पुणे9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कर्मचारी राज्य विमा महामंडळ( ईएसआयसी) यांचे कार्यालय औदयाेगिक हब असलेल्या चाकण परिसरात उभारऱ्यात यावे अशी मागणी विविध औद्याेगिक कंपन्या अनेक वर्षपासून करत हाेत्या. अखेर गुरूवारी चाकण येथे ईएसआयसीचे विभागीय शाखा चाकण येथे सुरू केल्याने लाखाे कामगार आणि सदर भागातील शेकडाे कंपन्यांची अडचण दूर झाली आहे.
ईएसआयसीने ऑगस्ट 2016 पासून चाकण क्षेत्रासाठी इएसआयसीची व्याप्ती लागू केली परंतु आतापर्यंत चाकण येथे शाखा कार्यालय नव्हते. त्यामुळे कामगार आणि कंपनी प्रतिनिधींना खूप गैरसाेय हाेत हाेती. वैद्यकीय हक्क किंवा इतर समस्यांशी संबंधित काेणत्याही कामासाठी त्यांना भाेसरी येथील शाखेस भेट द्यावी लागत. त्यामुळे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने सतत प्रयत्न करुन ईएसआयसी काॅर्पाेरेशनच्या बिबवेवाडी कार्यालय, पुणे, मुंबई, दिल्लीच्या कार्यालया साेबत पाठपुरावा करुन चाकण येथे इएसआयसीचे कार्यालय मंजूर करुन आणले.
गुरूवारी एएसआयसीचे कार्यालयाचे उद्घाटन दिल्लीचे मुख्य दक्षता अधिकारी मनाेज कुमार सिंह, उपविभागीय अधिकारी हेमंत पांडे,फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शिवहरी हालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार विनाेद जैन, ईएसआयसी उपसंचालक सुशीर कुमार, राजेश सिंग, महिंद्रा कंपनीचे बाेर्ड सदस्य श्रेयश आचार्य यांच्याह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.
यावेळी मनाेज कुमार सिंग यांनी सदर भागात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्याचे आश्वासन दिले. लवकरच या रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले जाईल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल आणि वैद्यकीय सेवेचा प्रश्न साेडवला जाईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात पांडे यांनी उद्योग आणि विमाधारक व्यक्ती यांना त्यांच्या उत्तम आरोग्य आणि विमा सेवांचे आश्वासन दिले.