आयुष्याचा अर्थ : सार्थकी आयुष्य


आपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्यामधलं संपूर्ण आयुष्य हे आपल्यालाच जगायचं असतं, जन्माबरोबरच आपण  माणसांशी, समाजाशी जोडले जातो आणि सुरू झालेल्या काळाच्या प्रवासात आनंद, सुख, दु:ख, निराशा, विरह, अपयश, विश्वासघात, एकटेपण अशा अनेक भावनांशी सामना होतो.

Advertisement

– प्रशांत सहस्रबुद्धे

आपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्यामधलं संपूर्ण आयुष्य हे आपल्यालाच जगायचं असतं, जन्माबरोबरच आपण  माणसांशी, समाजाशी जोडले जातो आणि सुरू झालेल्या काळाच्या प्रवासात आनंद, सुख, दु:ख, निराशा, विरह, अपयश, विश्वासघात, एकटेपण अशा अनेक भावनांशी सामना होतो. अनेकदा शांती ढळते आणि मग आयुष्याबद्दल, स्वत:बद्दल प्रश्न पडायला लागतात. त्या त्या वेळी आलेल्या संकटातून, प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपलं आपण एक तत्त्व वा तत्त्वज्ञान तयार करतो.  कुणाकडून तरी ऐकलेलं किंवा स्वत: पारखून घेतलेलं. ते विचार, ती कृती त्या वेळी आपल्याला गर्तेतून बाहेर पडायला मदत करते. ते तत्त्व म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्याचा लावलेला अर्थ. वाचकांचे हे निवडक अनुभव दर पंधरवडय़ानं ‘आयुष्याचा अर्थ’ या सदरांतर्गत वाचायला मिळतील. [email protected] या ई-मेल पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता तुमचे अनुभव.

Advertisement

आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू यांच्या मधील जीवन. प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा खरा अर्थ कधी ना कधी समजतोच. ती वेळ  केव्हा आणि कशी येईल हे सांगणं मात्र अवघड आहे.  मला हा अनुभव जीवनाच्या अशा टप्प्यावर आला जेव्हा मी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी परदेशात गेलो होतो. कामात वेळ जात असे, परंतु काम संपलं, की बऱ्याचदा येणारा एकटेपणा त्रासदायक ठरायचा. या एकटेपणानं मला माझ्या आयुष्याबद्दल विचार करण्यास भाग पाडलं, नेमकं काय हवंय मला आयुष्यात? याचा विचार करत मी माझ्या भविष्याचा विचार करायला लागलो, कारण पैसा तर छानच मिळत होता. विचार केला, की वयाच्या ५० व्या वर्षी नोकरी सोडून आपल्या आवडीच्या कामात झोकून द्यावे. याच दरम्यान मी सुभाषचंद्र गोयंका यांचे ‘सफलता के मंत्र’ हा कार्यक्रम बघायला लागलो आणि हळूहळू आपल्या सुप्त आवडींना जोडत गेलो. मुलेही मेहनतीनं उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागली होती. ठरवल्याप्रमाणे पन्नाशीच्या उंबरठय़ावर मी भरपूर पगाराची नोकरी सोडली.   

आता वेळ होती, मनातील कार्याला वेग देण्याची. मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्याबरोबर राहिलो. काही तांत्रिक पद्धतींचा वापर करून त्यांच्या समस्या दूर करण्यात मला यश आले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखीनच वाढला. उदाहरणार्थ, काही शेतकऱ्यांकडे पाणी आहे, पण वीज नाही, तिथे मी सोलर पंप बसवले, सोलर ड्रायरचे फायदे सांगितले. हे करत असताना काही प्रोजेक्ट्सवरही काम करत होतो. दरम्यान, करोना आला आणि फिरणं थोडं कमी झालं. मात्र त्याच वेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडणं आणि त्यांना माझ्या कौशल्याच्या मदतीनं मार्गदर्शन करणं सुरूच ठेवलं. भरपूर वाचन आणि अभ्यास केलाच, पण ऑनलाइन चर्चा, गप्पा यामुळे बऱ्याच लोकांना जोडू शकलो, मोठमोठय़ा लोकांना आमच्या व्यासपीठावर आणलं, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. या सर्व माहितीचा वापर करून आज आम्ही तांत्रिक पद्धतीनं शेती करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. त्यात आयुर्वेदिक औषधे, फुलांची शेती, वाळलेल्या पानांचं खतामध्ये रूपांतर, मधमाशीपालन इत्यादीबरोबर उरलेलं अन्न, भाजीपाला आणि शेतकचऱ्यातून गॅस बनवणं, प्लास्टिक कचऱ्याचं फर्नेस ऑइलमध्ये रूपांतर, सोलर पॉवर उपकरणांचा वापर अशी अनेक कामं करून समाजकार्य केल्याचा आनंद घेत आहे. यापुढचं पाऊल शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा चांगला मोबदला देणं आणि रासायनिक खतांचा वापर टाळत कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवून देणं हे आहे. हे सर्व करताना भरपूर आनंद मिळत आहे आणि आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटत आहे. मला माझ्या आयुष्याचा अर्थ सापडला आहे, तो इतरांना आनंद देण्यात आहे.

Advertisement

[email protected]

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement