एका तासापूर्वी
- कॉपी लिंक
काँग्रेसमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे मोठे वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर अनेक नेते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील मोठा भूकंप होणार असल्याचे भाकीत भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय गोटात खळबळ उडली आहे. कोणते आमदार बाहेर पडणार? ते कोणत्या पक्षात जाणार याविषयी सुजय विखे पाटील यांनी काहीही न सांगता सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे ते नेते नेमके कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ही तर सुरुवात असेल
सुजय विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे ठरावीक लोकच मलाई खात होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे एकनाथ शिंदे हे निमित्तमात्र ठरले. मात्र शिवसेनेच्या आमदारांमध्ये जशी अस्वस्थता होती. तशीच अस्वस्थता आता काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. इतर पक्षच नव्हे तर त्यांच्या पक्षातील मंत्री देखील त्यांचे काम करत नव्हते. त्यामुळे भविष्यकाळात काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. राज्यातील जनताही पाहिल. ही तर सुरुवात असेल, असेही सुजय विखे पाटील म्हणाले.
हेच काँग्रेसचे दुर्देव
सुजय विखे पाटील म्हणाले, प्रत्येकजण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे. हेच काँग्रेसचे दुर्देव आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगून पक्षाला काहीच योगदान दिले नाही. नव्या पिढीला वारंवार नाकारून त्यांना लांब केले. त्यामुळे अनेक युवक बाहेर पडले. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच शेवटचा तरुण राहणार आहे. तो म्हणजे राहुल गांधी.