रमेश शेळके | पैठणएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- तालुक्यात एक हजाराहून अधिक कामगारांची नोंदणी
पैठण तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत ५०८ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी पैठण तालुक्यातील बांधकाम कामगारांनी परिपूर्ण घरकुल प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी शिवाजी वने यांच्यासह घरकुल विभागाचे जिजाभाऊ मिसाळ यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून ऑनलाइन नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. या कामगारांकडे संबंधित विभागाचे ओळखपत्र असावे, घरकुल बांधकाम करण्यासाठी स्वतःच्या नावे किमान २६९ चौरस फूट जागा गाव नमुना ८ किंवा ७/१२ नुसार असावी, ग्रामपंचायतीकडील स्थळ पाहणी पंचनामा, लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, चेकलिस्ट, आधार कार्ड, बँक पासबुक, रहिवासी स्वयंघोषणापत्र, प्रपत्र ‘ड’ यादीत नाव नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र १०० रुपयांच्या बाँडवर २ शपथपत्र नोटरी केलेले, ग्रामसभा ठराव झेरॉक्स सरपंच ग्रामसेवक सहीसह, पती अथवा पत्नीचा घरकुल प्रस्ताव पंचायत समितीच्या घरकुल विभागात तपासणी करूनच दाखल करावेत.
घरकुलाचा लाभ घेण्यासाठीच्या अटी
- कामगार हा महाराष्ट्र बांधकाम मंडळामध्ये १ वर्षापेक्षा अधिक दिवस सक्रिय कामगार असावा.
- २०२३ या योजनेमध्ये बांधकाम कामगाराचे वय १८ ते ६० वर्षादरम्यान असावे.
- या योजनेत अर्जदाराने वर्षभरात कमीत कमीत ९० दिवस काम केलेले असावे.
योजनेचे स्वरूप व लाभ
राज्य सरकारने महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत ग्रामीण कामगारांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत बांधकाम कामगार व असंघटित कामगारांचे कच्चे घरांचे रुपांतर पक्के घरात करण्यासाठी या कल्याणकारी मंडळातर्फे १ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच मग्रारोहयोचे १८ हजार रुपये व स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयासाठी १२ हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपये यामध्ये समाविष्ट आहेत. तसेच स्वत:ची जागा नसल्यास ५० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जागा खरेदीसाठी दिली जाते.