इंडियन प्रीमियर लीग २०२२चा सतरावा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बॅकफूटवर असलेला चेन्नईचा संघ फलंदाजीबरोबरच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघर्ष करताना दिसला. परिणामी त्यांनी ८ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला आहे. हा हैदराबादचा हंगामातील पहिलाच विजय आहे. तर रविंद्र जडेजा याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा हा आयपीएलमधील सलग चौथा पराभव होता. यासह जडेजाने आयपीएलमधील नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्च्या नुकसानावर १५४ धावा केल्या. हैदराबादने १७.४ षटकांमध्ये २ विकेट्सच्या नुकसानावर सहज चेन्नईचे लक्ष्य गाठले. अशाप्रकारे चेन्नईला या सामन्यात पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
आयपीएल इतिहासात कोणत्या कर्णधाराने सुरुवातीचे ४ सामने गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. जडेजाने तब्बल ९ वर्षांच्या अंतरानंतर आयपीएलमधील या नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने त्यांचा हंगामातील पहिलाच सामना ६ विकेट्लने गमावला होता. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झाला होता. त्यानंतर लखनऊ सुपरजायंट्स (६ विकेट्स), पंजाब किंग्ज (५४ धाावा) आणि आता हैदराबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली आहे.
जडेजापूर्वी ऍरॉन फिंचच्या नावावर हा नकोसा विक्रम होता. पुणे वॉरियर्स इंडिया या संघाचे नेतृत्त्व करताना आयपीएल २०१३ च्या हंगामात त्याने सुरुवातीचे चारही सामने गमावले होते.
अभिषेक शर्माची मॅच विनिंग खेळी
या सामन्यात चेन्नईला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागातील गचाळ कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ४८ धावा केल्या होत्या. इतर फलंदाजांना विशेष खेळी करता आल्या नाहीत. त्यामुळे चेन्नईचा संघ केवळ १५४ धावांवर मजल मारू शकला. चेन्नईच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून सलामीवीर आणि युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने कौतुकास्पद खेळी केली. त्याने ५० चेंडूंमध्ये १५० च्या स्ट्राईक रेटने ७५ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ५ चौकारही मारले. तसेच राहुल त्रिपाठीने शेवटी १५ चेंडूत नाबाद ३९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.