मुंबई32 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पेणचे माजी नगराध्यक्ष तथा पेण अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी शिशिर धारकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. ते 250 गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यांच्यासोबत पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
राजकारणापासून झाले होते दूर
शिशिर धारकर यांनी गत काही वर्षांपासून राजकारणापासून अंतर राखले होते. पण आता ते ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा राजकारणाच्या मैदानात उतरलेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी पक्षासाठी अंग झटकून काम करण्याचा मानस व्यक्त केला.
कोण आहेत शिशिर धारकर?
शिशिर धारकर पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी होते. त्यांच्यावर 500 कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पेण शहरात त्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याचीही माहिती आहे. पण त्यानंतरही ठाकरे यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी 2-3 वेळा पक्षप्रवेश करण्याचा प्रयत्न
उल्लेखनीय बाब म्हणजे शिशिर यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी आतापर्यंत 2-3 वेळा प्रयत्न केले होते. पण काही कारणांमुळे त्यांचा प्रवेश झाला नाही. पण आता उद्धव ठाकरे यांनी शिशिर धारकर पिता पुत्रांना पक्षात स्थान दिल्यामुळे त्यांना किती बळ मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिशिर धारकर यांचे काही वर्षांपूर्वी पेण मतदारसंघावर वर्चस्व होते. पण सध्या हा मतदार संघ भाजपच्या रविंद्र पाटील याच्या ताब्यात आहे. पेण नगरपालिकेवरही भाजपची सत्ता आहे.
धारकर यांचे वडील होते राज्यमंत्री
शिशिर धारकर यांचे वडील आप्पासाहेब धारकर काँग्रेसच्या काळात राज्यमंत्री होते. ते 1980 ते 1986 व 1990 ते 1996 या काळात विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात त्यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले होते.