प्रा. विजय तापस
रुईया महाविद्यालयातील माजी प्राध्यापक असलेले विजय तापस हे नाट्यसमीक्षक व नाट्य-अभ्यासक म्हणून परिचित आहेत. रुईयातील ‘नाट्य-वलय’ संस्थेचे ते बरीच वर्षे मार्गदर्शक होते. त्यांच्या दीर्घ नाट्याभ्यासातून साकारलेले हे सदर…
मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनेक ज्ञात-अज्ञात नाटककारांनी योगदान दिलेलं आहे. या लेखकांपैकी अनेकांची नाटकं प्रत्यक्ष रंगमंचावर काही कारणांनी येऊ शकली नसली तरीही त्या नाटकांतला आशय, विषय, त्यातली मूल्यं निश्चितच दखलपात्र होती. अशा अपरिचित नाटकांची दखल घेणारं पाक्षिक सदर…
मराठी नाटकाच्या इतिहासात डोकावून पाहणं, इतिहासाचा वेध घेणं अनेक कारणांसाठी आवश्यक आहे. लिखित स्वरूपातली सगळीच नाटकं प्रयोगरूपात साकार होतात असं नाही. नाटक रंगमंचावर येणं हे महत्त्वाचं; पण म्हणून लिखित स्वरूपातच राहिलेली नाटकं बिनमहत्त्वाची असतात असं म्हणता येणार नाही. ते अशासाठी की, अशा नाटकांमधूनही विविध प्रकारचे राजकीय- सामाजिक- आर्थिक-सांस्कृतिक दृष्टिकोन साकार झालेले असतात. अशा नाटकांतूनही जीवनदर्शन आणि मूल्यांचे प्रश्न हाताळले गेलेले असल्याने या नाटकांना ‘सामाजिक दस्तावेज’ म्हणून एक विशेषता लाभलेली असते. नाटकांचा आशयशोध हा एका अर्थाने समाजशोध असतो. ‘समाजाचं आकलन करून घेण्याचा एक विश्वासार्ह मार्ग म्हणजे नाटक!’ असं जे म्हटलं गेलं आहे- आणि मान्यही झालं आहे, ते मनात बाळगून इथे काही नाटकांचा अंतध्र्वनी ऐकावा, अधोरेखित करावा असं मनात आहे. या मालिकेतलं पहिलं नाटक आहे ‘संगीत शबरी’!
‘संगीत शबरी’ हे नाटक आहे जवळपास शतकाचं जीवनमान लाभलेल्या चंद्राबाई कर्नाटकी यांचं. १९५७ मध्ये त्यांनी हे नाटक लिहिलं. या बाईंचं हे एकमेव नाटक. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात संस्कृत, इंग्रजी साहित्यात बी. ए. आणि एम. ए. करून पुढे शिक्षणशास्त्रात पदव्या संपादन केलेल्या चंद्राबाई लंडनमधून शिक्षण संपवून परतल्या आणि पुढचं सारं आयुष्य त्या प्राचार्या, शिक्षणाधिकारी म्हणून सर्वोत्तम काम करत राहिल्या. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या शाळेची ही विद्यार्थिनी अखेरीस त्यांनीच उभारलेल्या आश्रमात जीवनाचे सांध्यरंग उपभोगत राहिली. आदर्शवाद आणि सदाचार हे त्यांच्या अविवाहित आयुष्याचे मूलमंत्र होते. तेच त्यांच्या नाटकात उतरले, हे नक्की.
‘‘संगीत शबरी’ हे नाटक अतिशय साधं, सरळ रेषेतलं, बाळबोध आहे,’ असं एखाद्याने म्हटलं तर ते जीव तोडून नाकारता येणार नाही. ‘संगीत शबरी’तसं आहेच; पण ते तेवढंच नाही, हेही नाकारता येणार नाही. नाटकाच्या नावाप्रमाणेच ते एक चरित्रनाटक आहे. अर्थात ते रामचरित्रातल्या हजारो वर्षं टिकून राहिलेल्या ‘शबरी’ची कहाणी सांगणारं आहे. आपल्याला सर्वांना शबरीची प्रभू रामाशी झालेली भेट, तिची रामावरची नि:स्वार्थ, निस्सीम भक्ती आणि तिने राम-लक्ष्मणाचं तिच्या पर्णकुटीत केलेलं स्वागत या सर्व गोष्टी लहानपणापासून माहिती आहेत. तिने राम-लक्ष्मणाच्या हाती स्वत: चाखून पाहिलेल्या, ती गोड असल्याची खात्री करून घेतलेल्या बोरांचे द्रोण दिले, हा या कथेचा उत्कर्र्षंबदू. शबरीने उष्टावलेली बोरं रामाने आत्यंतिक आनंदानं भक्षण केली, हा त्या उत्कर्र्षंबदूचा उत्कर्र्षंबदू! नाटकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत नाटककार असं म्हणते की, ‘शबरीच्या पारंपरिक कथेच्या परिघाबाहेर असलेली जी शबरी मला दिसली आणि भावली, तिच्या त्या दर्शनामुळे मला हे नाटक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.’ इथे एक प्रश्न उभा राहतो की, या नाटककार बाईंना कोणती शबरी दिसली? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ‘संगीत शबरी’ या तीन अंकी नाटकात मिळतं.
नाटककार चंद्राबाई कर्नाटकी यांनी जी शबरी नाटकातून साकारली आहे ती आजच्या भाषेत बोलायचं तर निसर्गप्रेमी/ निसर्गवादी किंवा पर्यावरणवादी आहे. ती ज्या अरण्यात जन्माला आली, वाढली आणि आता वृद्धावस्थेला पोहोचली आहे त्या अरण्याशी तिच्या जीवनाचं, तिच्या श्वासनि:श्वासांचं, तिच्या भावनिक आणि भौतिक जीवनाचं एक अतूट, निरंतर असं नातं निर्माण झालं आहे. तिचा भवताल ज्या अरण्याने व्यापला आहे, त्या अरण्याची ती केवळ वाचक नाही, ती त्या अरण्याची पालक- संरक्षकसुद्धा आहे. ते विशिष्ट अरण्य हा ज्या पशुपक्ष्यांचा अधिवास आहे त्यातल्या प्रत्येक जीवाशी तिचं एक दृढ भावनिक नातं आहे. अरण्याने व्यापलेला भवताल आणि भिल्ल शबरी यांत अंतराय नाही. ती एकाच अस्तित्वाची दोन रूपं आहेत. हे नाटक निसर्गाशी एकरूप झालेलं शबरीचं जगणं चित्रांकित करण्याचा यशस्वी प्रयत्न तर करतंच, पण तिची निसर्गवादी वैचारिक भूमिकाही तिच्या सहज संवादांतून सुबोध करत राहतं. ‘जगण्याचा हक्क हा प्रत्येक प्राण्याचा जन्मदत्त हक्क आहे, त्याला बाधा पोहोचवण्याचा कोणालाही अधिकार नाही. झाडाची पानं ओरबाडून काढणाऱ्यांना वृक्षाचा शोक, विलाप ऐकू येत नाही…’अशा अर्थाची तिची व्यापक आणि करुणामयी भूमिका आहे. संपूर्ण नाटकात ही शबरी भवतालाबद्दल, परस्पर मानवी संबंधांबद्दल, जीवनाच्या श्रेयस-प्रेयसाबद्दल जे बोलते ते आज वाचताना आपल्याला गौतम बुद्धाच्या तृष्णा आणि करुणेविषयीच्या विधानांची आणि शंकराचार्यांच्या अद्वैत भूमिकेची आठवण आल्यास नवल नाही. एका अर्थाने या शबरीमध्ये आपल्याला ‘वाईज ओल्ड वूमन’चा किंवा सार्वत्रिक/ सार्वकालिक मातृरूपाचा अनुभव येत असेल तर तेही स्वाभाविकच म्हणायला हवं. नाटकाच्या तिसऱ्या अंकात तिच्याविषयी लक्ष्मणाशी बोलताना प्रभू रामचंद्र म्हणतात, ‘‘एका शब्दात सांगू तुला? शबरी अन् मी दोन नाही.’’ रामाच्या तोंडी असलेल्या या विधानातून भिल्ल शबरीचं सारं व्यक्तिमत्त्व, तिची उन्नत मानसिकता स्पष्ट होते यात शंका नाही.
या नाटकात मुख्य पात्र आहे ते अर्थातच शबरीचं. संपूर्ण नाटकात संघर्ष म्हणावा तर तो फार अटीतटीचा तर अजिबातच नाही. भिल्ल तरुणी फुली आणि तिच्यावर अनुरक्त झालेले, तिच्यावर प्रेम करणारे सिंगा आणि राणिया हे दोन भिल्ल तरुण. फुलीचा जीव की प्राण असलेल्या सिंहिणीच्या कोवळ्या पिल्लाच्या पायांत सिंगाने सोडलेला विषारी बाण लागणं हीच नाटकातली बघायला गेलं तर एकमेव घटना. मात्र, याच घटनेचा वापर चंद्राबाईंनी दोन तरुण पुरुषांमधली स्पर्धा, स्त्रीवरचा पुरुषाचा अज्ञानमूलक मालकी हक्क, निसर्गप्रेमी वा निसर्गशरण जीवनाचा विचार, प्रेमाची अथांगता, र्अंहसेचं तत्त्वज्ञान यांचं दर्शन घडवण्यासाठी लीलया केला आहे. नाटकातला एक विलोभनीय भाग म्हणजे शबरीचं स्वगत बोलणं. तिची ही स्वगतं सातत्याने प्रभू रामाला उद्देशून साकार झाली आहेत. तिने रामाशी साधलेला तो मनमोकळा संवादच आहे. नाटकातल्या तीन अंकांत मिळून चार पदं असून ती अतिशय सुबोध तर आहेतच, पण त्यातून उमटणारा भक्ती आणि करुणा यांचा हृदयस्पर्शी स्वर मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी मांड,पटदीप, पिलू आणि भैरवी रागांची योजना खूपच संवादी झाली असणार. हिंसा टाळता येते आणि राम सर्वत्र असेल तर प्रत्येकाच्या वर्तनात रामगुण असायला हवा, हाच धडा ‘संगीत शबरी’ने उच्चारून महात्माजींच्या विचारसंचिताशी आपलं नातं दृढ केलं यात शंकाच नाही!
vijaytapas@gmail.com
The post कस्तुरीगंध : चंद्राबाईंची ‘शबरी’ appeared first on Loksatta.