कस्तुरीगंध: ‘विद्यालंकार’: बॉम्बे युनिव्हर्सिटीवरचे मिसाइलप्रा. विजय तापस

Advertisement

एके काळी मराठी नाटकवाल्यांच्या जगात ‘विठ्ठल नारायण कोठीवाले’ म्हणजे कोण, असा प्रश्न विचारण्याची कोणाची शामत नव्हती, तशी गरजही विसाव्या शतकात कधी कोणाला वाटण्याची निकड नव्हती. याचं अतिशय साधं, सोपं कारण म्हणजे अगदी १९३० पासून ते त्यांच्या १९७८ मधल्या मृत्यूपर्यंत, नाटकवाल्यांच्या रोजच्या गप्पांमध्ये ‘विठ्ठल नारायण कोठीवाले’ यांचा उल्लेख व्हायचाच व्हायचा. हा माणूस नाटय़कलेत चहूअंगांनी इतका आरपार घुसलेला होता की, कधी दिग्दर्शक म्हणून, कधी तालीम मास्तर म्हणून, कधी नाटक कंपनीचा ‘म्यानेजर’ (आणि नंतर ‘आनंदविलास संगीत मंडळी’ कंपनीचे मालक म्हणूनही) म्हणून, तर कधी समीक्षक म्हणूनही दिवसाचे चोवीस तास ते नाटकातच असायचे. अवघं ‘मॅट्रिक’पर्यंतचं शिक्षण घेतलेल्या कोठीवाले यांनी त्यांचे नाटय़लेखनातले गुरू म्हणून ‘गडकरी मास्तरां’ची मनोगाभाऱ्यात तरुणपणीच प्रतिष्ठापना केली होती. या माणसाकडे नाटकाचा तुडुंब अनुभव होता. गडकरी मास्तरांच्या नाटकांनी प्रेरित होऊन कोठीवालेंनी नाटय़लेखनाला सुरुवात केली. चारदोन नव्हेत तर रग्गड तीसेक नाटकं त्यांनी लिहिली. त्यांचं भाग्य असं की, त्यांची अपवाद करता सर्वच नाटकं रंगभूमीवर आली आणि गाजलीही. बरं, ही सगळी नाटकं एका ठरावीक साच्यातली, एकाच एका जॉनरची नव्हती हा त्यांचा विशेष! त्यात काही पौराणिक, काही ऐतिहासिक, काही निव्वळ काल्पनिक आणि काही सामाजिक होती. त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ‘संगीत महात्म्याचा सत्याग्रह’, ‘धर्मसंग्राम’, ‘सोन्याचा धूर’, ‘पहिला पेशवा’, ‘ताई तेलीण’, ‘समाजसत्ता’, ‘गुरांचा बाजार’, ‘ग्रामोद्धार – गांवगाडा’ आणि ‘संगीत विद्यालंकार’ यांचा खास समावेश होतो. त्यांच्या नाटकांचे प्रयोग करण्यात महाराष्ट्रातल्या अग्रणी कंपन्या आघाडीवर होत्या, कारण ‘कोठीवाले यांचं नाटक म्हणजे गर्दी’ हे समीकरण तोवर पक्कं बसलं होतं. ‘रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी नाटकाला सर्व शक्तिनिशी सावरून धरायचे मोठ्ठे काम विठ्ठलरावांच्या नाटकांनी केले,’ असे नटश्रेष्ठ बालगंधर्वानी म्हटलं ते उगीच नव्हे! मला त्यांचा एक विशेष फार भावतो. त्यांनी केवळ नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित केली नाहीत तर त्यांनी नाटय़सृष्टीशी संबंधित असे संदर्भग्रंथही निर्माण केले. आज २०२२ मध्ये जितक्या म्हणून नाटय़संस्था आहेत, त्यांच्याकडे स्वत:च्या नाटकांशी संबंधित दस्तऐवज अभावानेच सापडतील. या पार्श्वभूमीवर कोठीवालेंनी ‘१८८५ ते १९५० पर्यंतच्या महाराष्ट्रातल्या नाटय़संस्था’ असं मोलाचं काम पुस्तकरूपाने अगोदरच करून ठेवलं आहे. त्यांच्या नाटकाहूनही हे काम अधिक महत्त्वाचं आहे यात दुमत नाही. कोठीवाले यांनी आयुष्यभराचा ध्यास घेतलेल्या मराठी नाटकांच्या संदर्भात जो सर्वसमावेशक, म्हणजेच ‘होलिस्टिक अॅप्रोच’ घेतला आणि तसा तो घेऊन जे काम केलं त्याला तोड नाही. कोठीवाले अनेक बाबतीत ‘अनुकरणीय’ होते यात तिळभरही शंका नाही!

कोठीवाले यांच्या ‘विद्यालंकार’ या शैक्षणिक संगीत नाटकाचा विषय विसाव्या शतकातल्या शेकडो मराठी नाटकांपेक्षा इतका वेगळा आहे की, ते नाटक आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही. इंग्रजांच्या प्रेरणेनं- किंबहुना त्यांची गरज म्हणून, भारतात शिक्षणाला अतोनात महत्त्व प्राप्त झालं. ‘ज्याच्या सत्तेचं जे उद्दिष्ट, तसं त्याचं शिक्षणविषयक धोरण’ हे सूत्र आणि त्याची अपरिहार्यता एकदा लक्षात घेतली की, अमुक कालखंडात अमक्यातमक्या देशात ज्या प्रकारच्या शिक्षणाचा पाया घातला जातो त्याचं एक तर्कशुद्ध उत्तर आपण देऊ शकतो. जेते आपली जीवनपद्धती, भाषा, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि आपली खाद्यसंस्कृतीसुद्धा जित राष्ट्रावर अशी काही लादतात, की त्या विळख्यातून ते राष्ट्र सहजासहजी बाहेर पडूच शकत नाही. ही वस्तुस्थिती राणीच्या साम्राज्याच्या मांडलिक असणाऱ्या हिंदूुस्थानात होती. ब्रिटिश सत्तेने जिथे जिथे कॉलनीज् वसवल्या तिथे तिथे त्यांनी स्वत:ची साम्राज्यपोषक शिक्षणव्यवस्था निर्माण केली आणि समर्थपणे राबवली. १८५७ मध्ये भारतात ज्या बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता विद्यापीठांचा पाया राणीने घातला, त्या विद्यापीठांना अल्पावधीत अशी काही प्रतिष्ठा प्राप्त झाली की विद्यापीठीय शिक्षण म्हणजे यशस्वी जीवनाचा प्राणवायू झाला. ब्रिटिश सत्तेचं शैक्षणिक धोरण हिंदूस्थानातल्या शासनव्यवस्थेत नेटिव्ह मंडळींना दुय्यम-तिय्यम स्तरावर सामावून घेऊन; आणि त्यांना त्यांच्याच बांधवांवर शासन करायला लावून ब्रिटिशराज भक्कम करण्याचंच होतं यातही शंका नाही. महाराष्ट्रात एका बॉम्बे युनिव्हर्सिटीची स्थापना होताच इथला शिक्षणाचा नूर कसा पालटला; आणि त्यातून समाजात नवी वर्णव्यवस्था कशी निर्माण झाली यांचे गाडीभर पुरावे आजही उपलब्ध आहेत. सत्तेची शिक्षणविषयक दृष्टी जाणीवपूर्वक आणि अत्यंत निगुतीने प्राथमिक शिक्षणस्तरापावेतो झिरपत गेली, परिणामत: मराठी मुलखात एका नव्याच आचार-विचार संस्कृतीचा स्फोट होऊन ती संस्कृती रानगवतासारखी फोफावत गेली. ही संस्कृती यशस्वी होणारच होती, कारण तिला आवर घालेल अशी शैक्षणिक संस्कृतीच आपल्याकडे नव्हती हे सत्य!

Advertisement

विठ्ठल नारायण कोठीवाले यांना या नव्याने उदयाला आलेल्या, तरुणांच्या आशा-आकांक्षांना पदवीचं आणि सरकारी खात्यात ‘लोअर वा अप्पर डिव्हिजन क्लर्क’ होण्याचं आळण घालणाऱ्या विद्यापीठीय शिक्षणाबद्दल पराकोटीचा तिटकारा, संताप असावा. त्याचे अनंत पुरावे त्यांनी ५ जानेवारी १९४६ रोजी ग्रँट रोडच्या ‘बॉम्बे थिएटर’ नाटय़गृहात ‘गंधर्व नाटक मंडळी’ने सादर केलेल्या ‘विद्यालंकार’ या एकाच नाटकात मांडून ठेवले आहेत. अर्थात त्यांच्या संतापाच्या मागे प्रत्येक वेळी लॉजिकल क्लॅरिटी आहे असं नाही. अनेकदा त्याचा संताप, त्यांनी आधुनिक शिक्षणाबद्दल केलेली विधानं आधुनिक काळ- आधुनिक विचार- आधुनिक वर्तनपद्धती या निकषांवर लुळीपांगळी आणि अतिरेकी ठरतात. त्यांच्या अशा विधानांची अवस्था ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ या जातीची आहे. समाजातल्या प्रत्येक बऱ्यावाईट गोष्टीसाठी ते नव्या शिक्षणव्यवस्थेला जबाबदार धरतात तेव्हा आज आपल्याला त्यांची कीव करावीशी वाटते. त्यांच्या अशा भूमिकेमुळे ते नवतेला आंधळा नकार देणारे कर्मठ पुराणमतवादी वा जर्जर मतांचीच घोडी नाचवणारे प्रचारक मात्र वाटतात. त्यांचा या नाटकातला नायक बी.ए.ची पदवी हाताशी असूनही घरात बेकार बसलेला विद्याधर म्हणजे जणू खुद्द नाटककार कोठीवालेच आहेत. (कारण तो जे बोलतो तेच नाटककाराने स्वत:ची भूमिका म्हणून प्रस्तावनेत सविस्तर मांडलं आहे.) या विद्याधराची सगळी शक्ती तत्कालीन बॉम्बे युनिव्हर्सिटीवर- तिची धोरणं आणि कारभार यावर यथेच्छ टीका करण्यात आणि उठताबसता नव्या शिक्षण पद्धतीचे वाभाडे काढण्यात वाहून जाताना दिसते. या विद्याधराचं एक वाढीव दुखणं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही उच्चशिक्षण घेण्याची प्राप्त झालेली संधी हे आहे. नाटकातली त्याची सख्खी बहीण विद्यागौरी बी.ए. होण्याच्या आकांक्षेने घरादारावर लाथ मारून एका संभावित ‘शैक्षणिक गुंड’ असलेल्या लिंगपिसाट प्रोफेसरच्या नादी लागून स्वत:ला संकटांच्या खाईत लोटते, (प्रोफेसरांवर ती आंधळा विश्वास टाकायचं कारण म्हणजे, ते तिला बी.ए.च्या वर्गात प्रवेश मिळवून देण्याचं आणि तिच्या फीची व्यवस्थाही करण्याचं आश्वासन हे आहे.) तेव्हा हा कट्टर पुराणपुरुष नायक निर्थक बडबड करत राहतो. जणू तो बहिणीला त्या खाईत उडी घेऊ देतो आणि मग तिला परत घरी आणण्यासाठी मोठा पुरुषार्थ दाखवायला सिद्ध होतो. नाटकातली इतर पात्रं फारसा विचार नसलेली, चारित्र्याच्या बाबतीत बरीचशी सैल भासणारी किंवा अवास्तव भाबडेपणाने वागणारी आहेत. या नाटकाचा गाभा हा इंग्रजी सत्तेने भारतात रूढ केलेल्या शिक्षणपद्धतीला, त्यातील अपुरेपणाला आणि तरुण पदवीधरांना रोजगार द्यायला नालायक ठरलेल्या कमकुवतपणाचा आहे. या स्थितीचे भरपूर पुरावे पात्रांच्या आपसात चाललेल्या संवादांत सापडतात. मला असं वाटतं की, इंग्रजी शिक्षणाला पर्याय ठरणारी आणि रोजगार द्यायला सक्षम असणारी कोणतीही व्यवस्था जर आपल्याकडे अस्तित्वातच नव्हती, तर आहे त्या शिक्षणव्यवस्थेला नकार देण्यात, ती व्यवस्था सतत टीकेच्या तोंडी देण्यात आणि ‘इंग्रजी शिक्षणाने समाजाची नीतिमत्ता बिघडली’ असं म्हणण्यात एक प्रकारच्या आत्मवंचनेचे रंग मिसळले आहेत. इंग्रज सत्ता इथे येण्यापूर्वी जणू भारतीय समाजात उपयुक्त ज्ञानाची आणि नोकऱ्या मिळवून देण्याला उपकारक ठरणाऱ्या ज्ञानाची गंगाच वाहत होती! अर्थात असं म्हणणं हा खोटारडेपणा किंवा अवास्तव भाबडेपणा तरी ठरतो.

अर्थात ‘विद्यालंकार’ नाटकाच्या बाबतीत मी असं म्हणेन की, हे नाटक ऐतिहासिक दृष्टीने पाहता मला महत्त्वाचं वाटतं, कारण ते तेव्हाच्या शिक्षण क्षेत्रात सरसकट आढळून येणाऱ्या अपप्रवृत्ती अतिशय रोखठोकपणे कुणाचीही भीती न बाळगता व्यक्त करत राहतं. या नाटकातला इंग्रज सरकारधार्जिण्या शिक्षणावरचा जो तीव्र आक्षेप आहे त्यामागे ‘हे शिक्षण भारतीय ज्ञानसंस्कृती, देशहित, भारतीय नीतिमत्ता यांची हानी करून तरुण पदवीधरांना स्व-समाजापासून दूर करून ब्रिटिश सत्तेच्या लाभासाठी प्रवृत्त करणारे आहे.’ हे गृहीतक आहे. ‘‘The most important branch of education in my opinion is that, designed to prepare natives for public employment… The result of Educating natives both in English and in their own language must be favourable to the progress of Christianity’’ हे लॉर्ड एल्फिन्स्टनचे आणि याचसारखे इतर ब्रिटिशांचे उद्गार या गृहीतकाला बळकटी देणारे होते. इंग्रजांनी प्राथमिक ते विद्यापीठीय शिक्षणात जो आरपार हात घातला, त्यामुळे ‘नेटिव्ह’ मंडळी अधिक भयभीत झाली हे निर्विवाद सत्य आहे. बरं, इंग्रज केवळ विद्यापीठीय शिक्षणावरच थांबले होते असं नाही, तर ते प्राथमिक शिक्षण ते तत्कालीन मॅट्रिकच्या परीक्षेपर्यंतच्या शिक्षणाची सारी घडीच त्यांच्या सोयीने बसवत होते. (सध्या महाराष्ट्रात आणि देशात विविध देशांतील विद्यापीठांच्या शाखा उभ्या राहत आहेतच. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल स्कूल्स आणि तिथे रुजवली जाणारी संस्कृती यातून एक नवा वर्ग उदयाला येतो आहे. या वर्गाची मानसिकता सहजच ब्रिटिशकाळातल्या रावबहादूरांसारखी परदेशलोभी होते आहे. ‘‘असं होण्यात गैर काय, तुम्ही नस्ता कांगावा करता बुवा! काही नाही आपली संस्कृती मरत!’’ असा बचाव तर हल्ली पदोपदी तुमच्याही कानांवर पडत असेलच की!) आज ज्या ‘मुंबई विद्यापीठा’चं वय १६५ वर्ष आहे त्यावरच नाटकात सर्वाधिक टीका आहे. इथेच एका गोष्टीचा उल्लेख करतो. मला आठवतं त्यानुसार साधारणपणे १९३५ ते १९४५ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या सिंडिकेटचे सभासद होते. विद्यापीठाचे पेपर्स फुटणे, विद्यार्थ्यांनी परीक्षागृहात कॉपी करणे अशा घटना त्या काळात सतत घडत होत्या. या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी तेव्हाच्या कुलगुरूंनी एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी सखोल चौकशी करून विद्यापीठाला एक अहवालही सादर केलेला होता. ही एक गोष्ट कोठीवाले यांच्या बाजूने नोंदवायला काहीच हरकत नाही. पण ते असो. नाटकात- १) ‘‘मुंबई युनिव्हर्सिटी गाढव आहे.’’ २ ) ‘‘मुंबई विद्यापीठातले तुम्ही पेपर तपासनीस म्हणजे निव्वळ कसाई, खाटीक, मांग, राक्षस आहात!’’ ३) ‘‘बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही काय श्रीशंकरांचार्याचं आद्यपीठ मानता का? का अमरत्वाचा वैकुंठ समजता? समजता काय तुम्ही विद्यापीठांना? अहो, बोलूनचालून शिक्षणाच्या नावाखाली चाललेली ती एक बाजारपेठ आहे!’’ ४) ‘‘आम्ही विद्यापीठाचे पेपर्स नुसते सैल हाताने तपासतो असं नाही, तर जरूर भासली तर आम्ही पेपर्स फोडतोदेखील!’’ ५) ‘‘जगातल्या कोणत्याही व्यापारापेक्षा युनिव्हर्सिटीचा व्यापार हा कमालीचा फायदेशीर आहे, जो विद्यार्जनाच्या नावावर राजरोस चालू आहे.’’ ६) ‘‘टिळक-आगरकरांच्या वेळचं शिक्षण युनिव्हर्सिटीने आता बंद केलंय! उद्या सारेच विद्यार्थी टिळक-आगरकर झाले तर सरकारला त्रासच की नाही? युनिव्हर्सिटीचा परीक्षा हंगाम म्हणजे फक्त लक्षावधी कारकुनांची पैदास! सबब, त्याला विद्यापीठ म्हणावं की परीक्षापीठ?’’ ७) ‘‘अलीकडे प्रोफेसरांचा वर्ग गुंडगिरीतूनच युनिव्हर्सिटीच्या सिंडिकेटमध्ये प्रवेश करतोय!’’ अशी या नाटकातली अनेकानेक वाक्यं थेट मुंबई विद्यापीठाशी संबंधित आहेत. यात अगदी पन्नास टक्के अतिशयोक्ती आहे असं मानलं, तरी बुडाशी पन्नास टक्के निवळ सत्य उरतंच. मुंबई विद्यापीठाचा गेल्या तीस-चाळीस वर्षांतला कमालीच्या वेगाने घसरतच जाणारा दर्जा पाहिला की, नाटकात या महान विद्यापीठावर जे ताशेरे ओढले आहेत ते फार अतिरंजित आहेत असं कसं म्हणायचं, ते उमजत नाही. एक गोष्ट मात्र खरी, कोठीवाले यांचं ‘विद्यालंकार’ नाटक ‘नाटक’ म्हणून ग्रेट नसेलही, (तसं ते मुदलात नाहीही) मात्र शहात्तर वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील बिगरी ते पदवीपर्यंतच्या स्तरावरील शिक्षणाची काय अवस्था होती याचं यथार्थ चित्र ते आपल्यासमोर मांडतं. हाच या नाटकाचा ग्रेटनेस! ज्या वाटेने मराठीतला एकही नाटककार गेला नाही, त्या वाटेने कोठीवाले गेले हे नि:संशय सत्य!
vijaytapas@gmail.com

AdvertisementSource link

Advertisement