उदारीकरणपूर्व आणि पश्चात काळाचे तीव्र पडसाद


या संग्रहात स्वत: वसंत गुर्जर आणि ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची काही रेखाटने आहेत.

Advertisement

सुनंदा भोसेकर [email protected]

लघुअनियतकालिकांच्या चळवळीतून पुढे आलेले कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा ‘कोलाहल’ हा चौथा कवितासंग्रह. याआधीचा त्यांचा संग्रह ‘समुद्र’ १९७९ मध्ये प्रकाशित झाला होता. वसंत गुर्जर हे साठोत्तरी पिढीतले महत्त्वाचे कवी. मराठीतल्या या आघाडीच्या कवीचा संग्रह जवळपास ४१ वर्षांनी प्रकाशित होत आहे ही एक प्रकारे आपल्या वाङ्मयीन संस्कृतीवरची टिपण्णीच आहे. हा संग्रहसुद्धा कवी आणि समीक्षक चंद्रकान्त पाटील यांनी पुढाकार घेऊन तुला प्रकाशनातर्फे प्रकाशित केला आहे. या संग्रहामुळे गुर्जरांच्या कवितेविषयी आस्था बाळगणाऱ्यांना आणि मराठी कवितेच्या अभ्यासकांना या कविता एकत्रित उपलब्ध झाल्या आहेत.

Advertisement

‘विश्वातील कोलाहलास..’ अर्पण केलेल्या ‘कोलाहल’ या संग्रहामध्ये एकूण ११६ कविता आहेत. यातल्या बहुतेक कविता १९७५ ते २०११ या काळात नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. उदारीकरणपूर्व आणि उदारीकरणापश्चात अशा काळाच्या एका मोठय़ा पटाचे पडसाद या कवितांमध्ये पाहायला मिळतात. या काळात भोवतालच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पर्यावरणात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर, त्याच्या जीवनशैलीवर, विचारपद्धतीवर या बदलांचे दूरगामी परिणाम झाले आहेत. या बदलत्या काळाचे प्रतिबिंब, त्याविषयीच्या परखड प्रतिक्रिया गुर्जरांच्या कवितांमध्ये उमटलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या शैलीत होत गेलेले बदलही त्यात दिसून येतात.

या संग्रहातल्या कवितांचे गुर्जरांनी ‘आतात’, ‘आतबाहेर’ आणि ‘टॉवर्स’ असे तीन भाग पाडले आहेत. ‘आतात’ मध्ये कवीच्या स्वत:च्या आतल्या विश्वाचा मागोवा आहे. हताश उद्विग्नता आहे. डोळ्यास डोळा न लागलेल्या रात्री तो अंत नसलेल्या विचारचक्रात ढासळतो आणि आठवणींची पाठवणी करून गप्प होतो. आणखी एका कवितेत अंगमोड दिवसभरातून जळजळ उतरताना सविस्तर आठवणी ठणकतात. गप्प होत गेलेला कवी माणसांशी बोलता बोलता भिंतींशी बोलू लागतो. आजूबाजूची माणसे आरशातून, खिडकीतून, दरवाजातून पसार झालीत. आरशातून पसार होणे म्हणजे स्वत:चेच पसार होणे.. पराकोटीचे एकाकीपण आणि परात्मता. ‘ठेव’ नावाच्या कवितेत ते म्हणतात- ‘बस पुढय़ात/ घेऊन/ काळोख/ पिढय़ांचा. ओढ जगणं/ तणाव/ तणतणत.’ या कवितेतली शेवटची ओळ आहे ‘हमसाहमशी/ मुठीत ठेव माती/ स्वत:ला देण्यासाठी.’ अशी अनेक अवतरणे देता येतील. ‘येरझार’ कवितेत ते लिहितात, ‘तू/ वाट काढ/ आपली/ एकटेपणातून/..’ ‘तू/ ये/ आणि/ जा.’ ‘प्रचंड उद्वेग’ नावाची एक कविता आहे. ‘आयुष्य उलथून पडताना/ सूर्य डुबत होता आणि चिमण्या शांत/..त्या शांततेत/ पुरातन वृक्ष कोसळावा/ तसा मी कोसळलो माझ्यात.’

Advertisement

भोवतालच्या घटितांचा अर्थ, त्याचे परिणाम हे त्यांच्या कवितेला ज्ञात आहे. कवीची शैली त्रयस्थ आहे; पण कविता नाही. ते हाडाचे मुंबईकर आहेत. त्यांना वेगळी अशी महानगरीय कविता लिहावी लागत नाही. त्यांची सगळी कविताच महानगरीय आहे. मुंबईकरांचा खास जिवटपणा, सतत जागी असणारी विनोदबुद्धी, कडवट उपरोध, वास्तवातल्या विसंगतीचे तिरकस चित्रण ही त्यांच्या कवितेची वैशिष्टय़े आहेत. राखेखालच्या निखाऱ्यासारखा त्यांचा विद्रोह संयत आहे. त्यांचा उपरोध, उपहासाच्या मागे माणसाविषयीचे प्रेम, करुणा, आत्मीयता आहे.

गुर्जरांची शैली मुळातच अल्पाक्षरी आहे. ते लिहितात, ‘मी कमी बोलतो/ आणि एकटय़ात मात्र/ भडभडा/ इतरांना सामसूम.’

Advertisement

शब्दांचा कमीत कमी वापर करून ते आशयाशी टक्कर देतात. कवितेच्या रचनेमध्ये शब्दांची मुद्दाम मोडतोड करून, शब्द उलटसुलट करून ते भोवतालचे विदारक वास्तव आपल्यासमोर सोलून उभे करतात. तुटक तुटक शब्दांतून ते व्यक्तीचे तुटलेपण व्यक्त करतात. आयुष्यभर वसंत गुर्जर गिरगावातल्या एकाच चाळीत राहत आहेत. गिरगाव हे एकेकाळचं मराठी मध्यमवर्गाचं सांस्कृतिक केंद्र. आता मराठी संस्कृती तिथून दूर फेकली गेली आहे. मराठी माणूस गिरगावातून हद्दपार होतो आहे. तिथल्या चाळींच्या जागी मोठमोठे टॉवर्स उभे राहत आहेत. कायापालट झालेल्या गिरगावचं चित्रण त्यांच्या ‘टॉवर्स’ या कवितामालिकेत आले आहे. कवितेचं नाव : ‘जा’. ‘चाळीच्या/ कण्या/ कर/ राईचा/ टॉवर/ कर/ उरावर/ आभाळ/ घे/ अन् / तीळ तीळ तुटून जा’.. ‘टाटा’ नावाची ही एक कविता : ‘घे/ खोका/ घे/ पेटी/ घे /कंटेनर तू/ जा/ कर्जतला/ तू /जा/ कसाऱ्याला/ तू/ जा/ पालघरला/ तू/ जा/ बोईसरला/ तू/ जा/ तानाजी मालुसरे सिटीत/ तू/ जा/ नॅनो घरात/ टाटा/ कर/ मुंबईला.’ या केवळ वानगीदाखल. ‘मुंबई’ आणि ‘अंबई’ नावाच्या दोन कविता समोरासमोर छापल्या आहेत. यात मुंबईचे नाव बदलून त्याचे आद्याक्षर उद्योगपतीच्या नावाचे होईल याचे सूचन आहे.

अठरापगड जातीधर्माचे हे शहर आहे. इथली अशी वेगळी मराठी आणि हिंदी भाषा आहे. रोजीरोटीच्या झगडय़ात गुंतलेली इथली सर्वसामान्य माणसं ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत गुर्जर कविता लिहितात. त्या माणसांविषयी या कविता असल्या तरी त्या या माणसांसाठी नाहीत. त्यांची शैली स्वतंत्र आहे. त्यांच्या कवितेवर कोणत्याही पूर्वसुरींचा संस्कार नाही. आर्थिक उदारीकरणाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ते कौशल्य संच (स्कील सेट्स) उपलब्ध नसल्यामुळे ससेहोलपट होणाऱ्या मराठी मध्यमवर्गीय माणसांच्या स्थितीविषयी मध्यमवर्गीय माणसाच्या या प्रतिक्रिया आहेत. त्या व्यक्त करताना ते प्रतिमा-प्रतीकांचा आधार घेत नाहीत. गुर्जरांची कविता जाणीवपूर्वक गद्यप्राय आहे. त्यात भाबडी भावविवशता नाही की कल्लोळी आक्रोश नाही. ती संथ स्वरात बोलते. थंडपणे परिस्थितीचे विश्लेषण करते. तिची दृश्य मांडणीही काही वेळा गद्यसदृश असते. पण तरीही ती कविता असते, याचे कारण गद्यातही एक लय असते. क्रियापदांची आवर्तने, उच्चारसादृश्य असलेल्या शब्दांची मांडणी यातून ते कवितेचा परिणाम साधतात. उदाहरणार्थ, ‘हवाई जहाज से खत’ या बंबय्या हिंदीत लिहिलेली सुप्रसिद्ध कविता!

Advertisement

गुर्जरांच्या १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘गांधी मला भेटला’ या पोस्टर कवितेवर अश्लीलता व गांधीजींची बदनामी या कारणांवरून खटला दाखल झाला होता. तब्बल वीस वर्षांनी प्रकाशकांनी माफी मागितल्यामुळे या खटल्याचा निकाल लागला. प्रत्येक ठिकाणी गांधींच्या नावाचा वापर करून किंवा गांधींच्या नावाखाली दांभिकपणा, लबाडी कशी चालते, हे उक्ती आणि कृती यांमध्ये दिसलेली विसंगती पकडून गुर्जरांनी कवितेत मांडले होते. ‘कोलाहल’मध्येही काही राजकीय कविता आहेत. जिवंत माणसाची प्रत्येक कृती ही राजकीय कृतीच असते, या न्यायाने राजकीय परिस्थितीचे विच्छेदन ते करतात; पण बाजू घेत नाहीत.

गुर्जर यांच्या कवितेचे स्वरूप स्वत:शी केलेल्या संवादासारखे आहे. एक सर्वसामान्य, परिस्थितीशरण, एकाकी माणूस स्वत:शीच बोलत आहे. आपोआपच ते बोलणे अशा असंख्य माणसांचे एकेकटय़ाचे बोलणे होते. वसंत गुर्जर या कवीची कविता त्याची एकटय़ाची न राहता अनेकांची होते. त्यांच्या कवितांचे विषय, परिसर एका सीमित भूभागाशी निगडित राहिले. त्यामुळेच सर्वंकष होण्याच्या शक्यता त्यांच्या कवितेत निर्माण झाल्या. स्वत:च्या अनुभवविश्वाशी प्रामाणिक राहून त्यांनी माणसातल्या मूलभूत प्रवृत्तींचा, त्यांच्या लालसेचा, लोभाचा, दांभिकपणाचा आणि अंतिमत: एकाकी असण्याचा माग काढला. ‘कोलाहल’च्या आतल्या पानावर लिहिलेल्या थोडक्या शब्दांत निशिकांत ठकार यांनी लिहिले आहे की, ‘जगणं आणि कविता यांच्या एकमेक होण्यातून अभिव्यक्त होणाऱ्या काही अपवादात्मक कवींपैकी गुर्जर एक आहेत.’

Advertisement

या संग्रहात स्वत: वसंत गुर्जर आणि ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची काही रेखाटने आहेत. राजा ढाले यांनी काढलेले गुर्जरांचे एक अर्कचित्र आहे. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ मिळून सोळाव्या शतकातील प्रख्यात चित्रकार पीटर ब्रॉयगल द एल्डर यांचे १५६२ साली काढलेले ‘ट्रायम्फ ऑफ डेथ’ हे चित्र सलग छापले आहे. मानवी संस्कृतीच्या सर्व अंगांचे आणि तिच्या सनातन शोकात्म वास्तवाचे चित्रण करणारे हे चित्र. गुर्जरांच्या कवितेच्या आशयाशी जैविक नाते सांगणारे असे हे चित्र निवडल्याबद्दल प्रकाशकांचे अभिनंदन.

कोलाहल’- वसंत दत्तात्रेय गुर्जर,

Advertisement

तुला प्रकाशन, औरंगाबाद,

पाने- १८४, मूल्य- ३०० रुपये.

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source link

Advertisement