कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताला फ्रान्सकडून पराभवाचा धक्का!भुवनेश्वर : गतविजेत्या भारताला कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत फ्रान्सने पराभवाचा धक्का दिला. संजयच्या हॅट्ट्रिकनंतरही भारताने हा सामना ४-५ असा गमावला.

Advertisement

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला मिळाल्याने या संघाकडून जेतेपद राखण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र, भारताच्या आव्हानाची अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला कर्णधार टिमोथी क्लेमेंटने गोल करत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली, तर सातव्या मिनिटाला बेंजामिन माक्र्वीने ही आघाडी दुप्पट केली. मात्र, यानंतर भारताच्या युवा खेळाडूंनी कामगिरीत सुधारणा केली. १०व्या मिनिटाला उत्तम सिंह, तर १५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर संजयने गोल करत भारताला २-२ अशी बरोबरी करून दिली. दुसऱ्या सत्रात कर्णधार क्लेमेंटने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केल्याने मध्यंतराला फ्रान्सकडे ३-२ अशी आघाडी होती. उत्तरार्धातही फ्रान्सने आक्रमक खेळ सुरु ठेवला. ३२व्या मिनिटाला कर्णधार क्लेमेंटने हॅट्ट्रिक झळकावताना फ्रान्सची आघाडी ४-२ अशी अधिक भक्कम केली. त्यानंतर कॉरेन्टिन सेलिएरने फ्रान्सचे गोलचे पंचक पूर्ण केले. अखेरच्या काही मिनिटांत संजयने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत भारताचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने अखेर हा सामना एका गोलच्या फरकाने गमावला. ‘ब’ गटात समाविष्ट असलेल्या भारताचा गुरुवारी कॅनडाविरुद्ध सामना होईल.

The post कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताला फ्रान्सकडून पराभवाचा धक्का! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here