अकोलाएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
दगडफेक, जाळपोळ, खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या सर्व अकोला येथील दंगलीत घडलेल्या घटनांसाठी अकोला जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दंगल घडली असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
अंबादास दानवे आज अकोला जिल्ह्याच्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधताना आरोप केला.
यावेळी पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सामाजिक तेढ निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे. मागील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर, शेगाव व अकोला येथे दंगल उसळल्या परंतु राज्याचे गृह खाते व स्थानिक पातळीवरील पोलीस प्रशासन संपूर्ण निष्क्रिय दिसले.यांना या दंगली तर थांबवता तर आल्या नाही त्याचबरोबर या घटनेच्या मुख्य आरोपींना सुद्धा जेरबंद करता आले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या दंगली सरकार पुरस्कृत तर नाहीत ना अशी शंका निर्माण होत असल्याचे दानवे म्हणाले.
तसेच अकोला येथे मागील एक दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना वाढल्या असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील गुन्हेगारांमध्ये पोलिसांची कसल्याही प्रकारची भीती नसून उलटच पोलीसच गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनावर लावला.
तसेच शिवसैनिकांनी या दंगलीत हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घातला आहे. जीवाची पर्वा न करता येथील स्थानिक शिवसेना नगरसेवक हे स्वतः रस्त्यावर लोकांच्या रक्षणासाठी उतरले असल्याचे यावेळी ते म्हणाले.
स्थानिक आमदार नितीन देशमुख व आमच्या पक्षाने दंगलीत मृत पावलेल्या विलास गायकवाड यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली असून मुलीच्या लग्नास मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी दंगलीत मृत पावलेल्या विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच दंगल भडकलेल्या भागाची पाहणी करून येथील रहिवाशांचे खाजगी मालमत्तेचे व शासकीय संपत्तीचे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक संदिप घुगे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत दानवे यांनी जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी दंगली झालेल्या नुकसानीची माहिती दिली व या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी केली.