‘आयपीएल’ सट्टेबाजांवर कारवाई सीबीआयने केले गुन्हे दाखल

‘आयपीएल’ सट्टेबाजांवर कारवाई सीबीआयने केले गुन्हे दाखल
‘आयपीएल’ सट्टेबाजांवर कारवाई सीबीआयने केले गुन्हे दाखल

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या २०१९च्या हंगामात सामनानिश्चिती आणि सट्टेबाजी केल्याच्या आरोपांसह दोन वेगवेगळय़ा खटल्यांमध्ये एकूण सात जणांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी गुन्हे दाखल केले.

‘सीबीआय’ने या प्रकरणाचा देशभर तपास सुरू केला असून दिल्ली, हैदराबाद, जयपूर आणि जोधपूरमधील सात ठिकाणांवर छापेमारी केली आहे. पाकिस्तानमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे काही व्यक्ती ‘आयपीएल’मधील सामन्यांवर सट्टेबाजी करत होते. तसेच त्यांनी सामनानिश्चितीचाही प्रयत्न केला, अशी ‘सीबीआय’ला माहिती मिळाल्याचा दावा प्राथमिक माहिती अहवालांमध्ये (एफआयआर) करण्यात आला आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या संबंधांचा शोध सुरू आहे.

Advertisement

या प्रकरणी ‘सीबीआय’ने दिलीप कुमार (रोहिणी, दिल्लीचा रहिवासी), गुर्राम वासू आणि गुर्राम सतीश (दोघेही हैदराबाद) यांचे नाव पहिल्या ‘एफआयआर’मध्ये नोंदवले आहे. दुसऱ्या ‘एफआयआर’मध्ये सज्जन सिंह, प्रभू लाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा (सर्व राजस्थान) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजस्थानमध्ये हा सर्व प्रकार २०१०पासून सुरू होता. तसेच दुसऱ्या प्रकरणाला २०१३पासून सुरुवात झाल्याचे आरोपींकडून ‘सीबीआय’ला सांगण्यात आले. तसेच पाकिस्तानमधून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे लोकांना ‘आयपीएल’ सामन्यांवर सट्टेबाजी करण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक केल्याचेही आरोपींनी सांगितले आहे. बनावट ओळखपत्रांच्या आधारे आरोपींनी बँकांमध्ये खातेही उघडली. ‘‘खोटी जन्मतारीख आणि अन्य खोटय़ा माहितीच्या आधारे या व्यक्तींनी बँकांमध्ये खाते उघडली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची माहिती पडताळून न पाहताच त्यांना खाते उघडू दिले. तसेच सट्टेबाजीच्या आधारे भारतीय व्यक्तींकडून मिळवलेली रक्कम हे आरोपी परदेशातील त्यांच्या साथीदारांना पाठवत होते,’’ असे ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

कोटय़वधींच्या ठेवी

दिलीप हा आरोपी २०१३ सालापासून विविध बँक खाती हाताळत होता आणि या खात्यांमध्ये त्याने ४३ लाखांहून अधिक रक्कम जमा केल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात उघड झाले आहे. तसेच गुर्राम सतीश हा आरोपी सहा बँक खाती हाताळत होता आणि २०१२ ते २०२० या कालावधीत या खात्यांमध्ये ४.५५ कोटी (स्वदेशी) आणि ३.०५ लाख (परदेशी) रुपयांच्या रोख ठेवी होत्या, असे ‘सीबीआय’ला आढळले. याच काळात गुर्राम वासूच्या बँक खात्यांमध्ये ५.३७ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या.

Advertisement