आयपीएल हे युवा आणि प्रतिभावान खेळाडूंना पारखणारी खाण आहे, असे म्हटले तरी ते वावगं ठरणार नाही. सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंसाठी आयपीएलनेच वरिष्ठ संघाची दारे खुली केली आहेत. आता सुरू असलेल्या आयपीएलमध्येही असे अनेक खेळाडू आहेत, जे भारतीय संघात येण्यायोग्य आहेत. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी (२९ मार्च) अशा एका खेळाडूचा उल्लेख केला, ज्याची चर्चा सुरू आहे. उमरान मलिकचा वेग आणि वृत्ती पाहून मी प्रभावित झालो आहे. सनरायझर्स हैदराबादचा हा वेगवान गोलंदाज लवकरच भारताकडून खेळेल, असे शास्त्री म्हणाले.
रवी शास्त्रींनी भारतीय संघ व्यवस्थापनाला एका युवा खेळाडूला संघामध्ये सामील करून घेण्याचे एक प्रकारे आवाहनच केले आहे. तसेच निवडकर्त्यांनी त्याच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यानंतर शास्त्री यांनी या युवा खेळाडूचे तोंड भरून कौतुक केले आहे.
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर उमरान मलिकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर शास्त्री यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मलिकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४ षटकांत ३९ धावा देत दोन बळी घेतले. उमरान मलिकला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ पूर्वी संघात कायम ठेवले होते. केन विल्यमसन आणि अब्दुल समदसह त्याला ४ कोटी रुपयांना विकत घेतले. २२ वर्षीय श्रीनगरच्या वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२१ मधील त्याच्या पहिल्या सत्रात छाप पाडली होती. उमरान मलिकची गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाने नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती.
हा मुलगा भारताकडून खेळेल
रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, “उमरान मलिक सातत्यपूर्ण आहे आणि मला त्याचे वागणे आवडले. हा मुलगा फक्त शिकतो. त्याच्याकडे नैसर्गिक गती आहे. जर त्याने योग्य ठिकाणी गोलंदाजी केली, तर तो फलंदाजांना खूप त्रास देईल. त्याची चांगली काळजी घेतली पाहिजे. त्याला योग्य तो संदेश देण्याची गरज आहे. तुम्ही त्याच्याशी कसे बोलता, हे खूप महत्वाचे आहे. त्याच्या क्षमतेबद्दल शंका नाही. तो भारतासाठी खेळणारा खेळाडू आहे.”
शास्त्री म्हणाले, ‘तो कधी तयार होईल, हे येणारा काळच सांगेल, पण त्याच्याशी बोलणे खूप महत्त्वाचे आहे. त्याची काळजी घेतली पाहिजे आणि वरिष्ठ संघासोबत ठेवले पाहिजे, जेणेकरून तो भरकटणार नाही. मला वाटतं की, निवडकर्त्यांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. कोविड-१९ च्या काळात तो अतिरिक्त खेळाडू म्हणून टीमसोबत राहू शकतो.’
भारतीय संघासाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे टी-२० विश्वचषक. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची आतापासूनच चाचपणी सुरु केली आहे. पण या विश्वचषकासाठी एक खेळाडू ‘ऑटोमॅटिक पिक’ ठरू शकेल, असे वक्तव्य आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केले आहे.