मुंबई29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीच्या आधी काही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दरम्यान राजस्थान विधानसभा निवडणुकीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे भाजपला पुन्हा एकदा राजस्थानमध्ये सत्ता हवी आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती महत्त्वाचा मोहरा लागला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा एकेकाळचा अत्यंत जवळचा सहकारी आणि राजस्थानमधील एक बडा चेहरा असलेले राजेंद्रसिंह गुढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.
राजस्थान विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तसे या निवडणुकीची रंगत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये लाल डायरी चर्चेचा विषय ठरली आहे. या डायरीमध्ये राजस्थानच्या गेहलोत सरकारच्या भ्रष्ट्राचाराचे सर्व पुरावे असल्याचे बोलले जात आहे. स्वत: केंद्रीय गृहमंत्री अजित शहा यांनी या डायरीचा उल्लेख केला होता. ही डायरी एकेकाळी गेहलोत यांचे जवळचे मानले जाणारे राजेंद्रसिंह गुढा यांच्याकडे असल्याचे बोलले जाते. तेच गुढा आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे हे राजस्थानमध्ये जाणार आहेत. तेथे गुढा आणि त्यांचे समर्थक शिवसेनेत प्रवेश करतील.
राजस्थान शिवसेनेच्या प्रभारींनी दिली माहिती
शिवसेनेचे राजस्थान प्रभारी चंद्रराज सिंघवी यांनी ट्वीट करून गुढा हे 9 सप्टेंबरला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. सिंघवी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 9 सप्टेंबरला राजेंद्र गुढा यांच्या आगमनाने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. मात्र, ही फक्त सुरुवात आहे. पडद्यामागे 20 विजयी उमेदवार शिवसेनेत येण्यासाठी सज्ज असल्याचा दावाही सिंघवी यांनी केला आहे.
गहेलोत सरकारमध्ये मंत्री, तरी ओढले होते ताशेरे
विशेष म्हणजे राजेंद्रसिंह गुढा हे राजस्थानमधील गहेलोत सरकारमध्ये मंत्री होते. तरी देखील त्यांनी राजस्थान सरकारवर टीका केली होती. मणिपूर येथील बलात्काराच्या घटनेवर बोलण्यापेक्षा राजस्थानमध्ये होणाऱ्या महिला अत्याचाराबाबत गुढा यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. इतकेच नाही तर काँग्रेसने त्यांना पक्षातून देखील काढले होते.