करोनाचे मळभ दूर करत दिल्लीने पंजाब किंग्सचा उडवला धुव्वा; ९ विकेट्स आणि १०.४ षटके राखत विजय

करोनाचे मळभ दूर करत दिल्लीने पंजाब किंग्सचा उडवला धुव्वा; ९ विकेट्स आणि १०.४ षटके राखत विजय
करोनाचे मळभ दूर करत दिल्लीने पंजाब किंग्सचा उडवला धुव्वा; ९ विकेट्स आणि १०.४ षटके राखत विजय

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज सामना होणार की नाही? दिल्लीचे किती खेळाडू कोरोनामुळे मुकणार? दिल्ली पूर्ण ताकदीनिशी खेळू शकणार का? असे अनेक प्रश्न सामना सुरू होण्यापूर्वी उपस्थित झाले होते. मात्र दिल्लीने या सर्व प्रश्नांना आपल्या कामगिरीतून उत्तर दिले. त्यांनी पंजाबवर ९ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. पंजाब किंग्जचे ११६ धावांचे आव्हान पार करताना दिल्लीने धडाक्यात सुरुवात केली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने आक्रमक अर्धशतक (५७) ठोकले. त्याला दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉने २० चेंडूत ४१ धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच ८१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

त्याअगोदर अखेर कोरोनाचे सावट दूर करत दिल्ली कॅपिटल्स मैदानावर उतरली. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचे, सपोर्ट स्टाफचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. संघातील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतरही हा संघ मैदानावर उतरला आणि पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. पंजाब किंग्सने आयपीएल २०२२ मधील निचांक धावसंख्येची नोंद केली आणि दिल्लीच्या सलामीवीरांनीच हे माफक लक्ष्य पार केले. खलिल अहमद ( २-२१), ललित यादव ( २-११), अक्षर पटेल ( २-१०) व कुलदीप यादव ( २-२४) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कुलदीपला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

शिखर धवन ( ९) व मयांक अग्रवाल ( २४) यांना साजेशी सुरूवात करता आली नाही. रिषभने कल्पक नेतृत्व करताना सुरेख क्षेत्ररक्षण लावले. लाएम लिव्हिंगस्टोन ६व्या षटकात अक्षर पटेलला पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाला. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( ९) खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पंजाब किंग्सचे ४ फलंदाज ५४ धावांवर माघारी परतले. जितेश शर्मा व शाहरूख खान यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने पंजाबला आणखी एक धक्का देताना जितेशला ३२ धावांवर पायचीत केले. त्यानंतर कुलदीप यादवने १४व्या षटकात कागिसो रबाडा व नॅथन एलिस यांना त्रिफळाचीत केले. खलिलने १५व्या षटकात शाहरुखची ( १२) विकेट घेत पंजाबची अवस्था ८ बाद ९२ अशी केली.

Advertisement

स्टार फलंदाज ढेपाळल्यानंतर राहुल चहर व अर्षदीप सिंग यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचेच होते. तरीही चहरने १ चौकार व १ षटकारासह १२ धावा केल्या. ललित यादवने त्याला बाद केले. पंजाबचा संपूर्ण संघ ११५ धावांवर तंबूत परतला. प्रत्युत्तरात, पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक सुरूवात करून सामना लवकर संपवण्याचा निर्धार दाखवला. या दोघांनी २१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पृथ्वीने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा याच सामन्यात ओलांडला. दिल्लीने ६ षटकांत ८१ धावा चोपून आयपीएल २०२२ मधील पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. राहुल चहरने ही भागीदारी संपुष्टात आणली.

पृथ्वी २० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर बाद झाला. डेव्हिड वॉर्नर सलग तिसरे अर्धशतक झळकावताना दिल्लीचा विजय पक्का केला. वॉर्नरने ३० चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून नाबाद ६० धावा करताना दिल्लीला १०.३ षटकांत ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सर्फराज खान १२ धावांवर नाबाद राहिला.

Advertisement