इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. हा हंगाम गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ससाठी निराशाजनक ठरला असून त्यांचे प्लेऑफसाठीचे आव्हानही संपुष्टात आले आहे. दरम्यान, चेन्नईची केवळ खराब कामगिरीच नाही, तर कर्णधारपदाचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरला. त्यातही गेल्या काही दिवसात रविंद्र जडेजा आणि चेन्नई फ्रँचायझी यांच्यात वाद झाल्याच्या चर्चाही समोर आल्या आहेत. आता आणखी नवी माहिती समोर येत आहे.
जडेजा-चेन्नई बिनसलं?
जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२२ च्या सुरुवातील कर्णधार झाला होता. आयपीएल २०२२ हंगामापूर्वी धोनीने चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जडेजाकडे सोपवली होती. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही खालावली. त्यामुळे जडेजाने पहिल्या ८ सामन्यात नेतृत्व केल्यानंतर वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी पुन्हा कर्णधार झाला.
त्यानंतर जडेजाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ४ मे रोजी सामना खेळताना क्षेत्ररक्षणावेळी बरगड्यांची दुखापत (A Rib Injury) झाली होती. त्यामुळे त्याला उर्वरित स्पर्धेतूनच बाहेर व्हावे लागले. त्यातच चेन्नईने जडेजाला सोशल मीडियावरून अनफॉलो केले. त्यामुळे कर्णधारपदाचा मुद्दा, दुखापत आणि सोशल मीडियाचा मुद्दा अशा कारणांमुळे जडेजा आणि चेन्नई फ्रँचायझी यांच्यात वाद झाल्याचे म्हणले जात आहे.
तसेच आता त्याच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. याबद्दल जडेजाच्या जवळच्या सुत्रांनी इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. सुत्रांनी सांगितले की, ‘हो, जडेजा निराश आहे आणि खूप दुखावला गेला आहे. कर्णधारपदाची मुद्दा चांगल्याप्रकारे हाताळला जाऊ शकत होता. सर्वकाही अचानक झाले. खूपच अचानक. या गोष्टी ज्याप्रकारे घडल्या, ते पाहून प्रत्येक व्यक्तीच दुखावला जाईल.’ तसेच जेव्हा जडेजाच्या आयपीएल २०२२ मधून बाहेर होण्यामागे दुखापत हेच मुख्य कारण होते का, असे विचारले असता सुत्रांनी माहिती सांगितली की, ‘मला त्याबद्दल जास्त काही बोलायचे नाही. नक्कीच त्याला दुखापत झाली आहे, पण ती किती गंभीर आहे, याबद्दल मला माहित नाही.’
जडेजाची निराशाजनक कामगिरी
जडेजासाठी आयपीएल २०२२ हंगाम विसण्यासारखा राहिला. कारण चेन्नई संघ त्याच्या नेतृत्वाखाली ८ पैकी केवळ २ सामने जिंकू शकले. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १० सामने खेळले असून ११६ धावा केल्या आहेत. तसेच ५ विकेट्स घेतल्या आहेत.