छत्रपती संभाजीनगर40 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित 16 वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या संघाने पहिल्या दिवशी दमदार सुरूवात केली. राघव नाईक (139) व राम राठोड (117) यांच्या शतकाच्या जोरावर छत्रपती संभाजीनगरने 63 षटकांत 1 बाद 389 धावांचा डोंगर उभारला. दिवस अखेर लातूरने पहिल्या डावात 5 बाद 93 धावा केल्या. संघ अद्याप 296 धावा पिछाडीवर आहे.
गरवारे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान छत्रपती संभाजीनगरच्या संघाकडून आघाडीच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. विशेष म्हणजे ऐवढा मोठ्या धावसंख्येत यजमान फलंदाजांनी एकही षटकार मारला नाही. सलामीवीर रुद्राक्ष बोडखेचे शतक अवघ्या 5 धावांनी हुकले. त्याने 99 चेंडूंत 13 चौकार खेचत 95 धावा ठोकल्या. दुसरा सलामीवीर राघव नाईकने 177 चेंडूंचा सामना करताना 18 चौकार खेचत 139 धावांची नाबाद खेळी केली. राघव व रुद्राक्ष जोडीने पहिल्या गड्यासाठी 178 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या राम राठोडने 105 चेंडूंत 13 सणसणीत चौकार मारत नाबाद 117 धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. संघाला 38 धावा अतिरिक्त मिळाल्या. प्रतिक पवारने एकमेव गडी बाद केला. चैतन्य देशमुख 92 धावा देत सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
यजमानांची चिवट गोलंदाजी
पहिल्या डावात मैदानात उतरलेल्या लातूरच्या फलंदाजांना यजमान गोलंदाजांनी टिचुन मारा करत बांधून ठेवले. कर्णधार सुमित कोकरेने 14 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 29 धावा केल्या. विहान राजंळे नाबाद 19 धावांवर खेळत आहे. साद चाऊसने 45 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 30 धावा काढल्या. छत्रपती संभाजीनगरकडून श्लोक गिरगेने 2 आणि राम राठोड, मयंक कदम, आकाश शेळके यांनी प्रत्येकी एकाला टिपले.