अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर सुरू असलेलेे हेल्थ एम्प्लॉइज फेडरेशनचे धरणे आंदोलन तीन दिवसांच्या संघर्षानंतर आज, गुरुवारी दुपारी मागे घेण्यात आले. येत्या काळात टप्प्टप्प्याने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) यांच्यातर्फे देण्यात आले आहे.
तत्पूर्वी हेल्थ एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाने जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी उपमुख्य कार्यपालन अधिकारी (सामान्य प्रशासन) तुकाराम टेकाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आणि त्यांच्या कार्यालयाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
सीईओंसमोर झालेल्या समझोत्यानुसारच डीएचओंनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिले असून त्यात कालबद्ध कृती कार्यक्रम दर्शविण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमानुसार प्रशासनाने कार्यवाही न केल्यास भविष्यात पुन्हा आंदोलनास्त्र उगारावे लागेल, असे संघटनेचे म्हणणे आहे. परंतु तशी वेळच ओढवणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.
मेळघाट येथील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरेने कार्यमुक्त करावे, सर्व संवर्गनिहाय पदोन्नती प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे, दरमहा दिले जाणारे वेतन 1 ते 5 तारखेदरम्यान व्हावे, कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबतची न्यायालयीन प्रकरणे त्वरेने निकाली काढावी, कालबद्ध प्रकरणे त्वरित सोडवावी, वैद्यकीय बिल – स्थानिक प्रवास भत्त्याचा निधी त्वरेने उपलब्ध करुन द्यावा, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ अदा केले जावे.
डीसीपीएसची कपात संबंधितांच्या खात्यात त्वरेने जमा करावी आदी मागण्यांसाठी सोमवारपासून हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात परिचारिका, कक्षसेवक, रुग्णसेवक यांच्यासह आरोग्य विभागातील विविध संवर्गाचे कर्मचारी सहभागी झाले होते.