पुणे31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुण्यात आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डाेक्यात लाेखंडी राॅड घालून त्याचा निघृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री सव्वादाेन वाजता घडली. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. राहूल बबन दांगट (वय-46,रा.आंबेगाव,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आराेपी सुशांत नारायण आरुडे (वय-30,रा.आंबेगाव, पुणे) याचे विराेधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात विकास बबन दांगट (वय-42,रा.आंबेगाव,पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहूल दांगट याचा शेतीचा व्यवसाय असून त्याच्यात आणि सुशांत आरुडे या मित्रात पैशांचे देवाण घेवाण वरुन आर्थिक वाद झाले हाेते. याकारणावरुन सदर दाेघात मागील काही दिवसांपासून धुसफूस सुरू हाेती. 13 जानेवारी रात्री रात्री सव्वादाेन वाजेच्या सुमारास भारती विद्यापीठच्या मागे पाॅकेट काॅर्नर येथे राहूल दांगट याचे घराजवळ आराेपीने आर्थिक व्यवहारावरून दांगट याच्याशी वाद घालून त्याचे डाेक्यात लाेखंडी राॅड मारुन नायलाॅनच्या दाेरीने त्याचा गळा आवळुन खून केला. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे करत आहे.
याबाबत भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले की, मृत राहुल दांगट आणि आरोपी सुशांत आरोडे यांच्या आर्थिक व्यवहारावरून वाद होते. त्यामुळे आरोपी आरोडे यानी राहुल दांगट याचा निर्घृण खून केला आहे. याशिवाय खुनामागे आणखी काही कारण आहे का? सदर दोघात नेमका कोणता आर्थिक व्यवहार झालेला होता? किती रकमेच्या पैशांवरून वाद सुरू होता ? याबाबतची माहिती आम्ही आरोपीच्या चौकशीतून घेत आहे. आरोपीस पोलिस कोठडी मिळावी याकरीता आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.