्यग्र आहेत. त्यामुळे युतीची घोषणा आज-उद्या होईल, हे कदापि शक्य नाही. त्यासंदर्भात आलेल्या बातम्या ह्या खऱ्या नाहीत.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना अॅड. आंबेडकर यांनी त्यांचा अजेंडाही स्पष्ट केला. ते म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण (एनइपी) हे कालसुसंगत नसून ते राज्यावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पावर कोठलाही बोजा येत नसतानासुद्धा भलतेच मुद्दे पुढे करुन जुनी पेन्शन योजना नाकारली जात आहे. शिवाय नेट-सेट झाल्यानंतर प्राध्यापक म्हणून नोकरीत लागलेल्यांचा नोकरीच्या कायमीकरणासह पदोन्नती आणि निवृत्तीवेतनाचा मुद्दा आहे. या तिन्ही मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडी मतदारांच्या सोबत असून हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रा. निशा शेंडे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई, विधानपरिषदेचे उमेदवार अनिल अंमलकार, प्रा. प्रफुल्ल राऊत, डॉ. दिलीप सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
घोळ संपवण्यासाठी आमची एंट्री
पूर्वी या मतदारसंघात राजकीय लूडबूड नसायची. संघटनात्मक पातळीवर ही निवडणूक व्हायची. त्यामुळे समविचारी संघटनेला पाठिंबा देऊन आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करायचो. परंतु अलिकडे राजकारण्यांचा घोळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोकण वगळता विधान परिषदेच्या उर्वरित चारही जागा वंचित बहुजन आघाडीने लढण्याचा निर्णय घेतल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.