आव्हान: शेतीसमोरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी कृषी शास्त्रज्ञांची – अब्दुल सत्तार


अहमदनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आता पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. शेतीसमोर माती, प्रदूषित पाणी व वातावरण बदलासारखे मोठे प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर उत्तर शोधण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांंची असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

Advertisement

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ५१ व्या बैठकीत गुरुवारी ते बोलत होते.

कृषिमंत्री सत्तार म्हणाले, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी बियाणे निर्मितीमध्ये उच्चांक केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करताना अडचण येणार नाही. कृषी विद्यापीठातील काम करण्याऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे काम हे शत्रू सैन्याबरोबर लढाई करणाऱ्या सैनिकांइतकेच मोठे आहे. परदेशातील विद्यापीठांबरोबर तसेच संस्थांबरोबर करीत असलेल्या सामंजस्य करारांमुळे संपूर्ण देश व परदेशातील विद्यापीठांनाही दिशा देण्याचे काम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे करीत आहेत, असेही कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. यावेळी जॉईंट अ‌ॅग्रेस्को-२०२३ च्या स्मरणिकेचे आणि चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. चारही कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानांच्या प्रदर्शन दालनाचे तसेच सेंद्रिय शेती प्रकल्प, जैविक खत प्रकल्प आणि ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमात राहुरी कृषी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विषयातील प्राध्यापक डॉ. पवन कुलवाल, अकोला कृषी विद्यापीठातील डॉ. रामेश्वर कुऱ्हाडे, परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. दीपक पाटील, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. भरत वाघमोडे यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या बैठकीस कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर. ए. मराठे, कुलगुरु डॉ. संजय सावंत (दापोली), कुलगुरू डॉ. इंद्रमणी (परभणी), कुलगुरू डॉ. शरद गडाख (अकोला), कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे, दत्तात्रय उगले, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. संजय भावे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलसचिव प्रमोद लहाळे, कराड कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने उपस्थित होते.

AdvertisementSource link

Advertisement