उद्योगाच्या प्रकाशवाटा…


करोना प्रादुर्भावाच्या काळात विशेष विचार करून दिवाळीसंबंधित कोणत्या वस्तू बाजारात आणता येतील, त्या थेट ग्राहकापर्यंत कशा पोहोचवता येतील, यासाठी उद्योजिकांनी काही कल्पक पर्याय अवलंबण्यास सुरुवात केली आहे

Advertisement

|| शैला गोखले

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. गेल्यावर्षीपासून मात्र त्यावर करोनाची काळी छाया पडली आहे. अर्थात, सुरुवातीच्या भांबावलेल्या अवस्थेतून उद्योजक स्त्रियांनी स्वत:ला बाहेर काढत या मंदीतच संधी शोधली. दिवाळीला लागणाऱ्या नेहमीच्याच वस्तू- फराळ, रांगोळ्या, पणत्या, तोरणं, त्यांनाच कल्पकतेची जोड देत अनेकींनी करोनाच्या प्रतिकूल काळात आपले उद्योग व्यवसायासाठीअनुकूल केले. अशाच या काही जणी, ज्यांनी आशेची पणती लावत, उद्योगाच्या प्रकाशवाटा दाखवत स्वत:बरोबरच अनेकांची आयुष्यं उजळली…

Advertisement

‘आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या आंघोळी। घरोघरी जागविते माय मुले झोपलेली॥’

हे अगदी दिवाळीसाठीच असलेलं माझ्या बालपणीचं गाणं आठवलं आणि मी भूतकाळात पोहोचले… दिवाळी म्हणजे सगळ्यांचा अगदी आवडता सण. नवे कपडे, घरात खाण्यापिण्याच्या पदार्थांची रेलचेल, पाहुण्यांची वर्दळ, घराच्या दारापासून अगदी घरातल्या लहान मुलांपर्यंत सगळं कसं स्वच्छ सुंदर, नटलेलं, सजलेलं, चेहरे हसतमुख… त्यामुळे दिवाळी संपूच नये, असं लहानपणी हजार वेळा मनात येत असे…

Advertisement

  मन इतकं  छान आठवणीत रमलेलं असताना शेजारच्या घरातल्या काकांचा आवाज कानावर पडला, ‘‘अगं, या करोनाची कुणाला भीतीच राहिली नाहीये का? बाजारात ही गर्दी. अगदी तोरणापासून फटाके, अत्तर, साबण, फराळ, सगळं सगळं घ्यायला जनसमुदाय नुसता लोटलाय! माणसांचा समुद्रच म्हण ना! पण आपण मात्र कुणीही काहीही खरेदी करायला, गर्दी करायला कुठेही बाहेर जायचं नाही. आपण शक्य तेवढी काळजी घ्यायचीच.’’ ते असं फर्मान जाहीर करत असताना त्यांच्या सूनबाई सोनाली यांनी त्यांना थोडं शांत केलं. मला त्यांच्या ‘यंदा बाजारात जायचं नाही’ या म्हणण्याचं कु तूहलच वाटलं. मग सोनालीनं माहिती पुरवली, की ‘आम्ही दरवर्षीसारखीच दिवाळी साजरी करणार आहोत. फराळ, उटणं, पणत्या सगळं असणार आहे. पण ते गर्दीत न जाताही सहज उपलब्ध होणार आहे.’ या सर्व गोष्टी पुरवणार कोण?  याचं उत्तर काही स्त्री उद्योजकांनी एकत्र येऊन सुरू के लेल्या उपक्रमामुळे मिळालं आहे, असं तिचं म्हणणं होतं. तिचं म्हणणं खरंच होतं. आणि ही फक्त एखाद्या ठिकाणची गोष्ट नाही. राज्यभर ठिकठिकाणी लहान लहान व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया एकत्र आल्या आहेत.

करोना प्रादुर्भावाच्या काळात विशेष विचार करून दिवाळीसंबंधित कोणत्या वस्तू बाजारात आणता येतील, त्या थेट ग्राहकापर्यंत कशा पोहोचवता येतील, यासाठी उद्योजिकांनी काही कल्पक पर्याय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी तोंडावर आलेली असताना त्यांना या प्रयत्नांची फळंही चाखायला मिळत आहेत.

Advertisement

‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या ठाणे शाखेच्या प्रमुख मीनल झेंडे आणि त्यांच्या उद्योगिनी सख्यांनी करोनाच्या  काळातही व्यवसायाच्या बांधणीसाठी मार्ग कसा काढायचा, व्यवसायाची घडी कशी पूर्ववत करायची, यासाठी गेले दोन महिने प्रत्यक्ष भेटून चर्चा केल्या. त्या वेळी लक्षात आलं, की करोनाच्या काळात अनेक जणी घरगुती पदार्थांची विक्री करत आहेत. ज्यांच्या छोट्या छोट्या नोकऱ्या होत्या पण त्या सुटल्या आहेत, त्यांनी अर्थार्जनाचा काही मार्ग शोधलाच पाहिजे या उद्देशानं आपलं सुगरणपण पुन:श्च पारखून घेतलं, आपल्याला उत्तम जमणाऱ्या नावीन्यपूर्ण किंवा पारंपरिक पदार्थाची खात्री करून घेतली. तेच पदार्थ आधी थोड्या प्रमाणात आणि नंतर मागणीनुसार विकण्यास सुरुवात केली. हे सर्व दिवाळीला लागणाऱ्या गोष्टींसाठीही सुरू राहील, असाही अंदाज आला. मग मीनल आणि त्यांच्या व्यवसाय सख्यांनी विपणनाची एक युक्ती काढून ‘दिवाळी हॅम्पर’ तयार केली. मीनल सांगतात, ‘आमच्यात एकच पदार्थ बनवणाऱ्या तीन-चार जणी आहेत. मग कुणाला संधी देणार आणि कुणाला नाकारणार, असा प्रश्न होता. म्हणून मग एकाच दिवशी स्त्रियांनी आपापला विशेष पदार्थ बनवून आणला आणि तज्ज्ञांच्या टीमनं त्याची चव घेऊन गुण दिले. जिचा पदार्थ अधिक लोकांना आवडला होता, त्याच स्त्रीची हॅम्परसाठी तो पदार्थ बनवण्यास निवड करण्यात आली. त्या पदार्थाची चव जशी पाहिली , तसाच त्यामध्ये वापरलेल्या गोष्टींचा दर्जाही पाहिला गेला. ज्या स्त्रिया यामध्ये सहभागी झाल्या, त्यांना इतरांनी मदत करायची असं ठरलं.’ हे हॅम्पर बनवताना त्या त्या स्त्रीची ओळखही ग्राहकांना होईल याचीही त्यांनी काळजी घेतली. जिचा तो पदार्थ आहे, त्यावर तिचा नंबर, ब्रँड आणि इतर आवश्यक गोष्टी दिल्या आहेत. जेणेकरून नंतर ज्या ग्राहकाला एखादा पदार्थ आवडेल, त्याला उत्पादक स्त्रीशी थेट संपर्क करणं सोयीचं होईल. मीनल यांनी सांगितलेला हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यामुळे प्रत्येकीला आपल्या आपल्या गोष्टीसाठी जे श्रेय मिळेल, ते तिच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री झाली आहे. हॅम्पर बनवताना पॅकिंगसाठी कोणत्या गोष्टी वापरायच्या, याबाबतही त्यांनी चर्चेनं योग्य ती निवड केलेली दिसते. हॅम्पर ठेवण्यासाठी त्यांनी बांबूची टोपली वापरली आहे. ती घरोघरी नंतरही उपयोगात येऊ शकतेच, शिवाय ती पर्यावरणपूरकही आहे. त्याचबरोबरीने पणत्या सुंदर रंगवून त्यावर सजावट करण्यात आली आहे. त्या घेताना सामाजिक भानही जपण्यात आलं असून सर्व पणत्यांचं सौंदर्य वाढवण्याचं काम एका विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलं आहे. अशा या दिवाळी हॅम्पर्सना आता ग्राहक हवा होता. एका दुकानदारानं मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्याच्याकडे ही हॅम्पर्स विक्रीस ठेवायचं ठरलं. त्या दुकानदारानं ग्राहकांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसल्याचं सांगितलं. आज खरेदीसाठी बाजारात जाण्याची अनेकांना भीती वाटते. तेच पथ्य पाळून मीनल व इतर स्त्रियांनी ही हॅम्पर्स ऑनलाइन विकण्यास सुरुवात के ली. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ‘माऊथ पब्लिसिटी’चा  उपयोग करून घेऊन दिवाळी हॅम्पर ग्राहकांच्या घरोघरी पोहोचत आहेत.

 दिवाळीत आकाशकं दील आणि लहान मुलांच्या भावविश्वात किल्लयांना मोठं महत्त्व असतं. काळाप्रमाणे कंदील बनवण्याचं सामानही बरंच बदललं, पद्धती बदलल्या. मुंबईत घाटकोपरमध्ये राहणाऱ्या किरण दळवी यांनी ४०-४५ वर्षांपूर्वी आपल्या चरितार्थासाठी आकाशकंदील करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी त्या बाजारातून कागद आणून, ते कापून, वेगवेगळ्या आकाराचे कंदील करत असत. त्याही वेळी त्यांच्या मदतीला तीन-चार माणसं होती. त्यांची मुलं मोठी झाली. सर्वांत धाकट्या मुलानं नोकरी सोडून आईनं सुरू केलेला हा व्यवसाय वाढवला. आज त्यांच्याकडे प्लास्टिक, वेलवेट, कार्डपेपर, कापड अशा वेगवेगळ्या साहित्यापासून बनवलेले कंदील मिळतात. हा व्यवसाय ‘रविराज आर्ट’ या ब्रँड नावानं प्रसिद्ध आहे. किरण पूर्वी घरातूनच व्यवसाय करीत असत. आकाशकं दिलाबरोबर त्या राख्याही बनवत. आज दादरमध्ये रानडे रोडवर, तसंच बाजारात त्यांच्या ब्रँडचे कं दील मोठ्या संख्येनं दिसतात. यातलं कटिंगचं काम मशीनवर केलेलं असतं. आता त्यांचा व्यवसाय इतका स्थिरावला आहे, की पॅकिंग करणारे, चिकटवणारे, डिझाइन करणारे, असे किमान १०० लोक गणपतीपासून किंवा त्याच्याही आधीपासून किरण यांच्या या विस्तारित व्यवसायात रोजगार मिळवत आहेत. यातील काही कंदिलांचं डिझाइन असं असतं, की दिवाळी संपल्यानंतरही आपण ते घरात शो-पीस म्हणून लावू शकतो. किरण सांगतात, ‘‘मी आता प्रत्यक्ष कारखान्यात जाऊ शकत नाही, पण गोडाऊनचा काही भाग घराजवळच असल्यानं मालाची ने-आण करण्यावर, ऑर्डरप्रमाणे माल दिला जातो की नाही या सर्व गोष्टींवर स्वत: लक्ष ठेवते.’’ पूर्वी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांनी रात्र रात्र जागून काम केलं आहे. त्याचं आज चीज झालं अशी त्यांची भावना आहे. नव्या पिढीनं व्यवसाय वाढवला, नवी डिझाइन्स तयार केली, याचा त्यांना अभिमान आहे.

Advertisement

जी गोष्ट आकाश कंदिलाची, तीच रांगोळीची. शिरगोळ्याची रांगोळी, अनेक छटांमध्ये मिळणारे रंग, वर्षानुवर्षं जपून ठेवलेला ठिपक्यांचा कागद आणि दारादारात गेरूनं सारवलेले चौकोन असं चित्र डोळ्यांसमोर लगेच उभं राहतं. आता मात्र फुलंपानं किंवा फ्री-हँडचे आकार कापून त्यावर केलेली सजावट, अशा कल्पक रांगोळ्या दिसतात. पण तरीही अनेकांना पारंपरिक रांगोळी विशेष आवडते. त्यासाठी

प्रीतम देशपांडे यांनी अनेक प्रयोग करून या प्रकारच्या रांगोळीचा व्यवसाय सुरू के ला आहे. फोम वापरून, त्यावर रांगोळी व रंग चिकटवून, अगदी दारात काढतात तशी मोठी रांगोळी त्या देतात. ही रांगोळी अगदी हलकी, सहज कुठेही नेता येईल अशी असते. शिवाय तिचं वैशिष्ट्य म्हणजे धूळ, कचरा बसून ती खराब झाली, तर ती धुताही येते. ही रांगोळी बनवण्याचं काम थोडं किचकट आहे, पण प्रीतम आपल्या कलाकार सहकाऱ्यांबरोबर हे काम मनापासून करतात. त्या अगदी चार बाय चार फूट इतकी मोठीही रांगोळी बनवून देतात. दारात, देवापाशी, जेवणाच्या ताटाभोवती मांडता येण्याजोग्या रांगोळ्या त्या करतात. या रांगोळ्या त्यांनी परदेशस्थ भारतीयांपर्यंतही पाठवल्या आहेत.

Advertisement

दिवाळीत रांगोळीचीच नव्हे, तर संपूर्ण घराचीच शोभा वाढवणाऱ्या पणत्या हव्यातच. दिवे अनेक प्रकारांनी सजवून अगदी कॉर्पोरेट जगतातही पोहोचवणाऱ्या सीमा यांचं कामही कौतुक करावं असंच. गणपती, दिवाळी, नाताळ, गुढीपाडवा, संक्रांत अशा प्रत्येक सणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शोभिवंत वस्तू पुरवणाऱ्या सीमा खऱ्या ओळखल्या जातात त्या मात्र दिवाळीतले दिवे आणि घरांच्या दारांवर, मोठमोठ्या कंपन्यांतूनही शोभा वाढवणाऱ्या तोरणांसाठी.

करोना टाळेबंदीमध्ये व्यवसायात टिकून राहण्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागले. दरवर्षी त्या कुं भार किंवा मातीकाम करणारे जिथे पणत्या तयार करतात, तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहिजे त्या आकारात पणत्या, दिवे करून घेतात. पण या वेळी एकाच कामासाठी त्यांना परत परत जावं लागलं. त्यांच्याकडे दिव्यांचं काम करण्यासाठी घराजवळ राहणाऱ्या, गरीब वस्तीतल्या मुली येतात. सीमा सुरुवातीला त्यांना शिकवतात आणि त्यांना स्वत:च्या सर्जनशीलतेनं काही करायचं असेल तर त्यासही वाव देतात. ‘काही कलाकृती फु कट जातील, पण नंतर नवीन काही के ल्याचं समाधान मिळेल,’ असं त्या म्हणतात.  त्या दिव्यांच्या सजावटीसाठी कॉर्पोरेट वर्तुळातही प्रसिद्ध आहेत. यंदाही त्यांना दोन कंपन्यांनी स्टॉल लावण्यासाठी बोलावलं आहे.    

Advertisement

टाळेबंदीत आलेल्या दिवाळीतही त्या दोन ठिकाणी आपल्या वस्तू घेऊन गेल्या होत्या.  त्यांना दरवर्षीइतकी कमाई झाली नसली, तरी त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या मुलींना काही ना काही काम देता आलं. त्यातून त्यांची मिळकत झाली आणि टाळेबंदीत अनेकांना निष्क्रियतेमुळे निराशा आली होती, तशी आली नाही. हा वेळ त्यांनी वेगवेगळी नवीन डिझाइन्स तयार करण्यासाठी वापरला. वेळेची गुंतवणूक के ली आणि त्यातून व्यवसायात नावीन्य आणलं गेलं. या कामात त्यांच्या मदतनीसही काही वेळा सहभागी झाल्या. त्यांच्याकडे येणाऱ्या मुली शिकणाऱ्या आहेत. त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी थोडे थोडे पैसे मिळत राहिले. टाळेबंदीत त्यांच्या सर्वांच्याच घरात बिकट परिस्थिती होऊ घातली होती, त्यात या मुली थोडा हातभार लावू शकल्या.

चकाकत्या दिवाळीला सुगंधाची श्रीमंतीही हवी! यातील संधी ओळखून सायली ढमढेरे यांनी सुगंधी हॅम्पर तयार के लं आहे. करोनाच्या काळात सुगंधानं मनांना उभारी दिली आहे. हे सुगंध नैसर्गिकरीतीनं बनवलेले असल्यामुळे ते आपलं निसर्गाशी नातं जोडण्यास हातभार लावतात, असं सायली यांना वाटतं. त्यांचा अत्तराचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांच्याकडे अनेक गोष्टींसाठी अत्तरांचे ‘कॉन्संट्रेटेड’ अर्क नेण्यासाठी अनेक जण येतात. २०१४ पासून सायली यांनी स्वत:ही या व्यवसायात नाव निर्माण करायला सुरूवात केली. त्या नेहमीच प्रदर्शनांमध्ये भाग घेतात आणि व्यवसाय पुढे नेतात. त्यांच्या सुगंधी हॅम्परमध्ये दिवाळीच्या झगमगाटाला साजेसा बटवा आहे. त्यात अरोमा ऑइल, अत्तर, चंदनाचा सुगंध दरवळेल असा साबण, सुगंधी उटणं, याच्या जोडीला कधी रांगोळी, तर कधी दिवे यांची जोड त्यांनी दिली. सायली यांनी करोनाच्या काळात रोजच्या धकाधकीतून मिळालेला वेळ व्यवसाय कसा वाढवता येईल यावर विचार करण्यासाठी दिला. विपणनाचे मार्ग शोधले. काही वेळा मनाला, बुद्धीला जी विश्रांती लागते, त्यातून उद्याचा विश्वास मिळतो. तो सायली यांना मिळाला. कविता करण्याची आवड पूर्ण करता आल्यानं त्यांना कल्पनांत रमता आलं आणि वेगळी ऊर्जा मिळाली.

Advertisement

गेले दीड वर्ष शाळा बंद असल्यामुळे घरीच असलेल्या मुलांना एका जागी कसं बसवावं, गुंतवून कसं ठेवावं, हा पालकांपुढे प्रश्न होता. अशा अनेक पालकांनी गौरी टिकले यांच्या ‘क्रिएटिव्ह किट’ला पसंती दिली. या किट्सचा वापर करून मुलं काही वस्तू स्वत: बनवू शकतात. त्यातल्या सूचना नेटकेपणानं लिहून दिल्यामुळे आई-बाबांची मदत घेण्याची मुलांना गरज भासत नाही. तीन-साडेतीन वर्षांच्या मुलांपासून विविध वयोगटांच्या मुलांसाठी ही किट्स त्यांनी उपलब्ध के ली आहेत. यात ‘दिवाळी किट’ही आहे. त्यात मुलं आकाशकंदील, फ्लोटिंग रांगोळी, तोरण, शोभिवंत पणत्या बनवू शकतील असं सामान दिलं आहे. प्रत्येक वस्तू कशी बनवायची याचं सूचनापत्रक, फोटोही आहेत. वारली पेंटिंग, ग्रीटिंग बनवणं, मास्क (मुखपट्टी) बनवणं, फ्रीजवर लावायचे मॅग्नेट सजवणं, अशी अनेक किट्स आहेत. टाळेबंदीत गौरी यांच्याकडे येऊन काही जण ही किट्स नेत होते. जवळपासच्या भागात घरं असणाऱ्या ग्राहकांना गौरी स्वत:ही ती नेऊन देत होत्या. हल्ली ही किट्स ऑनलाइनही विकली जातात. गौरी या ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या विलेपार्ले शाखेच्या प्रमुख म्हणून काम करतात. त्यांनी सर्वांनी मिळून टाळेबंदीच्या काळात आपला व्यवसाय आणि लोकांची गरज याची सांगड घातली आणि अनेकींच्या हातांना काम दिलं हे कौतुकास्पद आहे.

   या सगळ्या मैत्रिणी टाळेबंदीमुळे खचून गेल्या नाहीत. त्यातही व्यवसाय बदलून किंवा विपणन वेगळ्या प्रकारे करून त्यांनी संधी शोधल्या. दिवाळीच्या निमित्तानं व्यवसाय          फु लवला. स्वत:ची, कुटुंबाची त्यांनी काळजी घेतलीच, पण अनेकांच्या मुखी चार घास घातले. कधी लोकांच्या मनाला समाधान दिलं, तर कधी जगण्याची आशा तेवती ठेवली.

Advertisement

shailagokhale@rediffmail.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement