अमरावती15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना दिलेल्या कडक नोटांच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. रवी राणा यांनी किती पैसे दिले व यशोमती ठाकूर यांनी किती घेतले याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणालेत.
गत काही दिवसांपासून अमरावतीचे आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ठाकूर यांनी 2019 च्या निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर ठाकूर यांनी त्यांना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. आता बच्चू कडू यांनी या वादात उडी घेत या प्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
सर्वप्रथम पैसे देणारा चुकीचा
बच्चू कडू एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना 2019 मध्ये पैसे दिल्याचा आरोप केला आहे. मुळात हे चुकीचे आहे. या प्रकरणी सर्वप्रथम पैसे देणारा चुकीचा आहे. मी याविषयी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.
खासदार नवनीत राणा यांनी सर्वांसमोर हा आरोप केला आहे. त्यामुळे रवी राणा यांनी किती पैसे दिले व यशोमती ठाकूर यांनी किती घेतले? याची चौकशी झाली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?
यशोमती ठाकूर यांनी 2019 च्या निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या. पण नंतर त्यांनी दुसऱ्याचाच प्रचार केला. त्यांना यापुढे मंत्रीपद मिळेल किंवा नाही याची खात्री नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्या यादीत यशोमती ठाकूर यांचे नाव होते. पण मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला होता.
यशोमती ठाकूरांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा
नवनीत राणा यांचा हा आरोप जिव्हारी लागल्यानंतर यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या. त्यांनी त्यांना थेट 100 कोटींचा मानहाणीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. राणा यांनी शहाणपणा करत बोलायचे नाही. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. त्या नवरा-बायकोने आजपर्यंत अमरावती जिल्हा नासवण्याचे काम केले. त्यांचे कुणाशीच पटत नाही. मी त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा ठोकणार आहे, असे त्या म्हणाल्या.
तू चोर, तुझी बायको चोर
रवी राणा तू चोर आहे. तुझी बायको चोर आहे. आम्ही असे आरोप सहन करणार नाही. कुणीही उगाच अफवा पसरवण्याचे काम करू नये. आम्ही ताईंचा वहिणी म्हणून स्वीकार केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दारोदार फिरलो. पण त्यांचे प्रमाणपत्रच खोटे निघाले. त्या स्वतः चोर निघाल्या. त्यामुळे राणांनी औकातीत रहावे, असेही यशोमती ठाकूर या प्रकरणी म्हणाल्या होत्या.
शहाण्यांना सांगा लायकीत राहा
यशोमती ठाकूर या प्रकरणी राणांवर निशाणा साधताना म्हणाल्या की, शहाण्यांना सांगा लायकीत रहा. माझ्या बापाने आणि कुटुंबाने येथे जमिनी घेण्याचे नाही तर देण्याचे काम केले. आजही निवडणुकीत आम्हाला एखादा एकर शेतीर विकावी लागते. ही फॅक्ट आहे. त्यामुळे आम्ही राणांसारखी फालतुगिरी सहन करणार नाही.