करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : सार्वजनिक आरोग्य करिअरची ‘सशक्त’ वाट


प्रतिवर्षी मे-जून महिना आला की बारावीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात करिअरचे विचार पिंगा घालत असत. २०२०ला काहीसे वेगळेच चित्र होते. करोना हा एकच शब्द घराघरात चर्चेचा विषय झाला होता.

Advertisement

डॉ. चारुता गोखले[email protected]

प्रतिवर्षी मे-जून महिना आला की बारावीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात करिअरचे विचार पिंगा घालत असत. २०२०ला काहीसे वेगळेच चित्र होते. करोना हा एकच शब्द घराघरात चर्चेचा विषय झाला होता. आज २०२१चा जून उजाडला तरी परिस्थितीत फारसा बदल नाही. या वर्षीही बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र त्याच वेळेस गेल्या अनेक वर्षांत न घडलेला एक बदल झाला असून सार्वजनिक आरोग्य हा विषय ऐरणीवर आला आहे. ही एक अतिशय गांभीर्याने घ्यायची ज्ञानशाखा असून आरोग्याच्या पायाभूत सुविधांना नजरेआड करून देशाचा सर्वागीण विकास शक्य नाही याची जाणीव समाजाला हळूहळू होत आहे. गरिबी, अल्प साक्षरता, दाट लोकवस्ती आणि दमट हवामान यांमुळे दुर्दैवाने भारतासमोरील आरोग्याच्या समस्या नजीकच्या काळात तरी कमी होण्याची लक्षणे नाहीत. आणि म्हणूनच करिअर निवडीच्या उंबरठय़ावर उभे असलेले तरुण या क्षेत्राकडे काही तरी भरीव कामगिरी करण्याच्या सुवर्णसंधीच्या दृष्टीने नक्कीच पाहू शकतात. इथे करिअर हा शब्द वापरायचे टाळून कामगिरी हा शब्द मुद्दाम वापरत आहे. करिअरचे जणू जोडशब्दच वाटणारे ‘त्वरित आणि भरपूर पैसा, स्थैर्य’ या संकल्पना या क्षेत्राला लागू पडतीलच याची खात्री नाही. परंतु महात्मा गांधींच्या ‘तालीस्मान’चा निष्कर्ष या क्षेत्रास नक्की लागू पडेल. ‘ज्या वेळी भविष्यात नेमका कुठला मार्ग निवडू, असा प्रश्न पडेल त्या वेळी समाजातील सर्वात वंचित माणसाला माझ्या निर्णयाचा काय फायदा होईल याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या,’ असा मूलमंत्र गांधीजींनी आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर संभ्रमावस्थेत असलेल्या माणसाला दिला होता. करिअरच्या बाबतीत असा प्रश्न पडल्यास ‘सार्वजनिक आरोग्य’ हे त्याचे एक उत्तर नक्की असेल.

Advertisement

मोठय़ा जनसमूहात आढळून येणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय आव्हानाशी चारहात करण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची असते. मग ती समस्या डायरिया, करोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या साथीची असो किंवा मधुमेह, रक्तदाब या नव्याने दिसून येणाऱ्या विकारांच्या वाढत्या  प्रादुर्भावाची असो. वैद्यकीय शाखा (Medicine) आणि सार्वजनिक आरोग्य शाखा यांची तुलना केल्यास एका माणसाचा रोग बरा करणे हे झाले वैद्यकशास्त्राचे काम. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ संपूर्ण समाजाचा डॉक्टर असतो. वैद्यकशास्त्राचा सर्व भर हा रुग्णाच्या उपचारांवर असतो, तर सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ समाजात रोग मुळात पसरूच नये आणि पसरलाच तर देशपातळीवर त्याचा र्निबध करणे यासाठी धडपडत असतो. म्हणूनच या शास्त्राला प्रिव्हेन्टिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन (Preventive and social Medicine) असेही म्हणतात. या शाखेची ढोबळ व्याख्या म्हणजे एखाद्या वैद्यकीय समस्येचे मोजमाप करणे, ते सतत सुरू ठेवणे, समस्येमागील नेमका कार्यकारणभाव शोधून काढणे, त्याच्या प्रसारास अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची आखणी करणे, रुग्णांवर त्वरित उपचार करणे आणि तो भविष्यात होणार नाही यासाठी उपाययोजना करणे.

करोनाचेच उदाहरण घेऊन यापुढील चर्चा करू या. करोना हा शब्द उच्चारल्यावर काय काय डोळ्यासमोर येते? विषाणू, त्याचे नवनवीन प्रकार, मास्क, सॅनिटायझर, सतत हात धुण्यासंबंधीच्या सरकारी जाहिराती, सरकारी अधिनियम, जागतिक आरोग्य संघटना, बेड्स, लस, कधी वाढता तर कधी कमी होणारा मृत्युदर, टाळेबंदी, औषध, हॉस्पिटल्सची मोठाली बिले, बेरोजगारीमुळे ढासळलेले मानसिक स्वास्थ्य, परप्रांतीयांची वणवण.. ते अगदी करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांविषयीच्या उपाययोजना. यातील प्रत्येक गोष्ट सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या अखत्यारीत येते. ज्ञानशाखांच्या परिभाषेत बोलायचे झाल्यास साथरोगशास्त्र, संख्याशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, आहारशास्त्र, अर्थशास्त्र, आरोग्ययंत्रणांचे आयोजन आणि व्यवस्थापन या सर्वाचं यथोचित आकलन तज्ज्ञाला असणं आवश्यक असतं.

Advertisement

२०२० जानेवारीमध्ये भारतात करोनाचा पहिला रुग्ण आढळला. डिसेंबर २०१९ पासून चीनमधील वूहानमध्ये विषाणूने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. या क्षणीच त्या त्या देशांमधील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कमी-अधिक प्रमाणात सतर्क झाल्या. या यंत्रणेने अशा परिस्थितीत अष्टावधानी असणे अपेक्षित असते. एक फळी विषाणूचे मूळ शोधण्याच्या मागे लागली, काही जण बाधित व्यक्तींच्या शरीरातील विषाणूंचा नेमका प्रकार शोधू लागले, ते बदलत आहेत की समान आहेत (variants) हे जाणून घेणे या त्यामागील हेतू. हे सगळे चालू असताना देशांची डिसिज सव्‍‌र्हिलिअन्स यंत्रणा बाधितांची संख्या, त्यातील स्त्री, पुरुष, लहान मुले यांचे प्रमाण, मृत्यूंची संख्या, बरे होणाऱ्यांचे प्रमाण, शहरी आणि ग्रामीण भागांतील स्थिती यांची आकडेवारी सतत गोळा करून इतर यंत्रणांना बेड्स, औषधे आणि इतर वैद्यकीय साधनांच्या नियोजनासाठी देत होती. जशी जशी रोगाविषयी अधिकाधिक माहिती कळू लागली, तसतशा जागतिक आरोग्य संघटना, सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या शिखर संस्थांनी रोगाचे निदान, उपचार पद्धती, आंतरराष्ट्रीय प्रवास यांविषयीच्या नियमावली जाहीर केल्या. तसेच साथीला अटकाव घालण्यासाठी आवश्यक समाजप्रबोधनाची साधने तयार केली. आपल्या संकेतस्थळांवर प्रकाशित केली. देशांनीही स्थानिक संदर्भानुसार आपले स्वतंत्र साहित्य निर्माण केले. अगदी तालुक्यापर्यंत ही साधने पोहोचतील याची स्थानिक प्रशासनाने खात्री केली. एकीकडे उपचारव्यवस्थापन चालू असताना लस उत्पादन आणि पुरवठय़ाची चर्चाही सुरू झाली होती. त्याचे व्यवस्थापन अगदी केंद्राच्या यंत्रणेपासून ते जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर केले. साथीचा भर थोडा ओसरत असताना म्यूकर मायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत हे निरीक्षण टीम आणि डॉक्टरांच्या लक्षात आले. ते त्यांनी प्रशासकांना कळवले आणि यासाठीचे आवश्यक उपचार, सरकारी योजनांतर्गत त्यांना मिळू शकणारी सवलत या सर्व यंत्रणा कामाला लागल्या. या सर्व घटना फीडबॅक मेकॅनिझममार्फत कार्यरत असतात. करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी साहाय्य उभे करण्याचे कामही याच क्षेत्राचे आहे. युनिसेफने ते नुकतेच हाती घेतल्याचे आपण सगळ्यांनी वाचले असेल. भारतात सार्वजनिक आरोग्यव्यवस्था म्हणजे जणू आकाशच फाटल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे कराल तितके काम कमीच आहे आणि थोडेफार योगदानसुद्धा खूप समाधान मिळवून देणारे आहे.

आता याचे नेमके शिक्षण घ्यायचे कुठे? भारताच्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे महत्त्व जसे जसे वाढत आहे, तसतसा अधिकाधिक शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. विद्यार्थी हा अभ्यासक्रम दोन प्रकारे निवडू शकतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस या पदवीनंतर दोन वर्षांची एमडी (पीएसएम, प्रिव्हेन्टिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन) ही पदवी घेऊ शकतात किंवा शास्त्र शाखेतील (गणित व पदार्थविज्ञान वगळता) पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षणात एमपीएच (मास्टर्स इन पब्लिक हेल्थ) करू शकतात. हा अभ्यासक्रम आंतरविद्याशाखीय (इंटरडिसिप्लिनरी) आणि उपयोजित (अप्लाइड) स्वरूपाचा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे यात प्रामुख्याने संख्याशास्त्र, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगशास्त्र, साथीच्या रोगांचा अभ्यास (अ‍ॅपिडेमॉलॉजी), आहारशास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्य यंत्रणांचे आयोजन व व्यवस्थापन हे विषय शिकवले जातात. भारतात टाटा सामाजिक विज्ञान संस्था- मुंबई, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया – गांधीनगर, हैदराबाद, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅपिडेमॉलॉजी- चेन्नई, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च- जयपूर, एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ- भुवनेश्वर, जेएसएस मेडिकल कॉलेज म्हैसूर, जीपमर- पुदुचेरी, दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स- वर्धा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे या ठिकाणी दोन वर्षांचा सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो.

Advertisement

या विषयातील पदवीधर सरकारी यंत्रणेबरोबर, तसेच स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करू शकतात. केंद्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर मलेरिया नियंत्रण, क्षयरोग नियंत्रण, एड्स नियंत्रण, लसीकरण, जननी सुरक्षा यांसारखे कार्यक्रम चालवले जातात. हे कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी या विषयातील पदवीधरांची आवश्यकता असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ, यूएनएफपीए, यूएनडीपी यांसारख्या संयुक्त राष्ट्र संघ संचलित संस्थांतही सार्वजनिक आरोग्य या विषयांत शिकलेल्या पदवीधरांना संधी मिळू शकते. बडय़ा उद्योग संस्था सामाजिक उत्तरदायित्व योजनांखाली अनेक आरोग्यविषयक उपक्रम हाती घेतात. तेथेही या पदवीधरांना काम करण्याची मोठी संधी उपलब्ध असते. याशिवाय विविध भारतीय आणि परदेशी संस्थांमध्ये पीएचडीचा पर्याय उपलब्ध आहेच. नावातच समाज असल्यामुळे उमेदवारीच्या काळात या क्षेत्रात चार भिंतींच्या बाहेर खूप फिरावे लागते. समाजाची नेमकी नस कळण्यासाठी, विषयाची जाण वाढण्यासाठी, सरकारी यंत्रणेची बलस्थानं, मर्यादा कळण्यासाठी ही भटकंती आवश्यक असते. अनेकदा नोकरीदरम्यान आपला लाभार्थी कोण हे कळत नाही. मात्र या क्षेत्रामध्ये आपण करत असलेले काम हे थेट लोकहिताचे आहे याचे समाधान मिळते. हा प्रांत आंतरविद्याशाखीय असल्यामुळे अनेक स्थानिक आणि जागतिक  विषयांची अद्ययावत शास्त्रीय माहिती घेत राहाणे क्रमप्राप्त असते. त्यासाठी शोधनिबंधांचे वाचन आवश्यक असते. अध्यापनाच्या क्षेत्रात जायचे आणि टिकायचे असल्यास संशोधन हाती घेऊन ते प्रकाशितही करावे लागते.

भारताच्या संदर्भात या क्षेत्राचे महत्त्व भविष्यात वाढतच जाणार आहे. वाढते शहरीकरण, मानवाचे वाढते आयुर्मान, वाढते प्रदूषण, वाढते दळणवळण हे घटक आरोग्याच्या नवीन आव्हानांना जन्म देत आहे. यासाठी नव्या दमाच्या तरुण रक्ताची समाजाला गरज आहे. हरवलेली अंगठी जिथे प्रकाश आहे तिथे शोधायची आहे की, जिथे हरवली आहे त्या प्रत्यक्षस्थळी जाऊन शोधायची आहे हे तरुण-तरुणीने ठरवायचे आहे. सध्या अंगठी हरवलेली जागा आपल्याला माहीत आहे. पण कंदील घेऊन इथे प्रकाश दाखवणारी माणसे मात्र अपुरी आहेत.

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement