आज होणाऱ्या दिल्लीविरूद्धच्या सामन्यापूर्वीच मुंबईच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कालपासून आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला. तर आता चाहत्यांची नजर दुसऱ्या सामन्यावर आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स असा रंगणार आहे. आनंदाची बातमी हीच की, संघामध्ये एका धाकड खेळाडूची एंट्री झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेअर सुर्यकुमार यादव खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र सूर्यकुमार यादव काल मुंबईच्या संघासोबत आला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा पहिला सामना सूर्या खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटरवरून एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीमसोबत जोडला असल्याचं दिसतंय. या व्हिडीयोमध्ये सूर्या मुंबईने यापूर्वी जिंकलेल्या ट्रॉफीजसोबत पोज देताना दिसतोय. मुंबईने आतापर्यंत ५ आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
दुसरीकडे दिल्लीकडून पृथ्वी शॉ सलामीला खेळू शकतो. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अद्याप संघासोबत जुळला नसल्याने, दिल्लीला त्याची कमतरता भासेल. शॉसह कर्णधार पंत, वेस्ट इंडिजचा आक्रमक रोवमन पॉवेल, सर्फराझ खान आणि १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता यश धूल यांच्याकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका निभावतील. फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि अक्षर यांच्या खांद्यावर आहे. वेगवान माऱ्यासाठी एन्रीच नॉर्खिया आणि मुस्तफिझूर रहमान सज्ज आहेत.