करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : ‘कचऱ्या’तून करिअर


रुग्णालये, दवाखाने किंवा अन्य आरोग्य संस्थांमधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला ‘बायोमेडिकल वेस्ट’ म्हणजे जैव वैद्यकीय कचरा असं संबोधलं जातं.

Advertisement

डॉ. गिरीश वालावलकर[email protected]

रुग्णालये, दवाखाने किंवा अन्य आरोग्य संस्थांमधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला ‘बायोमेडिकल वेस्ट’ म्हणजे जैव वैद्यकीय कचरा असं संबोधलं जातं. जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये संसर्गजन्य आजार पसरवणारे विषाणू असू शकतात. त्यामुळेच हा कचरा प्रदूषण निर्माण करणाऱ्या सर्वात घातक घटकांपैकी एक घटक मानला जातो. या कचऱ्यामध्ये जखमा बांधण्यासाठी वापरली गेलेली बँडेजेस्, रक्त किंवा शरीरातील अन्य द्रवपदार्थ यांच्या बरोबरच इंजेक्शन देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या सििरजेस् आणि तत्सम उपकरणे, विविध प्रकारच्या औषधांमध्ये असलेली अनेक प्रकारची रसायने, रोगनिदानासाठी वापरले जाणारे किरणोत्सारी घटक यांचा समावेश असतो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणं हे जिकिरीचं पण अत्यावश्यक काम असतं. हा कचरा योग्य पद्धतीने नष्ट करून त्यापासून पर्यावरणाला असलेला धोका टाळणं याला ‘जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन’ म्हटलं जातं. हा सध्या भरभराटीला येत असलेला व्यवसाय असून त्यामध्ये करिअरसाठी अनेक संधी आहेत.

Advertisement

सध्या भारतामध्ये जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाशी संबंधित उद्योगांतील सेवा आणि उत्पादनांची वर्षांला साधारणपणे २५० कोटी रुपयांची विक्री होते. येत्या काही वर्षांत ती आणखी वाढत जाऊन २०२४ साली जवळपास ३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. करोना महासाथीनंतर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी सरकारनेसुद्धा विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अधिकाधिक वाव मिळणार आहे.

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्रातील पदवी उपयुक्त ठरते. त्यापुढे पर्यावरणशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरतं. मुंबईतील ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ सारख्या प्रतिष्ठित संस्थेत जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासंदर्भात विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संस्थेतून शिक्षण घेणं पुढील वाटचालीसाठी लाभदायक ठरतं. औपचारिक शिक्षणाबरोबरच पर्यावरण संतुलनाविषयी जागरूकता आणि सामाजिक स्वास्थ्याबद्दल आस्था असेल तर या क्षेत्रात काम करणं आनंददायक होतं.

Advertisement

कचऱ्याची  हाताळणी आणि विविध घटकांचं आवश्यकतेनुसार विलगीकरण, त्यावर प्रक्रिया करण्याच्या ठिकाणापर्यंत त्यांची वाहतूक, साठवण, त्या कचऱ्यातील घातक घटक नष्ट करण्याची प्रक्रिया आणि त्या प्रकियेतून निर्माण झालेल्या निरुपद्रवी पदार्थाची योग्य ती विल्हेवाट या सर्वाचा समावेश यात होतो.

बहुसंख्य रुग्णालयांकडे स्वत:ची जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन सुविधा नसते. त्यामुळे बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाची जबाबदारी पर्यावरण क्षेत्रातील व्यावसायिक कंपनीकडे सोपवली जाते. बहुतेक वेळा एखादी पर्यावरण कंपनी ही सर्व कामे कंत्राटी पद्धतीने करते. या सर्व कामांसाठी त्या शहराच्या नगरपालिका, महानगरपालिका किंवा तत्सम संस्था त्या कंपनीला संपूर्ण सहकार्य करतात. ‘मेडिकेअर एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’, ‘सिनर्जी वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’, ‘बायोटिक वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांसारख्या कंपन्या जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनामध्ये देशपातळीवर अग्रेसर आहेत. त्याखेरीज अनेक वेळा एखादी स्थानिक कंपनी शहराच्या सरकारी यंत्रणेकडून योग्य ते परवाने तसेच परवानग्या घेऊन त्या शहराच्या जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी घेते. कंपनीला काही रुग्णालयं तसंच नगरपालिका किंवा तत्सम सरकारी संस्थांकडून या कामाचा मोबदला दिला जातो. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणाऱ्या पर्यावरण कंपन्यांना अलिकडच्या काळात तंत्रज्ञ, व्यवस्थापक आणि अगदी महाव्यवस्थापकांपर्यंतच्या पदांसाठी तरुणांची वाढती गरज भासू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढत्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. नोकरीबरोबरच स्वत:ची कंपनी सुरू करून स्वत:च आपल्या शहराच्या जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचं कंत्राट घेणं शक्य असतं. अनेक महत्त्वाकांक्षी तरुणांनी आपल्या शहरांमध्ये अशा कंपन्या सुरू केल्या आहेत आणि त्या उत्तम फायदा मिळवत आहेत.

Advertisement

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्या कचऱ्यावर  केली जाणारी प्रक्रिया. यातील घातक घटकांचं विघटन करून त्यांचं निरुपद्रवी पदार्थामध्ये रूपांतर करणं अतिशय कौशल्याचं काम आहे. आज जैव वैद्यकीय कचऱ्यावर तो जाळण्यासारख्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रियेपासून ते त्यांचं रासायनिक किंवा जैविक विघटन करण्यापर्यंतच्या आधुनिक प्रक्रियेपर्यंत सर्व प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. तरीही अजूनही योग्य ते संशोधन करून या प्रक्रियांमध्ये सुधारणा घडवायला प्रचंड वाव आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी कोणत्याही मूलभूत संशोधनाची गरज नाही तर प्रक्रियेचा वेळ कमी करणं किंवा त्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरावर मर्यादा ठेवणं यांसारख्या सुधारणा झाल्या तरीही त्यामुळे खूप आर्थिक फायदा मिळू शकेल. म्हणूनच अशा प्रकारचं काम करू इच्छिणाऱ्या धडपडय़ा तरुणांना या क्षेत्रात अतिशय यशस्वी करिअर घडवण्याची संधी आहे. विषाणूंमुळे किती भयानक रोग पसरू शकतात आणि त्यामुळे आपल्या केवळ आरोग्यावरच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक जीवनावरसुद्धा किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे करोनाच्या महासाथीने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. रोग पसरवू शकणाऱ्या जिवाणू-विषाणूंचा समावेश असलेला जैव वैद्यकीय कचरा आपल्यासाठी किती घातक आहे हे आपल्याला पुन्हा एकदा जाणवलं आहे. त्याचं योग्य ते व्यवस्थापन करण्याची गरज संपूर्ण जगाच्याच लक्षात आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा उद्योग वेगाने वाढत जाणार आहे, त्याचबरोबर त्यामध्ये उत्तम करिअर करण्याच्या संधीसुद्धा सातत्याने वाढत जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement