बुलडाणा43 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार इंडिया शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. यामुळे अवघ्या देशाचे राजकारण तापले आहे. त्यातच आता सरकारने यासंबंधीचा एखादा ठोस निर्णय घेतला तर देशात पुन्हा नोटाबंदी करावी लागेल, अशी भीती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
सर्वकाही इंडिया आघाडीच्या भीतीमुळे सुरू
विजय वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकार राज्यघटनेतील इंडिया शब्द बदलण्यासाठी विधेयक सादर करणार आहे. हे घाबरण्याचे लक्षण आहे. इंडिया म्हणजे भारत हे संविधानाताच नमूद आहे. मग नोटांवरही भारत लिहावे लागेल. करा मग नोटाबंदी. हे सर्वकाही इंडिया आघाडीच्या भीतीमुळे होत आहे. राहुल गांधी यांच्या दहशतीमुळेच हे सुरू आहे.
मराठा आंदोलनात 124 आंदोलक जखमी
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून राज्य सरकारवरही निशाणा साधला. सरकारने आंदोलनात नेमके किती लोक जखमी झाले हे अद्याप सांगितले नाही, असे ते म्हणाले. सरकारने मराठा आंदोलन चिरडण्याचे काम केले. त्यांनी मराठ्यांवर लाठाकाठ्या चालवल्या. त्यात तब्बल 124 आंदोलक जखमी झाले, असे वडेट्टीवार म्हणाले.
सरकारने माफी मागितली याचा ते दोषी आहेत. आंदोलन चिरडण्याचे काम सरकार पुरस्कृत होते हे आता सिद्ध झाले. चुकीचे वागल्यामुळेच सरकारने माफी मागितली, असे ते म्हणाले.
राज्यात 2 अलीबाबा अन् 40 चोर
राज्यात 1 टीव्ही व 3 रिमोट अशा पद्धतीचे सरकार सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आताचे सरकार तिजोरी लुटणारे आहे. पूर्वी अलीबाबा 40 चोर म्हणायचे. पण आता 2 अलीबाबा 80 चोर आहेत. राज्याची अशी विदारक स्थिती झाली आहे, असे ते म्हणाले.
56 इंच छाती फुगवून सांगणाऱ्यांवर दुसऱ्याचे घर फोडण्याची वेळ आली. कारण त्यांनी स्वतःच्या बळावर काहीच मिळवले नाही. यामुळे राज्याची स्थिती 1 टीव्ही अन् 3 रिमोट अशी झाली आहे. कुणीही कोणतेही बटण दाबतो आमि तिजोरी लुटतो असा प्रकार राज्यात सुरू आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.