प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
१९५०-६० च्या दशकाचा काळ म्हणजे समृद्ध असा साहित्य-कला क्षेत्रातील दिग्गजांचा काळ. चित्रकार रघुवीर मुळगांवकर, दीनानाथ दलाल, एस. एम. पंडित यांनी तर मराठी घराघरांत प्रवेश केला होता. शिवाय अनेक कलाकार साहित्य क्षेत्राला नटवीत होते, सजवीत होते व त्यातील कित्येक जण आम्हाला जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयात येऊन मार्गदर्शनही करीत होते. त्यापैकी एक आदरणीय नाव म्हणजे चित्रकार व्ही. एस. गुर्जर! ज्यांची कैक चित्रे मी ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘सत्यकथा’, ‘रहस्य रंजन’ व कित्येक बालकथांमध्ये पाहत आलो होतो.
तसे पाहिले तर गुर्जरांचे व्यक्तिमत्त्व फारसे आकर्षक असे नव्हते. उंचीने थोडे बुटके. मात्र, ते नेहमी सुटाबुटात असत. डोक्यावर त्या काळातील साहेबी हॅट. डोळ्यावर चष्मा. नजर बारकाईने सर्वत्र फिरत असलेली. ते जेव्हा शिकवायला जे. जे.मध्ये येत असत तेव्हा वर्गात आल्यावर आपली हॅट काढून काखेत पकडीत. तसेच मधूनमधून दुमडलेल्या हाताला झटके देण्याची सवय त्यांना होती. मुख्य म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या हातात एक मोठा पेन्सिलचा जुडगा असे. त्या सर्व पेन्सिली नीट टोक काढलेल्या असत. यामध्ये एच. बी.पासून सर्व ग्रेडच्या पेन्सिल्स असत. जशी शेडची गरज पडे त्याप्रमाणे त्यातील एकेका पेन्सिलचा वापर होत असे. नंतर समोर मॉडेल बसले की आम्ही गोलाकार त्याच्या सभोवताली बसत असू, अन् आमच्या बोर्डवरील कागदाप्रमाणे मोजमाप घेऊन आमचे रेखाटन सुरू होत असे. गुर्जर सर आमच्यावर बारीक लक्ष ठेवून असत. त्यात जर कोणी चुकला तर त्याच्या जवळ जाऊन स्वत: ते त्याचे चित्र सुधारत असत. गुर्जर सरांचे प्रात्यक्षिक शिस्तबद्ध पद्धतीने चाले. प्रथम ते पेन्सिलच्या पाठचे टोक पकडून, पेन्सिल लांब धरून सैलशा हाताने मॉडेलचा अंदाज घेऊन एकदम हलकीशी आउटलाईन काढत असत. त्यानंतर हळूहळू त्यातील खोली वाढवीत नेत. प्रात्यक्षिकाच्या वेळेस अथवा बहुतेक वेळा ते आपले ड्रॉइंग खोडण्यासाठी रबर वापरीत नसत, इतकी त्यांची रेषा हुकमी असे. त्यामुळे कित्येकदा त्यांनी केलेल्या पेन्सिल ड्रॉइंगवर पुसट रेषा दिसत.
या थोर चित्रकाराचा- विष्णू सीताराम गुर्जर यांचा जन्म २० जानेवारी १९१० रोजी रत्नागिरी येथे झाला. बालवयापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या गुर्जरांची चित्रसंपदा सतत सुरू असे. पुढे जेव्हा मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, तेव्हा आर्ट स्कूलची ती भव्य इमारत, तेथील गर्द झाडीने वेढलेले निसर्गरम्य वातावरण पाहून कुमारवयातील गुर्जर एकदम गांगरून गेले. बाहेरूनच जे. जे.चे वैभव न्याहाळत असताना एखाद्या सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे पेहराव असलेली एक रुबाबदार व्यक्ती तिथे आली आणि त्यांनी या बावचळून उभ्या असलेल्या मुलाची चौकशी केली. त्यांचे वय या अभ्यासासाठी अद्याप लहान असल्याचे सांगून, ‘तू काही चित्रे काढली आहेस का?’ असे त्यांनी विचारताच गुर्जरांनी सोबत आणलेली आपली चित्रे त्या व्यक्तीला दाखवली. ती पाहताच त्या व्यक्तीने संस्थेच्या हेड क्लार्कना बोलावून घेतले व त्यांना या विद्यार्थ्यांचे नाव प्रथम वर्षांच्या वर्गात नोंदवून घेण्यास सांगितले. नंतर चौकशी करता जेव्हा गुर्जरांना कळले, की ती व्यक्ती म्हणजे त्यावेळचे ते जे. जे.चे मुख्याध्यापक होते आणि ज्यांचे नाव गाजत होते असे ते सुप्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर होते, तेव्हा गुर्जरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्याशी संभाषण झाल्याने आपले आयुष्य धन्य झाल्याचे त्यांना वाटले.
१९२८ साली त्यांचा डिप्लोमा पूर्ण झाला. यादरम्यान गुर्जरांना लाईफ पेंटिंग आणि मेमरी या विषयांत प्रथम पारितोषिक मिळाले. याशिवाय त्यांना १९२६ ते १९३२ पर्यंत सातत्याने स्कॉलरशिप मिळाली होती. १९२७ साली आर्ट स्कूलचे प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्या हस्ते त्यांना ‘कॉम्पोझिशन’ या स्पर्धेतील पारितोषिकाचा सन्मान मिळाला. स्कूल ऑफ आर्टच्या सन्माननीय अशा ‘डॉली करसेटजी प्राइझ’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले. स्कूल ऑफ आर्टपासूनची त्यांची बक्षिसे व पदके मिळवण्याची ही परंपरा त्यांनी पुढेही आपल्या व्यावसायिक जीवनात सदैव राखली. आपले उच्च कलाशिक्षण नैपुण्याने प्राप्त केल्यानंतर गुर्जर घाटकोपर येथील ‘रवी उदय प्रेस’मध्ये काम करू लागले. रवी उदय हा त्या काळातील एक मोठा प्रेस होता- जेथे अनेक प्रकारची कॅलेंडर्स, लेबल्स छापली जात असत. गुर्जर तेथे प्रमुख चित्रकार म्हणून काम पाहू लागले. त्यावेळी गुर्जरांनी सुमारे ३०० कॅलेंडर डिझाइन्स बनवली. कित्येक आकारांतील लेबल डिझाइन्स साकारली. पण दुसरीकडे चाकरी करण्याचा त्यांचा पिंड नव्हता.
दरम्यान त्यांनी फ्रेंच ब्रिज येथे स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. आपल्या जीवनात व कामात त्यांनी एक शिस्त पाळली होती. गुर्जरांना बाहेरील कामे भरपूर मिळत असत. पण केवळ त्यामध्ये ते समाधान मानत नसत. निरनिराळ्या कला प्रदर्शनांसाठी त्यांची चित्रसंपदा सुरूच असे. गुर्जरांनी अनेक विषय कलाविष्कारासाठी निवडले. पण कोळी जीवन हा त्यांचा खास आवडीचा विषय. त्यांचे रंगभान व जीवन गुर्जरांना नेहमीच आकर्षित करीत असे. त्यांची बहुतेक चित्रे कोळ्यांच्या जीवनाने नटलेली आहेत. मग ते कोळीनृत्य असो, समुद्रात जाळे फेकणारा कोळ्यांचा समुदाय असो किंवा बाजारात मासळी विकण्यास बसलेली धिवर-कन्या असो.. गुर्जरांचा कुंचला कोळ्यांच्या वेशभूषा, अंगावरील दागिने, विशिष्ट पद्धतीने बांधलेले त्यांचे केस आणि माळलेले गजरे या सर्व गोष्टी रंगांची उधळण करीत आविष्कृत करीत असे. आणि त्याकरताच ते कोळ्यांच्या जीवनाशी समरस झाले होते. त्यांनी एकदा लिहिले होते, ‘‘जे चित्र मी योजतो त्या चित्राचे रफ स्केच करून मी नेहमी हाताशी ठेवतो व मगच प्रत्यक्ष चित्राला सुरुवात करतो.’’ आम्ही विद्यार्थी असताना १९६५ साली आमचे अधिष्ठाता आडारकर यांनी जे. जे.मध्ये मायकलअँजेलोची ४०० वी पुण्यतिथी साजरी केली होती. त्यासाठी नामवंत कलाकारांकडून भित्तिचित्रे रंगवून घेतली होती. पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा एक मोठा कॉलम गुर्जरांनी आपल्या चित्रांसाठी निवडला होता व त्याच्या एका बाजूला कोळी व दुसऱ्या बाजूला कोळीण अशी साधारणपणे पाच फूट उंचीची चित्रे काढली होती आणि सभोवार लाकडी फ्रेम बसविण्यात आली होती. सुमारे दहा वर्षे संस्थेचे भूषण ठरलेली ही चित्रे पुढे संस्थाचालक व कला संचालक यांच्या वादात ही दोन चित्रे तसेच आणखीही एक चित्र- जे दुसऱ्या चित्रकाराने काढले होते- ही तिन्ही चित्रे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खरवडून काढण्यात आली. त्यावेळी उपयोजित कलासंस्थेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले.
चित्रकार गुर्जर हे चतुरस्र कलाकार होते. कोणत्याही माध्यमाचे त्यांना वावडे नसे. पेन्सिल असो, जलरंग असो वा तैलरंग.. तेवढय़ाच सहजतेने ते माध्यम ते वापरीत असत. मात्र पेस्टल वा खडू हे माध्यम त्यांच्या हाती आले की त्यांची कळी खुललीच म्हणून समजा! पेस्टलमध्ये काम करणारा त्यांच्या तोडीचा दुसरा चित्रकार मिळणे अशक्य.. एवढे प्रभुत्व होते त्यांचे पेस्टल या माध्यमावर! निरनिराळ्या चित्रप्रदर्शनांत त्यांना पेस्टलमधील कामाला सतत ओळीने सात वर्षे पारितोषिके मिळाली होती. आमच्या वर्गावर जेव्हा त्यांनी पेस्टल माध्यमाचे प्रात्यक्षिक दिले होते, त्यावेळी ते स्वत:कडील एक खास कागद घेऊन आले होते. बहुधा तो विन्सर न्यूटनचा असावा. त्यांचे पेस्टलही परदेशी होते. आमच्या वर्गात एक तांबूस गौर वर्णाची मणी गझदर नावाची विद्यार्थिनी होती. तिला त्यांनी मॉडेल म्हणून बसविले. तिला निरखून पाहत असताना त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. ते म्हणाले, ‘‘यात कोठेतरी मला लाल रंग हवा आहे.’’ म्हणून त्यांनी मुलींकडे लाल रिबीन आहे का याची चौकशी केली. एका विद्यार्थिनीने दुसऱ्या वर्गातील मुलीकडून तशी रिबीन आणताच त्यांनी ती मॉडेलच्या कपाळावर आडवी बांधली आणि तत्क्षणी त्यांचा चेहरा खुलला. आणि मग त्यांचे जे प्रात्यक्षिक झाले त्याला तोड नव्हती.
कित्येकदा गुर्जर आपली मॉडेल्स रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांमध्ये शोधत. एकदा त्यांना दाढी वाढलेला, मळकट कपडे घातलेला, केस पिंजारलेला असा एक वैशिष्टय़पूर्ण तरुण दिसला. गुर्जरांनी त्याला हटकले व सांगितले की, ‘‘मला तुझे चित्र काढायचे आहे, तेव्हा उद्या माझ्या स्टुडिओवर ये. तुला त्याबद्दल मी पैसेही देईन.’’ दुसऱ्या दिवशी ते त्या तरुणाची वाट पाहत थांबले. एवढय़ात एक गुळगुळीत दाढी केलेला, टापटीप कपडे घातलेला, केस चापून बसवलेला एक तरुण जिना चढून वर आला व म्हणाला, ‘‘आपण काल सांगितल्याप्रमाणे मी आलो आहे. माझे चित्र काढाल ना?’’ गुर्जरांनी कपाळावर हात मारला. जो अस्ताव्यस्त कपडय़ांतला गांजलेला तरुण त्यांनी पाहिला होता, नेमका तोच आज या माणसातून हरवलेला होता. काहीही न बोलता गुर्जरांनी काही पैसे त्याच्या हातावर ठेवले व त्याची रवानगी केली. त्यांना हवं होतं ते सौंदर्य त्याच्यातून हरवलं होतं! ते नेहमी म्हणत, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ असे कलेचे स्वरूप असावे. मी सौंदर्याचा पूजक आहे. पण चित्रविषयासाठी स्त्रीसौंदर्यच योग्य- इतक्या मर्यादित स्वरूपात मी तो शब्द वापरीत नाही. कार्यव्यग्र धिवरकन्येइतकीच सुरकुत्या पडलेली ९२ वर्षांची वृद्धादेखील मला चित्रासाठी सुंदर वाटते. अशा या गुर्जरांना चित्रकार रघुवीर मुळगांवकर यांच्याविषयी अतीव आदर होता. त्यांच्या कामाचा दर्जा आणि तत्परता याबद्दल ते नेहमी सांगत.
गुर्जरांना वास्तववादी कलेचा अभिमान होता, तितकाच त्यांना मॉडर्न आर्टविषयी तिटकारा होता. प्रिन्सिपॉल सॉलोमन आर्ट स्कूलमधून गेल्यानंतर आलेल्या जेरार्ड साहेबाने मॉडर्न आर्टचे बीज रोवले आणि पुढे विद्यार्थ्यांमध्ये त्याचा प्रसार झाला. वस्तुनिष्ठ व्यक्तिचित्रण हा विषय दुर्लक्षिला जाऊ लागला. मॉडर्न तंत्रातील रंगशास्त्रापुढे वास्तववादी चित्रे गौण समजली जाऊ लागली आणि यामुळे वस्तुनिष्ठ चित्रकलेची शिखरे मानले गेलेले सर्वश्री माळी, हळदणकर, आचरेकर आदी कलाकार हरवत चालले. आणि हे सर्व पाहून गुर्जरांनी आता केवळ तोंडी बोलण्याचे काम नसून या प्रकाराला वाचा फोडली पाहिजे म्हणून काही काळ ब्रश बाजूला सारून लेखणी उचलली आणि या आधुनिक कलेवर आक्षेप घेणारे लेख लिहिण्यास त्यांनी आरंभ केला.
एकदा पुण्याला साहित्यिक ना. सी. फडके यांच्या ‘दौलत’ बंगल्यावर त्यांना काही कामानिमित्त ते भेटण्यास गेले असता फडके बाहेर आले व म्हणाले, ‘‘गुर्जर, इतक्या उशिरा का होईना, आपली ओळख होते आहे हे भाग्याचे आहे. मात्र, तुम्ही यावर्षीच्या ‘अंजली’च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी तुमच्या गाजलेल्या चित्राचा फोटो व तुमचा एक खास लेख मला हवाय.’’ गुर्जरांना हे थोडे अकल्पित वाटले. चित्रकलेच्या अंगाने जाणारे त्यांचे लिखाण फडक्यांसारख्या सिद्धहस्त लेखकाने वाचावे व आठवण ठेवून आपला लेख मागावा हे त्यांना बहुमानाचे वाटले. ‘अंजली’च्या १९७३ च्या दिवाळी अंकात गुर्जरांनी ‘माझे जीवनचरित्र’ हा प्रदीर्घ लेख लिहिला. या लेखामुळे गुर्जरांच्या जीवनातील अनेक आठवणी, प्रसंगांना उजाळा मिळाला. रसिकांना त्यांच्या कलाजीवनाचा साक्षात्कार झाला आणि पुढील पिढय़ांना तो प्रेरणादायी ठरला.
१९५३ साली त्यांचे एक तैलचित्र प्रदर्शनात येण्याआधीच त्याची नक्कल ‘किर्लोस्कर’च्या मुखपृष्ठावर त्यांना दिसली. त्यामुळे संतापून गुर्जरांनी संपादकांना एक कडक पत्र लिहिले. ताबडतोब किर्लोस्करांकडून त्याचे उत्तरही आले. शिवाय खुद्द शं. वा. किर्लोस्कर व मुकुंदराव दोघेही त्यांच्या स्टुडिओमध्ये हजर झाले. शं. वा. म्हणाले, ‘‘तुम्ही अभिजात चित्रकार आमची चित्रे काढणे मनावर घेत नाही, म्हणून ही वेळ आमच्यावर आली. आता दर महिन्याला चित्र पाठवीत चला.’’ आणि त्यांनी गुर्जरांचे एक चित्र बरोबर घेतलेही. त्यानंतर गुर्जर-किर्लोस्करांचे नाते आजन्म टिकले. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ या मासिकांच्या मुखपृष्ठावर गुर्जरांची चित्रे दिसू लागली. गुर्जरांच्या कामातील वक्तशीरपणा हेही त्यामागील एक प्रमुख कारण होते. ‘किर्लोस्कर’मधील चित्रांनी गुर्जरांचे नाव घरोघरी पोहोचले. जी प्रसिद्धी त्यांना चित्रप्रदर्शनांतून मिळाली होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने ‘किर्लोस्कर’मुळे मिळाली. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ मासिकांच्या मुखपृष्ठचित्रांमुळे बहुजन समाजापर्यंत चित्रकार म्हणून त्यांचा लौकिक पोहोचला.
गुर्जर एक समाधानी अन् समृद्ध जीवन जगले. आपल्या ‘माझे जीवनचरित्र’मध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘‘माझी चित्रनिर्मिती ही सर्वसाधारण माणसासाठी आहे. चित्राचं नाव न वाचता चित्र पाहिल्यावर त्याचा आशय व हेतू समजला पाहिजे. हेच खरं कौशल्य आहे. यातच खरी कला आहे. कलावंतानं नेहमी जागरूक राहायला हवं. केवळ लोकांना आवडतात म्हणून उन्मादक चित्रे काढता कामा नयेत.’ असे हे व्ही. एस. गुर्जर १२ जुलै १९८२ रोजी आपणा सर्वाना सोडून निघून गेले. आज त्यांची चित्रे कोणाकडे आहेत माहीत नाही. बिर्ला समूहाच्या संग्रहामध्ये काही चित्रे आहेत. दुसरी त्यांनी जे. जे. उपयोजित कलासंस्थेत केलेली काही प्रात्यक्षिके पाहायला मिळतात. १९६८ साली संस्थेचे अधिष्ठाता आडारकर जेव्हा निवृत्त झाले तेव्हा गुर्जरांनी त्यांचे ऑईलमध्ये केलेले पोट्र्रेट पाहिल्यावर जाणवते ती त्यांच्या कलाविष्काराची महती. आडारकरांचे करारी, पण ममताळू व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांनी कुंचल्याद्वारे अतिशय सुंदर रेखाटले आहेत. वास्तविक अशा कलाकारांच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. पण दुर्दैवाने आपल्याकडे हे कधीच झाले नाही. निदान अशा कलाकारांची आठवण तरी आपण ठेवू या!
wrajapost@gmail.com