प्रतिनिधी / हिंगोली34 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
औंढा नागनाथ शहराला पाणी पुरवठा करणारा औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. आज सकाळपासून सांडव्यावरून दोन इंच पाणी वाहू लागले आहे. तलावातील 1.791 दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यामुळे औंढा शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे. रब्बी हंगामात शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांचीही चिंता मिटली आहे.
औंढा नागनाथ शहरालगत औंढा नागनाथ तलाव आहे. तलावाची सिंचन क्षमता 1.791 दशलक्ष घनमिटर आहे. या तलावावरून औंढा नागनाथ शहराला पाणी पुरवठा केला जातो. या शिवाय वगरवाडी व परिसरातील पिकांच्या सिंचनासाठी या तलावातील पाण्याचा वापर होतो. त्यामुळे दरवर्षी तलाव भरण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह औंढा नागनाथ येथील नागरिक करत असतात.
उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही
आतापर्यंत औंढा नागनाथ तालुक्यात चांगलाच पाऊस झाला. सरासरी 476 मिलीमिटर एवढा पाऊस झाला असून शहरातील ओढे, तलाव पुर्ण भरले आहेत. औंढा नागनाथ तलावदेखील 100 टक्के भरला आहे. सध्या तलावाच्या सांडव्यावरून दोन इंच पाणी ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. त्यामुळे औंढा शहराला दरवर्षी पाणी पुरवठ्यासाठी लागणारा 0.5 दशलक्ष घनमीटर साठा झाल्यामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे. या शिवाय परिसरातील सुमारे 100 ते 125 हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांतूनही समाधान व्यक्त होत आहे.
तलावातील गाळ काढला
औंढा नागनाथ तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे पाणीसाठा पुर्ण क्षमतेने होत नव्हता. मात्र पाटबंधारे विभागाने या तलावातील गाळ काढल्यामुळे आता तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. त्याचा फायदाच शेतकऱ्यांसह औंढ्याच्या नागरीकांना होणार आहे.