आरोग्य विभागातर्फे उद्यापासून ‘एड्स नियंत्रण महिना’: इर्विन चौकातून जनजागरण रॅली अन् , 3 डिसेंबरला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर


अमरावती5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे उपलब्ध विनामूल्य औषधोपचार व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सातत्यपूर्ण जनजागृती व प्रभावी लोकशिक्षण यामुळे गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्यातील एचआयव्ही संक्रमण दरात घट होत आहे. त्यामुळेच एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे यंदा ‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन उद्या गुरुवार, 1 डिसेंबरपासून जिल्ह्यात ‘जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे. या महिनाभरात जिल्ह्यातील विविध सामाजित व स्वयंसेवी संस्थातर्फे जनजागृतीपर वेगवेगळे उपक्रम घेतले जाणार आहेत.

Advertisement

‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर ‘जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उद्या, 1 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जनजागृती रॅली काढण्यात येईल. त्याचप्रमाणे 3 डिसेंबर रोजी पब्लिक फोरम कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी व नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम होईल.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यक्रम, पथनाट्य, पोस्टर आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रभावी लोकशिक्षण, उपचार आणि सुरक्षित साधनांची उपलब्धता यामुळे संक्रमणदरात घट झाल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली.

Advertisement

एचआयव्ही नियंत्रण व उपचारासाठी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन हॉस्पीटल), जिल्हा स्त्री रुग्णालय, एक वैद्यकीय महाविद्यालय, चार उपजिल्हा रुग्णालये, नऊ ग्रामीण रुग्णालये, 60 प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक क्षयरोग उपचार रुग्णालय, 59 खाजगी रुग्णालये, दोन गुप्तरोग केंद्रे, एक शासकीय रक्तपेढी, चार खाजगी रक्तपेढी एवढी यंत्रणा काम करते. या सर्व ठिकाणी एड्सविषयी माहिती व एचआयव्ही तपासणीच्या विनामूल्य सुविधा पुरविल्या जातात. मोफत उपचारासाठी शासकीय, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांत एआरटी केंद्रेही सुरू आहेत. संक्रमितांना एआरटी केंद्र येथे पोहोचवून आवश्यक तपासण्या, सीडी-फोर तपासणी व विनामूल्य उपचार सुरू आहेत.

असे घटले एडसबाधितांचे प्रमाण

Advertisement

2007-08 मध्ये 10 हजार 812 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 543 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 5.02 टक्के होते. दरम्यान, तपासणी केंद्रे व तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. 2012-13 मध्ये 43 हजार 337 व्यक्तींच्या तपासणीत 741 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 1.71 टक्के होते. 2017-18 मध्ये एक लाख 30 हजार 255 व्यक्तींच्या तपासणीत 388 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.30 टक्के होते. 2021-22 मधील एक लाख 36 हजार 189 तपासण्यांमध्ये 246 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.18 टक्के इतके आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement