एका ‘केऑस’ची गोष्ट|| प्रणव सखदेव 

Advertisement

१.

एका झाडावर क्रौंच पक्ष्याची जोडी बसलेली आहे. पक्ष्याचं जोडपं प्रेमाराधनेत तल्लीन झालेलं असताना कुठूनतरी सरसरत एक बाण येतो आणि एका पक्ष्याचा वेध घेऊन जातो. दुसरा पक्षी जमिनीवर पडलेल्या, गतप्राण झालेल्या मादी पक्ष्याकडे जाऊन विलाप करतो…

Advertisement

हा करुण, दु:खद प्रसंग पाहून वाल्मिकींना ‘रामायण’ लिहिण्याची कल्पना सुचली, अशी आख्यायिका मी बऱ्याचदा ऐकली होती आणि ही आख्यायिका आहे ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ लिहिण्यामागची प्रेरणा. म्हणूनच या कादंबरीच्या सुरुवातीला चैतन्य व सानिका यांची ताटातूट होते आणि घटना वेगाने घडू लागतात… लहानपणापासून ऐकलेल्या या आख्यायिकेने लेखन करू लागल्यावर मला भारावून टाकलं आणि आपण काही महाकाव्य निर्माण करू शकत नसलो तरी काव्यात्म, तरल प्रेमकथा लिहायची असं मी ठरवलं होतं. ‘काळेकरडे’च्या रूपात ते शब्दांत उतरलं.

कल्पना सुचणं, कथाबीज सुचणं ही एक बाब झाली. पण त्या बीजाचा विस्तार करण्यासाठी अवकाश शोधणं, पात्रांना रंगरूप, हाडं-मांस देणं, घटना-प्रसंगांची सांधणी व बांधणी करणं गरजेचं होतं. खरं तर ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही माझी पहिली प्रकाशित झालेली कादंबरी! (प्रथम ऑडियो बुक स्वरूपात ‘औदुंबर’ म्हणून आलेली.) त्याआधी मी ‘96 मेट्रोमॉल’ कादंबरी लिहिली होती, जिला पुस्तकरूप नंतर प्राप्त झालं. पण ‘मेट्रोमॉल’ आणि ‘काळेकरडे’ या दोन्ही कादंबऱ्यांच्या धाटणीत, विषयांत कितीतरी फरक आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका… फँटसी आहे आणि ‘काळेकरडे’ ही वास्तवाचा आभास निर्माण करणारी, उदासी, मानसिक रिकामपण आणि ‘मी कोण’पेक्षा ‘मी काय आहे’ याचा शोध घेणारी प्रेमकथा आहे.

Advertisement

‘काळेकरडे’ प्रत्यक्षात उतरवताना मी परिसर म्हणून मुंबईतलं रुईया कॉलेज, तिथला आजूबाजूचा परिसर, कल्याण, डोंबिवली किंवा भांडुप ही उपनगरं, काही प्रमाणात पुण्याजवळचा भाग असा निवडला. लेखक जे पाहतो, ऐकतो, त्याच्यावर प्रक्रिया करून स्वतंत्र अवकाशनिर्मिती करत असतो. त्यामुळे साहजिकच हा सगळा मी पाहिलेला परिसर आपोआपच मला कादंबरीत आणता आला. पण वर सांगितल्याप्रमाणे मला केवळ परिसर, त्याची वर्णनं आणायची नव्हती किंवा नुसती प्रेमकथाही सांगायची नव्हती. मला त्याबरोबरच २००० सालाच्या पहिल्या दशकातल्या पिढीची मानसिकता, त्यांचं जगणं, त्यांचं विचार करणं, त्यांची मतं, त्यांचे नातेसंबंध, त्यांचं प्रेम हेदेखील त्यातून मांडायचं होतं. जेणेकरून या कथेला एकरेषीयता न येता तिला अनेकरेषीयता प्राप्त होऊ शकेल.

असं करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आर्थिक उदारीकरण प्रत्यक्षात आल्यावर त्याचे अनेक पातळ्यांवर परिणाम झाले. जगण्यातली स्थिरता संपली. तुटकपणा, विखंडितता वाढली. त्यातून एक ‘केऑस’ निर्माण झाला. त्यातल्या भावनिक, मानसिक ‘केऑस’ला मला शब्दरूप द्यायचा प्रयत्न करायचा होता. हा केऑस, ही मानसिक पोकळी कमी-जास्त प्रमाणात, कधी ना कधीतरी आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, कधी ना कधीतरी तिने आपल्याला स्पर्श केलेला असतो. ही वास्तववादी कादंबरी असली तरी या केऑसची रूपककथाही आहे. म्हणूनच या कादंबरीची अर्पणपत्रिका अशी आहे- ‘प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या केऑसला…’

Advertisement

तर असा सगळा विचार झाल्यावर प्रोटॅगॉनिस्ट समीर, चैतन्य, सानिका, सलोनी, दादूकाका आणि अरुण ही सगळी पात्रं एकेक करत निर्माण होत गेली. प्रत्यक्ष लिहीत असताना तर कधी कधी सानिका माझ्या शेजारी बसून मला तिची गोष्ट सांगते आहे असं वाटायचं, किंवा रस्त्यातून चालत असताना अचानक सलोनी समोरून येऊन ‘हाय’म्हणेल असं वाटायचं. कादंबरी लिहिताना मी काही कवितावजा नोंदी केल्या होत्या. त्यांपैकी एक इथे आवर्जून द्यावीशी वाटते-

‘मी माझ्यातले सगळे प्राण

Advertisement

एकत्र करून बसतो

हरेक श्वास तुला देतो

Advertisement

तुझ्यासाठी सगळी शक्ती एकवटतो

तुझ्यात प्राण फुंकलाय

Advertisement

म्हटल्यावर

तुला जगवायला हवं

Advertisement

आणि तरी-

तुला जोडलेली नाळ

Advertisement

एक ना एक दिवस

लागेलच तोडावी’

Advertisement

२.

३० डिसेंबर २०२१. दुपारी दोनचा सुमार. माहीत नसलेल्या नंबरहून मला कॉल आला. मी घेतला. समोरून आवाज… ‘‘बधाई हो.   मैं साहित्य अकादमी से बोल रही हूँ. आपको अकादमी का युवा पुरस्कार प्राप्त हुआ है…’’

Advertisement

मी ऐकत राहिलो. आभार मानत फोन ठेवला. आणि काही क्षण मी जे ऐकलं ते आत जायला, समजायला वेळ जावा लागला. पत्र येऊ दे, मगच जवळच्या लोकांना सांगू या, असं म्हणत मी कामाला लागलो. पण लवकरच बातमी सगळीकडे पसरली. फोन सुरू झाले… आणि थोड्या वेळात आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे, हे मेंदूला आकळलं आणि खूप आनंद झाला. राष्ट्रीय पातळीवर लेखनाची दखल घेतली जाणं हे त्यामागचं एक कारण होतं; तसंच दुसरं कारण होतं- मी वर ज्या दोन हजारोत्तरी पिढीचा उल्लेख केला, त्याबद्दल काही बोलणाऱ्या कादंबरीची दखल घेतली गेली हे- जे मला महत्त्वाचं वाटतं.

बऱ्याचदा ‘हल्लीचे लेखक काय लिहितात, जुने लेखक किती चांगले लिहायचे, हल्ली ‘सकस’ साहित्यनिर्मिती होताना दिसत नाही,’ असं ऐकायला मिळतं… किंवा ‘मराठी लेखकांत दम नाही… कसले ते मराठी लेखक?’ असंही बोललं जातं. बरं, हे टीकात्मकरीत्या सविस्तर लिहा, असं म्हटलं तर बहुतेकदा काही वाचलेलं नसतं, त्यामुळे शेरेबाजीचा सोपा पर्याय निवडला जातो. दुसरीकडे ‘कथा-कादंबऱ्या फारशा खपत नाहीत, मराठी कोण वाचतो हल्ली?’ असंही बोललं जातं. (मोठ्या प्रकाशन संस्थांचं पाठबळ नसतानाही काही पुस्तकांची हजारोंनी विक्री होताना दिसते. आणि हे तरुण लेखक तथाकथित ‘मेन स्ट्रीम’मधले नाहीत… जे महत्त्वाचं आणि दखल घेण्याजोगं आहे एवढंही साधं भान आजूबाजूला दिसत नाही!) अशा काहीशा निराशावादी आणि तुच्छतेने भरलेल्या वातावरणामध्ये या पुरस्काराच्या बातमीनंतर मला माझ्या समकालाला भिडणारे, त्याला प्रतिसाद देणारे माझ्या वयाचे किंवा थोडे मागचे-पुढचे अनेक लेखक-कवी दिसले. यातले काही शहरी, खेड्यांतून शहरात आलेले, काही निमशहरांतले, काही गावात राहणारे आहेत. ते कथा-कादंबऱ्या रचत आहेत, काहीतरी नवं शोधू, सांगू पाहत आहेत. ही ऊर्जा आहे… या ऊर्जेचं आपण काय करतोय? तर हा पुरस्कार म्हणजे मला ही माझ्यासोबत असलेल्या सगळ्या लिहित्या मंडळींचीही दखल घेतल्यासारखी वाटते.

Advertisement

३.

लेखक म्हणून मला असं वाटतं की, मानवी संबंध अत्यंत गुंतागुंतीचे असतात, त्यात असंख्य रंगच्छटा असतात. या छटा मला लेखक म्हणून पकडायच्या असतात. तसा माझा प्रयत्न असतो. माणसा-माणसांमधले संबंध का घडतात, का बिघडतात, माणसं जवळ का येतात, आणि एकाएकी ती दूर का जातात याबद्दल मला कुतूहल वाटतं. त्याचा शोध ‘काळेकरडे’त घेण्याचा प्रयत्न आहे. एखादी घटना घडल्यावर मला त्या घटनेकडे लेखक म्हणून विविध कोनांमधून पाहायचं असतं. कारण आपल्याला जे वरवर दिसतं, त्यामागे अनेक घटना-प्रसंगांचा गुंता असतो. त्यामुळे आपल्याला जे वास्तव वाटतं, त्यात या गुंतागुंतीच्या घटनांचे अनेक स्तर असतात. कधी कधी तर हे स्तर आपल्यासमोर अगदी ढोबळरीत्या प्रक्षेपित केले जात असतात. त्यामुळे वास्तवामागे दडलेल्या, सहसा कोणी लक्ष देणार नाही अशा गोष्टींकडे पाहावंसं वाटतं.

Advertisement

लेखनाकडे मी ‘चुका आणि शिका’ (Trial and error)  या दृष्टिकोनातून पाहतो. त्यातून मी शिकतो, नवनवीन शोध घेत राहतो. आपल्या आंतरिक आवाजाला साक्षी ठेवून मला सुचलेल्या कल्पनांना कथारूप देण्याचं काम करतो. दिसलेल्या अनुभवाला, आशयाला मी मला जमेल तसं भिडतो आणि त्यातून कथा निर्माण करायचा प्रयत्न करतो, आणि असं करताना यशापयशाचा विचार करत नाही. असा विचार न करण्यातून जो आनंद मिळतो, तो मला महत्त्वाचा वाटतो व माझा हात लिहिता ठेवतो. या पुरस्काराकडेही मी प्रोत्साहन, पुढे आणखी काम करण्यासाठी मिळालेली ऊर्जा म्हणूनच पाहतो. त्यामुळे यानंतरही माझा हात लिहिता राहील…

[email protected]  

Advertisement

The post एका ‘केऑस’ची गोष्ट appeared first on Loksatta.Source link

Advertisement