पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
कसबा मतदारसंघात उमेदवार निश्चितीसाठी चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज सकाळी 11 वाजता त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी बोलावली असून भाजपचे शहरातील सर्व प्रमुख नेते बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीस तिकीट दिले गेल्यास, ही निवडणूक बिनविरोध करू असे सूर सुरुवातीला महाविकास आघाडीने लगावले होते. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने सदर मतदारसंघात उमेदवार उभा करणार असल्याचे सांगितले आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची हे दिल्लीतून ठरले जाणार आहे.
काँग्रेस इच्छुकांची नावे पुणे शहर काँग्रेसमार्फत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर ही नावे ही दिल्लीतील हायकमांडला पाठवली जाणार आहेत. त्याचप्रमाणे कसबा पोटनिवडणुकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षकपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने या मतदारसंघात उमेदवारी देण्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक आज बोलवली आहे. अर्ज भरण्याची मुदत 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी आहे. त्यामुळे त्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि भाजप यांना त्यांचे उमेदवार निश्चित करावे लागणार आहेत. दरम्यान, दुरंगी लढत होईल अशी आशा असतानाच कसबा पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता तिरंगी लढत होणार असल्याने निवडणूक मध्ये चुरस निर्माण झाली आहे.