‘इंटरनेट’वरती काचा गं..इंटरनेटच्या अवकाशात मुक्तपणे विहार करू पाहणाऱ्या मुली, स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. कधी ट्रोलिंग, कधी फोटोंचे ‘मॉर्फिग’, कधी घाणेरडय़ा भाषेत चारित्र्यहनन. सायबर हिंसाचार नुसता वाढला नसून आता कोणत्या  पातळीवर गेला आहे याचे ठळक उदाहरण म्हणजे नुकतंच उजेडात आलेलं ‘बुली बाई अ‍ॅप’ प्रकरण. यानिमित्ताने एकूणच सायबरविश्वातील घडामोडींचा ऊहापोह केला आहे ‘सायबर सुरक्षितता’ विषयाचे अभ्यासक आणि प्रचारक उन्मेष जोशी यांनी..

Advertisement

  स्त्रियांची ऑनलाइन सुरक्षा आणि सायबर सखी सेफ्टी टिप्स ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’च्या  http://www.responsiblenetism.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या सर्वानी अभ्यासाव्यात. तक्रारी किंवा शंकांसाठी पुढील हेल्पलाइन्सची मदत घेऊ शकता 

 महिला आयोग हेल्पलाइन – ७४७७७२२४२४

Advertisement

 रिस्पॉन्सिबल नेटिझम हेल्पलाइन – ८४३३७०१०७७.

 सोशल मीडिया सपोर्ट हॅन्डल्स –  http://www.responsiblenetism.org

Advertisement

स्त्रियांवर टीका करण्यासाठी, अनेकदा तर तिला बदनाम करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जाणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. सुरुवातीला फक्त लिखाणातून किंवा शाब्दिक टीका (घाणेरडय़ा, गलिच्छ शब्दांत टीका करणं) करण्याकडे अशा लोकांचा कल होता; आता मात्र तो ‘अ‍ॅक्शन बेस्ड’ होऊ लागला आहे. व्हिडीओ किंवा मिम्स बनवणे, छायाचित्रांचे मॉर्फिग करणं याला ‘अ‍ॅक्शन बेस्ड’ डिजिटल हिंसाचार म्हणतात, जो आता  मोठय़ा प्रमाणात सुरू झालेला आहे. आजकाल बहुतेक सायबर गुन्ह्यांमध्ये अशा पद्धतीने ‘व्हिडीओ बेस्ड’ किंवा ‘इमेज बेस्ड’ तंत्राचा वापर करून स्त्रियांना किंवा मुलींना त्रास दिला जात असल्याचं दिसून येतंय. सायबर हिंसाचार नुसता वाढला नसून आता कोणत्या पातळीवर गेला आहे याचं ठळक उदाहरण म्हणजे नुकतंच उजेडात आलेलं ‘बुली बाई’ प्रकरण. हे खरं आहे की गुन्ह्यांचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे, पण त्याचबरोबर आशेचा किरण म्हणजे तक्रार दाखल करण्याचं प्रमाणदेखील वाढलेलं आहे.

सामाजिक ध्रुवीकरण

Advertisement

 ‘बुली बाई अ‍ॅप’ प्रकरण हे मुख्यत: धार्मिक मतभेदांवर आधारित प्रकरण वाटत आहे.  समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं आणि राजकीय पाठिंब्यानं मुद्दाम केलं गेलंय असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप या प्रकरणाचा शोध घेणं सुरू आहे. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतीलच. इंटरनेटवर स्त्रियांना वेगवेगळय़ा पद्धतीनं त्रास देण्याचे दोन-तीन प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे, मी पुरुष आहे, त्यामुळे कुठल्या बाईनं काही सांगितलेलं मी ऐकूनच घेणार नाही आणि म्हणून मी तिच्यावर टीका करेन. दुसरा प्रकार म्हणजे धर्मातील एखाद्या मुद्दय़ाच्या आधारे स्त्रियांना त्रास देणं आणि तिसरा प्रकार म्हणजे राजकीय पाठबळावर केलेल्या गोष्टी. सामाजिक ध्रुवीकरण हा आजकाल सर्व राजकीय पक्षांचा व्यवहार झालेला आहे. जातीवर आधारित, धर्मावर आधारित ध्रुवीकरण वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. हा प्रकार मतदानात प्रतिबिंबित होताना दिसला होताच, पण आता डिजिटल अवकाशातदेखील हा प्रकार अवलंबला जातोय. स्त्रियांवर टीका करताना जातीनुसारही टीका होताना दिसते.

‘ऑनर किलिंग’सारखे प्रकार इंटरनेटच्या माध्यमातूनही होताना दिसतात. समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी किंवा एका दमात जास्तीत जास्त लोकांना भडकवण्यासाठी या माध्यमांचा वापर होतो. समाजमाध्यमावर तशा पद्धतीची प्रकरणे किंवा गोष्टी रचून त्या वेगवेगळय़ा ग्रुप्सवर पाठवल्या जातात. ‘लव्ह जिहाद’ च्या प्रकरणात तर हिंदू-मुस्लीम दोन्ही गटांकडून समाजमाध्यमाचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर केला गेला. केरळमध्ये काही आंतरधर्मीय लग्न लागली होती. त्यात धर्मातर केलं गेल्यावरून दोन्ही गटांनी समाजात समाजमाध्यमाच्या आधारे बरीच खोटी माहिती, अफवा पसरवल्या होत्या. अशा घटनांचे राजकारण करण्यासाठी, समाजात द्वेष पसरवण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर केला जातो आणि शेवटी यात स्त्रीच अधिक भरडली जाते.

Advertisement

 इंटरनेटवरचं ‘रिलेशनशिप’

आभासी जगातल्या ‘रिलेशनशिप’ या विषयाला अनेक पापुद्रे आहेत. एखादी मुलगी मला ‘रिप्लाय’ देत नाही किंवा मला ‘रिस्पॉन्स’ देत नाही याचा राग येणारे काही लोक असतात. इंटरनेटवर ती जी कुणी मुलगी आहे, तिच्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तिनं ‘नाही’ म्हटलं की मग तिच्या फोटोंचे मोर्फिग करणं, व्हिडीओ बनवणं आणि ते पोस्ट करणं हे प्रकार माहीत होतेच, मात्र अलीकडे ते सातत्याने घडताना दिसतात. ‘रिलेशनशिप’ मध्ये भांडण झालं, ब्रेकअप झालं की तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापासून अत्यंत हीन दर्जाची कमेंट करणं इथपर्यंत हे प्रकार खालच्या थराला जातात. इंटरनेटवर बदनामी करताना पुरावे लागत नाहीत; त्यामुळे तिचं चारित्र्यहनन करण्याचा हा सोपा मार्ग समजला जातो. त्यानुसार बोगस व्हिडीओ, इमेज बनवून टाकल्या जातात. हासुद्धा सायबर हिंसाचाराचाच एक प्रकार आहे. हा हिंसाचार ओळखीतल्या मुलांकडून होतो तसाच अनोळखी मुलांकडूनही मुलींना त्रास दिला जातो. अशा प्रकरणांमध्ये परिचित-अपरिचित दोन्ही प्रकार असतात. एखाद्या स्त्रीचा किंवा मुलीचा इंटरनेटवरचा वावर किती आणि कसा आहे त्या पद्धतीने तिला प्रतिक्रिया येत असतात. एखादीचं बोल्ड स्टेटमेंट किंवा बोल्ड फोटो, व्हिडीओ दिसायला लागले की हळूहळू ट्रोलिंगचं प्रमाण वाढू लागतं. बोल्ड स्टेटमेंट, फोटो किंवा व्हिडीओ टाकणं याचा अर्थ ‘ही वाईट चालीची आहे’ असा लावला जातो आणि त्या दृष्टिकोनातूनच तिला ‘टार्गेट’ केलं जातं. ‘ही सहज उपलब्ध आहे’ असं गृहीत धरलं जातं. ‘रिस्पॉन्स’ नाही दिला की चिडून पुन्हा काही तरी कमेंट करणं, ट्रोलिंग, स्टॉकिंग हे सगळे प्रकार सुरू होतात.

Advertisement

यंत्रणा भक्कम व्हायला हवी  

इंटरनेटवरील गुन्ह्यांचा माग काढणे पोलिसांसाठी तेवढं कठीण नसतं, कारण मोबाइलच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून किंवा समाजमाध्यमाकडून माहिती घेऊन ते माग काढू शकतात; परंतु इतर अनेक अडचणी आहेत. सध्या पोलिसांवर कामाचा भार खूप जास्त आहे, त्यामुळे या तक्रारी सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. समाजमाध्यमाकडे अशी यंत्रणा आधीपासून आहेच, फक्त आता त्यांनी ती यंत्रणा वाढवण्याची गरज आहे. कारण अशा प्रकरणात समाजमाध्यमाकडून जो प्रतिसाद अपेक्षित असतो, तो येण्यास बराच विलंब होतो. लोक त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत असतात. त्यांनी त्यांची यंत्रणा आणखी वाढवली तर लोकांच्या तक्रारीला लवकर प्रतिसाद मिळू शकेल. तंत्रज्ञानाचा पर्याय जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे काम कठीणच असणार आहे. यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या संस्थांना मदतीला घेतले जाऊ शकते किंवा लोकांचे सक्षमीकरण करून यंत्रणा भक्कम केली तर येणाऱ्या तक्रारींवर लवकर तोडगे काढता येतील.

Advertisement

 ‘सुरक्षा आणि गोपनीयता’ महत्त्वाची

 आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘सुरक्षा आणि गोपनीयता’(Privacy &  Security). अनेक प्रकरणांमध्ये मुलींची काहीच चूक नसते, परंतु तरीही तिला इंटरनेटवरच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर आपली प्रतिरोध क्षमता वाढवणं हेसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ‘सेफ्टी अ‍ॅण्ड सिक्युरिटी’चा मुद्दा आहेच. त्या टिप्स लक्षात घ्या. माहितीतला नसलेला, नव्याने ओळख झालेला असा कुणी तरी असतो. मुळात इंटरनेटवरच्या अशा आभासी जगातल्या ‘रिलेशनशिप’मध्ये वाहवत न जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या ‘रिलेशनशिप’मधून बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या आपण पाहिल्या आहेत. एक असं प्रकरण होतं, ज्यात रिलेशनशिपमध्ये असताना त्या मुलीनं तिच्या मित्राच्या सांगण्यावरून स्वत:चे आक्षेपार्ह फोटो काढले होते. तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात होते; परंतु काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यावर तेच फोटो वापरून त्यानं  तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्याबरोबर तिच्या भावालाही तो मुलगा धमक्या द्यायला लागला. पोलिसात प्रकरण गेल्यावर त्यांनी त्या मुलाला बोलावून दम दिला आणि ते फोटो त्याच्या मोबाइलमधून त्यांच्या समोर डिलीट करायला लावले; पण प्रकरण इथे संपलं नाही. काही काळाने जेव्हा त्या मुलीचं लग्न ठरलं तेव्हा या मुलानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे तेच फोटो पाठवले आणि त्यावरून तिचं लग्न मोडलं. पुन्हा प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा कळलं की, त्यानं आधीच ते फोटो दुसरीकडेही ‘सेव्ह’ करून ठेवले होते. हे प्रकरण त्या मुलीला खूप महागात पडलं. म्हणूनच सावधानता बाळगणं हाच यावरचा उपाय आहे. 

Advertisement

आजकाल मुलं-मुली वेगवेगळे ‘डेटिंग अ‍ॅप्स’ वापरून आपली माहिती ‘शेअर’ करतात. ही माहिती कुणालाही सहज उपलब्ध होते, ज्यातून विशेषत: मुलींना त्रास होण्याची शक्यता असते. शक्यतो अशा प्रकारची ‘डेटिंग अ‍ॅप्स’ वापरू नका. एका प्रकरणामध्ये एका तरुणीला वेगवेगळय़ा नंबरवरून अचानक खूप कॉल्स येऊ लागले. फोनवर अत्यंत घाणेरडय़ा भाषेत बोलणं आणि घाणेरडे मेसेज येणं सुरू झालं. तिने पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी तिला फोन नंबर बदलायला सांगितला. तिने फोन नंबर बदलला तरी पुन्हा तेच कॉल्स आणि मेसेजेस येऊ लागले. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर असं लक्षात आलं, की तिने ‘डेटिंग अ‍ॅप्स’वर तिची जी माहिती ‘शेअर’ केली होती ती कुठे तरी ‘लीक्ड’ झाली होती. तिने फोन नंबर बदलला तेव्हा तेच अ‍ॅप पुन्हा ‘रि-इंस्टॉल’ झाले आणि तो नंबर तिथे ‘सेव्ह’ झाला. म्हणून कोणतेही अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यापूर्वी सुरक्षा आणि गोपनीयतेची धोरणं आपण नीट वाचली पाहिजेत. त्याबरोबरच प्रतिरोधशक्ती किंवा क्षमता वाढवली पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं? तर एखादा प्रसंग ओढवला तर त्याला योग्य पद्धतीने कसं सामोरं जायचं याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आम्ही मुलींना नेहमी सांगतो, की तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. कारण तुमच्या प्रतिक्रियेवर पलीकडचा माणूस पुन्हा काही तरी विक्षिप्त प्रतिक्रिया देणार! ट्रोलिंग करायला सुरुवात करणार! तुम्ही चिडून केव्हा आणि कशी प्रतिक्रिया द्याल याचीच ते वाट पाहत असतात. म्हणून उलटसुलट  प्रतिक्रिया देणं टाळा; पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेलं तर त्या व्यक्तीची किंवा अकाऊंटची तक्रार त्या-त्या समाजमाध्यमावर करता येऊ शकते. कधीकधी अशी अकाऊंट्स बनावट असतात आणि वेगवेगळय़ा नावांनी खोटी अकाऊंट्स उघडून मुलींना त्रास दिला जातो. अशा वेळी तुम्ही थेट पोलिसांकडे तक्रार करू शकता; पण हे सगळं शांतपणे, एकदम घाबरून न जाता हाताळण्याची क्षमता तुम्ही निर्माण केली पाहिजे, कारण असे प्रकार होतातच.

 यंत्रणांकडून होणारा विलंब

Advertisement

 आम्ही समाजमाध्यमाला हे सांगतो आहोत की, तुम्ही अशा पद्धतीची यंत्रणा निर्माण करा, ज्यामुळे एखादा माणूस जर अयोग्य भाषा इंटरनेटवर वापरत असेल तर ती ओळखता येऊन त्याला ‘ब्लॉक’ करता आलं पाहिजे. भाषेची सभ्यता राखणं आवश्यक आहे, पण ती राखली जात नसेल तर टायिपगवरून ती ओळखता येऊ शकते. शिव्या किंवा चुकीचे शब्द टाइप करून पोस्ट केले असतील तर त्यांना ते ओळखता येऊ शकतात, ते संबंधित अकाऊंटला इशारा देऊ शकतात आणि पोस्ट डिलीटदेखील करू शकतात; पण ते तेवढय़ा जोरकसपणे हा विषय हाताळत नाहीत, कारण त्यांची गणिते त्यांना मिळणाऱ्या महसुलाशीदेखील निगडित असतात. बालशोषणाच्या, मुलांच्या बाबतीत मात्र नियम आणि यंत्रणा खूप कठोर केलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं ते काम चालतं; पण स्त्रियांच्या बाबतीतील अशा प्रकरणांमध्ये मिळणारा प्रतिसाद किंवा योग्य ती पावले उचलणे हे फारच विलंबाने होते. तुम्ही ज्याच्यावर कारवाई करायला सांगता ती कारवाई करण्यामागचं कारण हे मुळात त्यांना पटावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे जी समुदाय मानके

(Community Standards) ठरवली जातात ती त्यांनी त्यांच्या देशातील संस्कृतीनुसार ठरवली आहेत, त्यामुळे त्यांना पटवून देणं कठीण जातं, कारण आपल्या देशातील मानके वेगळी आहेत  ‘बुली बाई अ‍ॅप’ प्रकरण खूपच हीन दर्जाचे आहे. त्यात ज्या मुलांना अटक झाली आहे त्यांचं जर वय पाहिलं तर वीस ते एकवीस वयोगटातील आहेत. म्हणजे त्यांचा ‘ब्रेनवॉश’ कोणत्या पातळीवर झाला असेल याची कल्पना येईल. यांच्यामागे कदाचित दुसऱ्याच कुणाचा ‘ब्रेन’ असू शकेल. त्यामुळे खरंच हे प्रकरण किती खोल आहे, कोणत्या पातळीवर आहे, पुढे त्यांची काय योजना होती, त्या मुलांचा वापर करून घेतला आहे का, हे सगळे मुद्दे तपासावे लागणार आहेत. आपण आपल्या बाजूने योग्य काळजी घेणं, सुरक्षा आणि गोपनीयता धोरण पाळणं, प्रतिरोध क्षमता वाढवणं हे आवश्यक आहे. समाज म्हणून आपण याकडे कसं  पाहतोय, आपण केवळ चर्चा करून गप्प बसणार आहोत का, की आपल्या घरापासून सक्रियपणे उपाययोजना करणार आहोत याबद्दल तुमच्या कुटुंबात, तुमच्या सोसायटीत, तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये, समाजामध्ये बोलणं गरजेचं आहे. सरकारने कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. या सगळय़ा गोष्टी हातात हात घालून चालत असतात. समाज म्हणून एकमेकांचा आधार होणं आणि निषेधार्ह गोष्टींचा एकत्रित येऊन मुकाबला करणं हे आपलं कर्तव्य आहे. तरच ‘बुली बाई’ सारखी प्रकरणे घडणार नाहीत. 

Advertisement

या विषयावर आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि धोरणं काय असली पाहिजेत, हे ठरवण्यासाठी सामाजिक उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ संस्थेने, ‘सायबर पीस फाऊंडेशन’च्या सहकार्याने, ‘महिला आणि मुलांच्या बाबतीतील सायबर हिंसाचाराच्या विरोधात भारताचा संघर्ष’ या विषयावर, सहावी ‘राष्ट्रीय सायबर मानसशास्त्र परिषद – २०२२’ येत्या २२ जानेवारी २०२२ या दिवशी आयोजित केली आहे. सायबर अधिकारांवर होणाऱ्या अतिक्रमणाच्या विरोधात तसेच प्रत्येकाला इंटरनेटच्या अवकाशात सुरक्षित वाटावं व सर्व प्रकारच्या डिजिटल हिंसाचारापासून संरक्षण व्हावं, या उद्देशाने वरील

कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ही परिषद ऑनलाइन होणार असून त्याविषयी सविस्तर माहिती

Advertisement

http://www.responsiblenetism.org या वेबसाइटवर  मिळेल.

शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी

Advertisement

The post ‘इंटरनेट’वरती काचा गं.. appeared first on Loksatta.Source link

Advertisement